भारतीय संविधानाचा देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. संविधानातून नागरिकांना देण्यात आलेले मुलभूत हक्क, न्यायालयांची मांडणी,केंद्र-राज्यांची विधीमंडळे यांच्या मार्फत आपल्या देशाचा कारभार चालतो. त्यामुळे भारतीय संविधान हे आपल्या देशातील सर्वश्रेष्ठ पुस्तक मानले जाते.
त्यामुळे ज्यादिवशी भारताने संविधान स्वीकारले त्या दिवसाला विशेष असे महत्व आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने आपले संविधान स्वीकृत केले म्हणून दरवर्षी भारतात संविधान दिन साजरा करण्यात येतो. पण 26 जानेवारी जर देशात संविधान लागू करण्यात आले असेल तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा का केला जातो?
मसुदा समितीची स्थापना
कॅबिनेट मिशननुसार, घटना समितीची स्थापना करण्यात आल्यानंतर भारतीय संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच म्हणजेच 29 ऑगस्ट 1947 ला ही समिती स्थापन करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत एकूण सहा सदस्य होते.
घटना समितीतील विविध समित्यांनी दिलेल्या प्रस्तावांवर विचारविनिमय करुन मसुदा समितीने राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला आणि तो 29 ऑक्टोबर 1948 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. एकूण 141 दिवस मसुदा समितीचे हे कामकाज चालले.
संविधान दिवस
पहिल्या मसुद्यावर आलेल्या सूचनांचा विचार करुन 15 नोव्हेंबर 1948 ला संविधानाच्या मसुद्याचे दुसरे वाचन सुरू झाले आणि ते 17 ऑक्टोबर 1949 रोजी संपले. 14 नोव्हेंबर 1949 ला मसुद्याचे तिसरे वाचन सुरू करण्यात आले आणि ते 26 नोव्हेंबर 1949 ला संपले. याच दिवशी भारतीय संविधानाचा ठराव संमत करण्यात आला, असे घोषित करण्यात आले आणि घटना समितीतील 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्ष-या केल्या. भारतीय संविधानात ही घटना स्वीकृतीची तारीख देखील 26 नोव्हेंबर 1949 अशीच नमूद करण्यात आली आहे.
26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलेल्या संविधानात सरनामा,395 कलमे,8 परिशिष्टे होती. सध्या संविधानात सरनामा,12 परिशिष्टे आणि 395 पेक्षा जास्त कलमे आहेत. आपले संविधान तयार करताना अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला असून,संविधान तयार करण्यासाठी 60 लाख रुपये इतका खर्च आला आहे.
म्हणून 26 जानेवारीला साजरा होतो प्रजासत्ताक दिन
26 नोव्हेंबरला भारतीय संविधान हे अंशतः लागू करण्यात आले होते. 24 जानेवारी 1950 ला सर्व सदस्यांच्या संविधानावर स्वाक्ष-या झाल्या. डिसेंबर 1929 मधील काँग्रेसच्या लाहोर अधिवाशनात ठरल्याप्रमाणे 1930 मध्ये 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्यामुळे 26 जानेवारीला भारतीय संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले आणि हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Join Our WhatsApp Community