BMC Mumbai : महापालिकेतील पी. वेलारसु यांची बदली होणार कधी? जनतेला पडला प्रश्न

233
Fifteenth Finance Commission Fund मंजूर; मुंबईतील ८९ मोकळ्या जागांची हिरवळींसह करणार सुधारणा
Fifteenth Finance Commission Fund मंजूर; मुंबईतील ८९ मोकळ्या जागांची हिरवळींसह करणार सुधारणा

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिका (BMC Mumbai) अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची दोन वर्ष पूर्ण होण्याअगोदरच बदली झाली आहे. मात्र याच महापालिकेत तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेले अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसु हे मात्र महापालिकेत फेविकॉलच्या मजबूत जोड प्रमाणे चिकटून राहिले आहेत. पी. वेलारसु यांच्या विरोधात अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विकास प्रकल्पाच्या कामांविरोधात अनेकदा आरोप केलेले आहेत. मात्र त्यानंतर तीन वर्षांचा सेवा कालावधी संपुष्टात येऊनही त्यांची बदली झालेली नाही. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची बदली होत नसल्याने नक्की पी. वेलारसु यांची बदली होणार कधी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका बाजूला आरोप होत असलेले अधिकारी महापालिकेत घट्ट पाय रोवून आहेत, दुसरीकडे ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही तक्रारी नाहीत त्यांच्या बदल्या एक ते दोन वर्षांच्या आत कशा केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा – BMC : महापालिकेतील सुमारे १० कार्यकारी अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्ताव रोखले कोणी)

राज्यात सरकार बदलल्यानंतर यांची बदली झालेली नसून अशा प्रकारचे अधिकारी महापालिकेत कसे राहतात असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे महापालिकेत (BMC Mumbai) कोणत्या अधिकाऱ्यांना अधिक मान असतो हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबई महापालिकेत (BMC Mumbai) अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी जानेवारी २०२० रोजी अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसु यांची नियुक्ती झाली होती. प्रकल्पाची जबाबदारी पी. वेलारसु यांच्याकडे असताना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिनी, घनकचरा आदी खात्यांच्या कारभार होता. परंतु सिंघल यांची बदली झाल्यानंतर त्या जागी जयश्री भोज यांची नियुक्ती झाली. पण त्यांच्याकडे सिंघल यांचेकडील पदभार न देता तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या खात्याच्या कारभार तत्कालीन सहआयुक्त (विशेष) यांच्या माध्यमातून स्वतःकडे ठेवला. पुढे सलील हे मसुरीला प्रशिक्षण करता गेल्याने या महत्त्वाच्या खात्यांचा कारभार पी. वेलारसु यांच्याकडे आला आणि तेव्हापासून या विभागांचा कारभार त्यांच्याकडेच आहे.

हेही पहा –

नियुक्तीनंतर कोविड आल्याने त्या काळात त्यांनी स्वतःला झोकून देत काम केले. तसेच या काळासह आजतागायत त्यांनी पुढाकार घेत राबवलेल्या विकास प्रकल्प कामांबाबत अनेकदा ते टीकेचे धनी झाले आहेत. मनसेचे संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर सातत्याने आरोप करत त्यांचा उल्लेख विरप्पना गॅंग असा केला आहे, तर भाजपच्या नेत्यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका करत आरोप केले होते. (BMC Mumbai)

शासकीय (BMC Mumbai) सेवेत कुठल्याही अधिकाऱ्यांची बदली ही तीन वर्षांपूरती असते, त्यानंतर त्यांची बदली करणे बंधनकारक आहे. एकाच अधिकाऱ्याला तीन पेक्षा अधिक कालावधी एकाच पदावर ठेवता येत नाही. त्यानुसार जानेवारी २०२३ रोजी पी. वेलरसु यांची या पदावरील सेवेची तीन वर्षे पूर्ण झाली असून त्यांची बदली आता अन्य विभागात होणे आवश्यक आहे. परंतु सव्वा तीन वर्षे होऊनही पी. वेलारसु अजूनही त्याच पदी आहेत. तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात असताना अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची बदली झाली. त्यापूर्वी जयश्री भोज, संजीव जयस्वाल यांच्या बदल्या झाल्या, पण ज्यांच्यावर राजकीय नेत्यांकडून आरोप होत असताना त्यांची बदली होत नाही याबाबत सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पी. वेलारसु हे विद्यमान महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचे अति विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जात असून यापूर्वीच्या ठाकरे सरकार आणि विद्यमान शिंदे व फडणवीस सरकारशी (BMC Mumbai) त्यांनी पूर्णपणे जुळवून घेतल्याने, तसेच सरकारला अभिप्रेत काम करत असल्याने त्यांना महापालिकेतून बाजूला करण्याचा विचार नसल्याची माहिती मिळत आहे. चहल यांच्या बदलीनंतर पी. वेलारसु हे याठिकाणी स्वतःच राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पी. वेलारसु यांची बदली आता होईल का की चहल यांच्या बदलीसोबत किंवा त्यानंतर होईल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.