-
डॉ. गिरीश पिंपळे
२२ एप्रिल २०२५ हा दिवस भारताच्या इतिहासात एक काळाकुट्ट दिवस म्हणून नोंदला जाईल. त्या दिवशी पहलगाम येथे पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या निष्पाप अशा २६ भारतीय नागरिकांना दहशतवाद्यांनी निर्घृणपणे ठार मारले. अनेक स्त्रियांच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. यामागे पाकिस्तानचा हात होता ही गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसत होती. देशभर संतापाची प्रचंड लाट उसळली आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची जोरदार मागणी होऊ लागली. सरकारने वेगाने, सावधपणे आणि गुप्तपणे आवश्यक ती पावले उचलली आणि ७ मेच्या पहाटे पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे खणखणीत उत्तर दिले. दहशतवाद्यांचे नऊ तळ काही मिनिटात उद्ध्वस्त करून त्यांच्या नाकी नऊ आणले. इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हवाई तळ पाहतापाहता धुळीला मिळवले. भेदरलेला शत्रू नाक मुठीत धरून शरण आला. आपली क्षेपणास्त्रे, आपले ड्रोन यांनी त्यांचे काम अचूकपणे पार पाडले. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडसावले की यापुढे अण्वस्त्रांची भीती दाखवून भारताला घाबरवता येणार नाही. यापुढे दहशतवादी हल्ला ‘युद्ध’ समजले जाईल आणि त्याला त्याच पद्धतीने कडक उत्तर दिले जाईल असेही पाकिस्तानला बजावण्यात आले.
(हेही वाचा – KL Rahul : कधी सातव्या तर कधी सलामीला फलंदाजी करणारा के. एल. राहुल)
सैनिकीकरण झाले पाहिजे!
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आज जिवंत असते तर आपल्या देशाच्या या अभूतपूर्व पराक्रमामुळे आणि कणखर धोरणामुळे त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असते. याचे कारण म्हणजे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपले संरक्षण आणि परराष्ट्र धोरण कसे असले पाहिजे याबाबत त्यांनी वारंवार ज्या गोष्टी अतिशय पोटतिडकीने सांगितल्या होत्या त्याच नेमक्या भारताने कृतीत उतरवल्या आहेत. कोणत्या होत्या या सूचना? काय होते त्यांचे मार्गदर्शन?
१९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि थोड्याच दिवसांत वायव्य सीमा पेटून उठली. जम्मू –काश्मीरमध्ये पाकिस्तानने प्रचंड संख्येने टोळीवाले घुसवले आणि त्या राज्याचा मोठा लचका तोडला. त्यालाच आपण आज पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. हा हल्ला झाला तेव्हाच सावरकरांनी स्पष्ट शब्दांत बजावले होते – ‘पाकिस्तानशी वागताना भारताचे धोरण जशास तसे या न्यायाचेच असले पाहिजे.’ या वाक्यातील ‘च ’ हे अक्षर फार महत्त्वाचे होते. पण राज्यकर्त्यांनी सावरकरांकडे (Veer Savarkar) दुर्लक्ष केले. त्याची फार मोठी किंमत देशाला पुढे मोजावी लागली. ‘गवत खाऊन राहू पण भारताशी एक हजार वर्षे लढत राहू’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्पिकार अली भुत्तो यांनी केली होती; तरी आपले राज्यकर्ते सावध झाले नाहीत.
आपला देश स्वतंत्र झाल्यावर ‘आपल्याला इतक्या मोठ्या आणि इतक्या खर्चिक सैन्याची काहीच आवश्यकता नाही त्यामुळे ते विसर्जित करावे’ अशी अजब सूचना आपल्या देशातील एका प्रमुख नेत्याने केली होती! याउलट स्वतंत्र भारतात तर मोठ्या प्रमाणावर सैनिकीकरण झाले पाहिजे असे ठाम प्रतिपादन सावरकर करत होते. आपल्या देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी सावरकरांनी एक पत्रक प्रसिद्ध करून तरुणांनी लक्षावधींच्या संख्येने सैन्यात जावे असे आवाहन केले. त्यावेळेस आपले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद. त्यांना उद्देशून सावरकर म्हणाले, ‘आपल्या नवजात प्रजासत्ताकाचे रक्षण करण्यासाठी भारताची लढाऊ दले शक्य तितकी सुसज्ज आणि भक्कम बनविण्याच्या आद्य कर्तव्याकडे आपण तातडीने लक्ष पुरवाल अशी मला आशा आहे.’ सावरकरांनी (Veer Savarkar) एकेकाळी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्थेचा सांगता समारंभ पुणे येथे १९५२ मध्ये झाला. या सभेत त्यांनी अतिशय प्रेरक असे भाषण केले. ते म्हणाले, ‘शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले पाहिजे. सुमारे एक कोटी हिंदूंना सैनिकी शिक्षण देऊन आपले वायुदल, भूदल आणि नौदल अद्ययावत केले पाहिजे.’
त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात दिलेल्या एका व्याख्यानात त्यांनी आपला सैनिकीकरणाचा मुद्दा मोठ्या मार्मिकपणे मांडला. ते उद्गारले, ‘सत्पक्षाला सामर्थ्याचे पाठबळ असले तरच तो असत्पक्षावर विजय मिळवू शकतो. अशोकचक्राच्या पाठीमागे सुदर्शन चक्र असेल तरच अशोक चक्र यशस्वी होईल. संकटकाळात अशोकचक्राने सुदर्शनचक्राची भूमिका घेतली नाही तर ते स्वतः धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ’१९५०च्या दशकात अमेरिका आणि रशिया यांच्यात अण्वस्त्र स्पर्धा सुरू झाली. याबाबत आपण मागे राहून चालणार नाही हे द्रष्ट्या सावरकरांनी (Veer Savarkar) वेळीच ओळखले. १९५३ मध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणाले, ‘अणुबॉम्बचे रहस्य आणि विज्ञान भारतात आणा. भारत हे एक प्रबळ राष्ट्र बनवा असे माझे या पिढीला सांगणे आहे.’ युद्धशास्त्रातले एक महत्त्वाचे तत्त्व त्यांनी सांगितले होते- ‘जेव्हा लढाई करायची असते तेव्हा आक्रमण करावे’ संरक्षक सैन्य हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे; सैन्य आक्रमक असेल तरच ते राष्ट्राचे संरक्षण करू शकते असे ते म्हणत.
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Top 2 : ‘चहल आणि बसचालकाला आम्ही संघात सारखंच वागवतो,’ – शशांक सिंग)
विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत!
चीनच्या संदर्भातसुद्धा सावरकरांनी (Veer Savarkar) अगदी नेमकेपणाने इशारे दिले होते. चीन भारतापेक्षा सर्वच बाबतीत बलाढ्य होता. तरीही, चीनबरोबरच्या ‘शांततामय सहजीवना’च्या कल्पनेचा उदोउदो चालू झाला होता. त्यांनी त्या कल्पनेची खिल्ली उडवली. ते म्हणाले होते– ‘सहजीवन दोन प्रकारचे असते. एकमेकांशेजारी बसून, बरोबरीने वागून होते ते एक सहजीवन. एकाने दुसऱ्याच्या पोटात जाऊन होते तेही सहजीवनच. वाघ जेव्हा शेळीला खातो तेव्हा संपूर्ण सहजीवन होते…’ पण तेव्हाच्या सरकारला सावरकरांची अलर्जी होती त्यामुळे त्यांची उपेक्षा करण्यात आली. पुढे १९६२च्या युद्धात चीनने आपल्याला जोरदार थप्पड लगावली आणि ३८ हजार चौ.कि.मी. चा प्रदेश घशात घातला. सुदैवाची गोष्ट म्हणजे सावरकरांचे विचार शिरोधार्य मानणाऱ्या पक्षाचे सरकार २०१४ मध्ये आपल्या देशात स्थापन झाले आणि त्यानंतर मात्र आपले संरक्षणविषयक चित्र पूर्णपणे बदलले. सावरकरांच्या विचाराच्या प्रकाशातच आता आपल्या देशाची दमदार वाटचाल सुरू आहे! सावरकरांचा मृत्यू झाला या घटनेला आता ५९ वर्षे उलटून गेली आहेत; पण त्यांचे संरक्षणविषयक विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत; किती दूरदृष्टीचा होता हा महापुरुष!
(लेखक सावरकर साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community