-
डॉ. श्रीरंग गोडबोले
एखाद्या वाक्याचा आधार घ्यायचा तर किमान त्याचा संदर्भ तपासून पाहणे गरजेचे असते. सावरकरांची अध्यक्षीय भाषणे मुद्रित स्वरूपात आणि इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या या वाक्याचा संदर्भ तपासणे अगदीच सोपे आहे. प्रस्तुत भाषणात ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या व त्याचा अचूक उपयोग, हिंदू समाजाचे राष्ट्रस्वरूप, हिंदू महासभेची राष्ट्रीय भूमिका, संयुक्त हिंदी राज्य (आजच्या परिभाषेत भारतीय) आणि अल्पसंख्याकांची सहकारिता, मुस्लिमेतर अल्पसंख्य जाती इत्यादी.
सावरकरांची (Veer Savarkar) मते मान्य असोत वा नसोत, ती अज्ञानातून निष्पन्न झाली नव्हती हे मान्य करावेच लागेल! इंग्लंडमध्ये असतानाच सावरकरांनी कुराणाचे भाषांतर वाचले होते. सावरकरांनी कुराणाची इंग्रजी, बंगाली आणि मराठी भाषांतरे वाचलेली होती. ‘अगदी मूळ वाचले म्हणजे त्याचा खरा स्वाद मिळेल, असा माझ्या मुसलमान मित्रांचा अभिप्राय पाहून त्यांच्याकडून प्रत्येक पान त्यांच्यासारखे शुचिर्भूत मने एकाग्र करत वाचून आणि हिंदी भाषांतर करवून ऐकले’, असे सावरकर सांगतात. पुढे पाश्चात्य दृष्टिकोनातून लिहिलेले कुराणावरील संचही सावरकरांनी वाचले. सावरकरांना द्विराष्ट्रवादाचे पितृत्व बहाल करण्यात येते ते ६००० पृष्ठांच्या सावरकर वाङ्मयातील एका वाक्याच्या आधारे ! प्रस्तुत वाक्य १९३७ साली अहमदाबाद येथे झालेल्या अ. भा. हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या सावरकरांच्या अध्यक्षीय भाषणात सापडते. मूळ इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद सावरकरांच्या धाकट्या बंधूंनी म्हणजे डॉ. नारायणरावांनी केला आहे. सावरकरांचे ते वादग्रस्त वाक्य पुढीलप्रमाणे हिंदुस्थान हे एकता पावलेले व विसंवादरहित राष्ट्र आहे असे आज तरी मानता येत नाही, तर उलट हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी मुख्यतः दोन राष्ट्रे विद्यमान आहेत.
(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Top 2 : ‘चहल आणि बसचालकाला आम्ही संघात सारखंच वागवतो,’ – शशांक सिंग)
विषयांचा ऊहापोह केल्यावर सावरकर (Veer Savarkar) मुसलमानांचा परामर्श घेतात. ‘त्या’ वाक्याच्या अगोदर ते पुढील निरीक्षण नोंदवतात, ‘कित्येक बालिश राजकारणी हिंदुस्थान हे पूर्वीच विसंवादरहित बनून गेलेले राष्ट्र आहे किंवा तशी नुसती इच्छा करताच ते तसे होणारे आहे असे मानण्यात भयंकर चूक करीत असतात. हे आमचे सद्हेतुप्रेरित, पण अविचारी मित्र आपली स्वप्ने सत्यच समजून चालत असतात. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, जातीय म्हणून म्हटले जाणारे प्रश्न हा हिंदू आणि मुसलमान यांच्या सांस्कृतिक, धार्मिक नि राष्ट्रीय विरोधाचा शतकानुशतके चालत आलेला केवळ वारसा आहे. योग्य काळ येताच तुम्ही ते प्रश्न सोडवू शकाल, पण त्यांचे अस्तित्वच मुळात नाकारून तुम्ही ते दडपून टाकू शकत नाही. ‘ते’ वाक्य उचारण्यापूर्वी सावरकर ‘असेल त्या अप्रिय अशा वस्तुस्थितीला छातीठोकपणे आपण तोंड देऊया’ असेच सांगतात, तेव्हा सावरकर त्यांच्या दृष्टीने असलेली वस्तुस्थिती सांगत होते, तिचा पुरस्कार करत नव्हते! हे पुन्हा ‘त्या’ वाक्यानंतरच्या दोन ओळींतूनही स्पष्ट होते. प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या ध्येयाविषयी बोलताना ते म्हणतात, ‘ज्यात कोणालासे विशेष मताधिक्य किंवा विशेष प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि कोणालाही वाजवीहून अधिक मोल देऊन आपली राजनिष्ठा विकत घ्यावी लागणार नाही असे हिंदी राष्ट्र बनविणे. हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले सावरकर, मुस्लिमांना देऊ करत होते त्यापेक्षा कोणतेही विशेष अधिकार हिंदूंसाठी मागत नव्हते हे या संदर्भात लक्षणीय आहे.
सावरकरांच्या हयातीत त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनीच त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हे स्पष्टीकरण सावरकरांनी (Veer Savarkar) नागपूर येथील साप्ताहिक ‘आदेश’च्या कार्यालयात जमलेल्या पत्रकारांना दिनांक १५ ऑगस्ट १९४३ ला दिले. दि. २३ ऑगस्ट १९४३ ला मुंबईत दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी आपली बाजू, स्पष्ट केली. ही मुलाखत दिनांक २८ ऑगस्ट १९४३च्या साप्ताहिक ‘आदेश’मध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीतील काही महत्त्वाचा भाग असाः ‘इस्लाम हे आपल्या जन्मापासून धर्मनिष्ठ कुराणप्रणीत राष्ट्र आहे. मुसलमान जेथे जेथे गेले तेथे तेथे ते राष्ट्र म्हणूनच गेले… मुसलमान आणि हिंदू अशी दोन राष्ट्र हिंदुस्थानात आहेत. अशी आहे ती वस्तू सांगणे म्हणजे काही मुसलमानांचा देश तोडून सांगण्याचा पाकिस्तानी दुराग्रह मान्य करणे नव्हे… सध्या दोन व दोनशे, स्वतःस हिंदूंपासून परकी मानणारी राष्ट्रे हिंदुस्थानात जरी बळाने घुसली असली तरी आणि हिंदुस्थानची विभागणी करू मागत असली तरी ती वस्तुस्थिती नुसती नाकारण्याच्या भाबड्या नि भेकड धोरणाने नव्हे, तर ती वस्तुस्थिती समजून घेऊन त्या वस्तुस्थितीला तोंड देऊन, तिला उलथून पाडून, आसिंधुसिंधू हिंदुस्थानात स्वतंत्र, अखंड नि अविभाज्य असे हिंदूराष्ट्रच नांदत राहणार यात शंका नाही. सर्वांच्या अंती, इच्छा हाच राष्ट्राचा अधिक प्रभावी व महत्त्वाचा घटक ठरतो, ते (मुसलमान) जर स्वतःला परके समजतात, तर तुम्ही त्यांना आपले म्हणून काय होणार?
(हेही वाचा – वाढवण बंदर प्रकल्पामुळे मिळणार रोजगारांच्या संधी; Nitesh Rane यांचा मोठा निर्णय)
मुस्लीम स्वतःला पृथक जागतिक धर्मसमाज अथवा उम्मा मानतात ही वस्तुस्थिती आहे. हा काही सावरकरांनी (Veer Savarkar) लावलेला शोध नाही. इस्लाम राष्ट्रातीत असल्यामुळे मुस्लिमांना ‘राष्ट्र’ ही संज्ञा द्यावी का, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण इस्लामी नेत्यांनी मुस्लिमांसाठी ‘राष्ट्र’ ही संज्ञा वापरलेली आहे हेही तितकेच खरे. सन १९३० मध्ये वॉलेस फर्द मुहम्मद या कृष्णवर्णीय अमेरिकन नेत्याने डेट्राइट, मिशिगन येथे ‘नेशन ऑफ इस्लाम’ नावाची संघटना स्थापन केली होती. या संदर्भात अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान आणि काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष बदुद्दीन तय्यबजी यांच्यात झालेला पत्रव्यवहार बोलका आहे. सन १८८८ च्या सुरुवातीला मद्रास येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले. या घटनेला एक महिना उलटण्याच्या आत सर सय्यद अहमद यांनी तय्यबजी यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ‘नॅशनल काँग्रेस या शब्दांचा अर्थच मी समजू शकत नाही. हिंदुस्थानात राहणारे सर्व धर्माचे लोक एकाच राष्ट्राचे घटक आहेत अथवा तसे ते होतील आणि त्यांच्यात समान आकांक्षा निर्माण करता येतील असा आपला समाज आहे काय?’ त्यावर काँग्रेसच्या अध्यक्षांनी तितकेच नमुनेदार उत्तर लिहिले. तय्यबजी म्हणतात, ‘मी माझ्या उद्घाटनाच्या भाषणात (मद्रास काँग्रेसच्या) असे स्पष्टपणे म्हटले आहे की, हिंदुस्थानात अनेक जमाती अथवा राष्ट्र आहेत आणि त्या प्रत्येकाला स्वतःचे असे विशिष्ट प्रश्न आहेत… ‘माझे धोरण काँग्रेसबाहेर राहून मुसलमानहित साधण्याचे नसून काँग्रेसमध्ये राहूनच मुसलमानहित साधण्याचे आहे.’ (सोर्स मटेरियल फॉर ए हिस्टरी ऑफ दि फ्रीडम मुव्हमेंट इन इंडिया खंड २, पृ. ७२-७३). त्यामुळे सावरकर मांडत असलेली वस्तुस्थिती अनाठायी होती असे म्हणता येईल का? काँग्रेस नेत्यांनी ज्या क्षणी धर्माच्या आधारावर वेगळ्या सार्वभौम राज्याची ‘पाकिस्तान’ची मागणी मान्य केली, त्या क्षणी सावरकरांनी सांगितलेली वस्तुस्थितीही त्यांनी मान्य केली असे होत नाही का? सावरकर केवळ अप्रिय वस्तुस्थिती मांडत होते, तिचा पुरस्कार त्यांनी कधीही केला नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
सावरकरांच्या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या मागणीला सैद्धांतिक पाठबळ मिळाले का, हा आरोप तपासून बघितला पाहिजे. सावरकरांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे आपण पाकिस्तानची मागणी केली, असे जीना यांनी कुठेही म्हटलेले नाही. सावरकरांच्या १९३७ च्या भाषणाच्या आधी म्हणजे १९३० साली सर मुहम्मद इक्बाल यांनी मुस्लीम लीगच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना ‘पंजाब, वायव्य सीमा प्रांत, सिंध आणि बलुचिस्तान यांचे एकच एक मुसलमान राज्य बनवणे हेच पश्चिम व उत्तर भारतातील मुसलमानांचे अंतिम साध्य आहे असे मला वाटते’, असे निःसंदिग्धपणे सांगितले होते. ‘हजार वर्षांपूर्वी मुहम्मद बिन कासीमने सिंधच्या भूमीवर पाऊल ठेवून उपखंडाला इस्लामची ओळख करून दिली तो पाकिस्तानचा आरंभ-बिंदू होय’ हे पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे उद्गार मार्मिक आहेत. हिंदू-मुस्लीम संबंधांविषयी सावरकरांच्या विचारांशी अथवा त्यांच्या प्रतिपादनाशी प्रामाणिक मतभेद असू शकतात, तथापी त्यांच्यावर ते द्विराष्ट्रवादाचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप करणे म्हणजे त्यांच्या भूमिकेचा विपर्यास करणे होय.
(लेखक पुण्यातील प्रख्यात मधुमेह व हॉर्मोनविकार तज्ज्ञ आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community