Veer Savarkar : समाज क्रांतिकारक वीर सावरकर

‘मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका’ असे सांगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा समाजसुधारणेचे कार्य किती महत्त्वाचे वाटत होते ह्याची प्रचिती येते.

218
Veer Savarkar : समाज क्रांतिकारक वीर सावरकर
  • अक्षय जोग
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. आधी स्वराज्य की समाजसुधारणा ह्यावर सावरकर म्हणतात, ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही.’ ‘मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका’ असे सांगणाऱ्या सावरकरांना आपल्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा समाजसुधारणेचे कार्य किती महत्त्वाचे वाटत होते ह्याची प्रचिती येते. ब्रिटिशांची परदेशी शृंखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने ‘वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी’ ह्या सात स्वदेशी शृंखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात.
आपले सामाजिक विचार मांडण्यासाठी सावरकरांनी ‘संगीत उ:शाप’ हे नाटक, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘क्ष’ किरणे, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ ह्यासारखे ग्रंथ तसेच कविता, कथा असे विविध वाडमयीन प्रकार हाताळले. सावरकर एक कृतिशील विचारवंत होते त्यामुळे सावरकर नुसते विचार मांडून थांबले नाहीत. सहभोजन, मंदिरप्रवेश, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या मुलांना शाळेतून एकत्र बसवणे, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांसह घरोघरी दसरा व संक्रांतीला सोने व तिळगूळ वाटप, बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेला पूर्वास्पृश्यांचा बँड, १९२९ पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवातील पूर्वास्पृश्यांचे कीर्तन, महिलांची प्रकट भाषणे असे अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी (Veer Savarkar) यशस्वी केले. १९३३ ला रत्नागिरीत अखिल हिंदू उपहारगृह काढले, जेथे पुर्वास्पृश्य पदार्थ वाटपाचे काम करत व सावरकर त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तीस आधी उपहारगृहात जाऊन चहा पिऊन येण्याची अट घालत. १९३१ ला सर्व हिंदुंना खुले व ज्याच्या न्यासावर पूर्वास्पृश्यांसह सर्व जातींचे पुढारी असतील असे ‘पतितपावन मंदिर’ सावरकरांच्या प्रेरणेने व भागोजी कीर ह्यांच्या आर्थिक पाठबळामुळे सुरू झाले. ‘जुन्या देवळाचा प्रश्न नव्या देवळातील सांघिक पूजेच्या सवयीने अधिक लवकर सुटेल’ हे जाणूनच पतितपावन मंदिर बांधण्यात आले होते. या व अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी रत्नागिरीसारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात कायापालट घडवून आणला. त्यावेळी गायत्री मंत्र नि वेदमंत्र हे अधिकार ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते. अशावेळी अखिल हिंदू गणेशोत्सवात एका भंगी हिंदूने गायत्री मंत्र नि वेदमंत्र म्हटले, या प्रकरणाचे निनाद लंडनच्या काही वृत्तपत्रांमधूनही घुमले होते.
५० वर्षांची दोन जन्मठेपेंची शिक्षा ठोठावल्यावरसुद्धा जे सावरकर भावनिक झाले नाहीत तेच सावरकर १९३१ला ‘मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवास मला पाहू द्या’ हे पूर्वास्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाचे गीत लिहिताना अत्यंत भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ब्रिटिश शासनाकडून मिळणारे तुटपुंजे वेतन व इतर चरितार्थाची साधन अल्प असतानाही सावरकरांनी (Veer Savarkar) एका पूर्वास्पृश्य मुलीला दत्तक घेतले होते. सन १९२९च्या डिसेंबर महिन्यात ज्या रत्नागिरी हिंदू सभेतर्फे सावरकर कार्य करीत होते, तिच्यापाशी केवळ सव्वा रूपया शिल्लक होता. ह्यावरून आपल्या लक्षात येईल की किती आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांनी समाजकार्य केले होते. समाजसुधारणेविषयी आपले विचार मांडताना सावरकरांनी धर्मग्रंथ, समाजसंस्थेचा पाया, जातिभेद ह्याविषयी मूलगामी विचार मांडले आहेत. ‘धर्मग्रंथावर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले. उद्या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करावयाची ती प्रत्यक्ष ऐहिक नि विज्ञाननिष्ठ अशाच तत्वांवर केली पाहिजे.’‘सामाजिक क्रांतीस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करून जाती-जातीतील विषमता आधी नष्ट केली पाहिजे.’
रत्नागिरीला आल्यावर राजकारणात भाग घेता येणार नाही म्हणून हिंदूसंघटनेच्या दृष्टीकोनातूनच सावरकरांनी (Veer Savarkar) अस्पृश्यतानिवारण केले असा आरोप करणाऱ्यांनी सावरकरांनी बंधू नारायणरावांना अंदमानातून दि. ६-७-१९२०ला लिहिलेले पत्र वाचावे. ‘हिंदुस्थानवरील परकीयांच्या स्वामित्वाविरूद्ध बंड करून उठावेसे जितके मला वाटते तितकेच मला जातिप्रथा व अस्पृश्यता यांच्याविरूद्धही बंड करून उठावेसे वाटते.’ १९३७ला संपूर्ण मुक्तता झाल्यावर सावरकरांनी अस्पृश्यतानिवारण केले नाही असा आरोप करणाऱ्यांनी वरील गोष्टींची नोंद घ्यावी. रत्नागिरीहून सुटल्यावरही विविध दौऱ्यात पूर्वास्पृश्य वस्तीला भेट व सहभोजन हे कार्यक्रम होत असत.
(लेखक सावरकर अभ्यासक, संशोधक आणि व्याख्याते आहेत.)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.