Veer Savarkar : अत्याचार आणि अत्याचाराला विरोध

Veer Savarkar : अत्याचाराचा नेमका अर्थ सांगताना वीर सावरकर(Veer Savarkar) म्हणतात, ‘बळप्रयोगात्मक कर्म हे दुष्ट हेतूने परपिडक बुद्धीने केले तरच ते अत्याचारी होते. ते कर्म सुष्ट संरक्षणार्थ न्याय बुद्धीने केले तर ते सदाचार होते. अत्याचार हा नेहमीच निंद्य आहे.

37

Veer Savarkar : अत्याचाराचा नेमका अर्थ सांगताना वीर सावरकर(Veer Savarkar) म्हणतात, ‘बळप्रयोगात्मक कर्म हे दुष्ट हेतूने परपिडक बुद्धीने केले तरच ते अत्याचारी होते. ते कर्म सुष्ट संरक्षणार्थ न्याय बुद्धीने केले तर ते सदाचार होते. अत्याचार हा नेहमीच निंद्य आहे. पण बळ काही नेहमी निंद्य असत नाही. कारण आततायी बळ हेच काय ते अत्याचार आणि आततायी हाच अत्याचारी होय.’ ‘काँग्रेसच्या एका अधिवेशनात अत्याचाराविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. अत्याचार या शब्दाचा अर्थ वाईट वर्तन करणे, दुराचार करणे, दुसऱ्याला उपद्रव देणे, आपल्या बळाचा वापर करून अकारण दुसऱ्याला पीडा देणे, असा लावला तो योग्य आहे. पण, या त्याच्या अर्थामुळे न्याय मात्र मर्यादित राहतो. कोणतीही गोष्ट ध्यानात न घेता अतिरेकी लोकांनी शक्ती किंवा बळाचा उपयोग करून अत्याचार केला तर त्याला अटकाव करण्यासाठी जर दुसऱ्याने आपल्या बळाचा उपयोग करून त्याला विरोध केला तरी सुद्धा त्याला प्रति अत्याचार समजून ती हिंसा मानली गेली.(Veer Savarkar)

अत्याचार या शब्दाचा अर्थ मूळ अधिष्ठान शक्ती किंवा बळ असा असल्यामुळे, शक्ती अथवा बळाचा उपयोग करून जी जी कृती केली जाते, त्या कृतीला अतिरेकी मानण्यात आले. परिणामी, अत्याचार या शब्दाशी निगडित असलेली निंद्य आणि त्यांच्या भावना त्या कृत्याविषयी लोकांच्या मनात सहज उत्पन्न झाली. वाईट गोष्ट करू नका, हे वाक्य म्हणताच त्याला कोणीही सहज संमती देतो. वाईट म्हटले की निंद्य असणार या अर्थाची सांगड त्या शब्दाशी जुळलेली असते. त्यामुळे आपण अत्याचार करू नये. आपण अनात्याचारी असावे हे वाक्य उच्चारले जाताच त्यालाही संमती देणे आपले कर्तव्य आहे असे प्रत्येकाला वाटले. विशेषतः सर्वसामान्य लोकांना ते पटले आणि काँग्रेसच्या अधिवेशनात अहिंसा याचा अर्थ आम्ही अत्याचार करणार नाही, अशी शपथ घेतली गेली. त्यामुळे सहाजिकच त्याला हरकत घेणे म्हणजे मी अत्याचार करीन असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे अत्याचाराला निंद्य मानले गेले. या सत्प्रवृत्तीच्या आड लपून अहिंसेच्या थोतांडामागे लपून जे जे कर्म शक्तीच्या आणि बळाच्या प्रयोगाने करावे लागते तो सर्वच अत्याचार मानले गेले. परिणामी, सर्वसामान्य जनतेचा सहजतेने बुद्धिभेद झाला.

या बुद्धिभेदामुळे राजकारणात अहिंसा, अनात्याचार या शब्दांनी घोटाळा केला. युगानुयुगे जी कृत्ये प्रशस्त म्हणून इतकेच नव्हे, तर प्रशंसनीय म्हणून जगात वाखाणली गेली होती, ती सद्गुणांच्या टिप्पणीतून निघून गेली आणि एकाएकी दुर्गुण झाली, निंद्य समजली गेली. शौर्य, क्षात्रतेज, झुंजारपणा, रणनैपुण्य, शस्त्रनैपुण्य, तिखटपणा, दृष्टांचा कंड शमविणारा पराक्रम हे सर्व बळाच्या प्रयोगावर अवलंबून असतात. म्हणून त्यांना सुद्धा काँग्रेसने अत्याचाराच्या व्याख्येत कोंबले आणि दुर्गुण म्हणून त्यांचा धिक्कार केला. जी जी शक्ती प्रयोगात्मक असते ते सारे अत्याचार आहेत, अशा प्रकारची अतिरेकी बुद्धीची व्याख्या संपूर्ण देशाने आंधळेपणाने स्वीकारली. (वरील विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या ‘गांधी गोंधळ’ या पुस्तकातील ‘अत्याचार शब्दाचा अर्थ’ या लेखातील आहेत.)

आजही अनेक शब्दांचे अर्थ चुकीचे लावले जातात. त्यामुळे लोकांचा बुद्धिभेद होतो आणि तो चुकीचाच अर्थ ग्राह्य मानला जातो. दरवर्षी रावणाचा पुतळा जाळला जातो. त्याला विरोध करण्यामागे हाच बुद्धिभेद कारणीभूत आहे. देशातल्या सशस्त्र क्रांतिकारकांना अतिरेकी संबोधले जाते. त्यामागे सुद्धा हाच बुद्धिभेद कारणीभूत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानी आक्रमणाला सशस्त्र प्रतिकार करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदूंची लुटालुट करून मुसलमानांनी जी संपत्ती पळवून नेली ती संपत्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली. स्वराज्याच्या रक्षणार्थ गडकिल्ल्यांसाठी वापरली. शिवरायांचे हे शौर्य, शिवरायांची ही वीरवृत्ती त्याला मोहनदास करमचंद गांधींनी वाट चुकलेला देशभक्त म्हटले. तर जवाहरलाल नेहरूंनी शिवरायांना दरोडेखोर ठरवले. अत्याचारी या शब्दाचा विचित्र अर्थ लावल्यामुळे शौर्य सुद्धा क्रौर्य ठरविले गेले.

अत्याचाराचा लावलेला चुकीचा अर्थ!

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या कसाबने आणि त्याच्या साथीदारांनी शेकडो लोकांना ठार मारले. पण, त्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी पाकिस्तान विरोधात एक शब्दही उच्चारला नाही किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सैन्य बळाचा उपयोग केला नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे अत्याचाराचा लावलेला चुकीचा अर्थ. १९७१ या युद्धात शस्त्र बळावर आपण पाकिस्तानला पराभूत केले. एवढेच नाही, तर पाकिस्तानच्या ९३,००० सैनिकांना पकडून बंदी बनवले. अशावेळी आपल्याला आपल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण झाले नाही. शत्रूविषयी ममता निर्माण झाली आणि पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग सुद्धा आपण त्यांना परत केला. एवढेच नाही, तर त्यांचे बंदी बनवलेले सैनिक सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची इजा न करता सन्मानाने परत त्यांच्या देशात पाठवले. ते पाठवताना पाकिस्तानने आपल्या ५५ सैनिकांना बंदी बनविले. त्या सैनिकांची सुटका करून घेण्याचे भान आपल्याला राहिले नाही. आजपर्यंत आपल्याला त्यांची सुटका करता आली नाही, याचा खेदही काँग्रेसला वाटत नाही.

पहलगाम मध्ये २२ एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या हत्याकांडाच्या विरोधात विद्यमान भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलली. इंडस वॉटर ट्रीटी रद्द करत पाकिस्तानला केला जाणारा पाणीपुरवठा थांबविण्यात आला. अशावेळी पाकिस्तानविषयी ममता उफाळून वर आली आणि पाकिस्तानचा पाणीपुरवठा अडवणे किंवा तो बंद करणे याला मानवताहीन ठरविण्यात आले. पण, ज्या पाकिस्तानातून आलेल्या जिहादींनी २६ जणांना त्यांचा धर्म विचारून जे हिंदू आहेत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जीव घेतला. त्या अत्याचाराविषयी एकही टीकात्मक अक्षर अथवा त्याचा निषेध करण्याची साधी मानवताही दाखवण्यात आली नाही. उलट असे घडलेच नाही अशी आवई उठवण्यात आली. यामागचे कारण, भारत सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी कंबर कसली, म्हणजे भारत सरकार अत्याचारच करत आहे असा अर्थ लावला गेला.

असा चुकीचा अर्थ लावला गेला तर काय होते, याबाबत सावरकर(Veer Savarkar) याच लेखात लिहितात, ‘माणसाच्या भावभावना शब्दार्थांशी निगडित झालेल्या असल्यामुळे शब्दाच्या उच्चाराबरोबर ती भावना बुद्धीला विचार करण्यास वेळ मिळण्याआधीच तत्काळ त्याच्या मनात उठून त्याच्या कृतीला घेरून टाकते. एखादा नवीन मनुष्य आल्यावर जर कोणी आपल्याला हळूच म्हटले की हा पक्का पाजी आहे. तर तत्काळ पाजीपणाच्या भावनेशी निगडित असलेला तिरस्कार आपल्या मनात निर्माण होतो. त्या माणसाची पारख करण्याच्या आधीच आपले मन किंचित तरी कलुषित होऊन जाते. शब्दाच्या यथायोग्य प्रयोगाचे हे महत्त्व दर्शविण्यासाठी वेदांमध्ये आणि पुराणात स्वर चुकलेल्या अर्थाचा अनर्थ झाला आणि देवांचा घात झाला. अशा कथा वर्णन केल्या आहेत. तशीच स्थिती या अत्याचाराच्या शब्दाचे आणि अर्थाचे स्वर चुकून आपल्या राष्ट्राची गेल्या अनेक वर्षात झालेली होती. अत्याचार वाईट कर्म आहे. तो बळप्रयोगाचा एक भाग आहे. अर्थात, बळप्रयोगात्मक कर्म जे आहे ते सारे वाईट आहे. अशी हेत्वाभासाची विचारसरणी नकळत राष्ट्राचा बुद्धिभ्रंश करून गेली. कर्म अकर्माच्या विनिमयाचा घोटाळा झाला. जे जे बळप्रयोगात्मक कर्म आहे ते सारे अत्याचार म्हणून समजले जाऊ लागले.’

माणसाने आपल्याकडील बळाचा उपयोग दुसऱ्याला उपद्रव देण्याच्या हेतूने केला, स्वार्थी बुद्धीने केला, विद्वेषाच्या भावनेतून केला, दुष्ट हेतू ठेवून केला तर त्याला अत्याचार म्हणतात. पण या अत्याचाराला अडविण्यासाठी जर तसा अत्याचार करणाऱ्याला प्रतिकार करून त्याच्यावर हल्ला चढविला तर त्याला अत्याचार म्हणता येत नाही. अत्याचाराचा नेमका अर्थ सांगताना सावरकर(Veer Savarkar) म्हणतात, ‘बळप्रयोगात्मक कर्म हे दुष्ट हेतूने परपिडक बुद्धीने केले तरच ते अत्याचारी होते. ते कर्म सुष्ट संरक्षणार्थ न्याय बुद्धीने केले तर ते सदाचार होते. म्हणून बळप्रयोग किंवा शक्तीप्रयोग, परपिडाचा उपयोग तोच अत्याचार ही अत्याचाराची व्याख्या आहे. अत्याचार हा नेहमीच निंद्य आहे. पण बळ काही नेहमी निंद्य असत नाही. कारण आततायी बळ हेच काय ते अत्याचार आणि आततायी हाच अत्याचारी होय.’(Veer Savarkar)

दुर्गेश परुळकर
(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक आणि व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.