Veer Savarkar : कृतार्थ मी

Veer Savarkar :      २८ मे स्वातंत्र्यवीर सावरकरां(Veer Savarkar)ची जयंती. खरंतर त्यांचे विचार कालातीत आहेत. शंभर वर्षानंतरही त्यांच्या विचारांचा विचार केला जातो हे महत्त्वाचे. त्यांची दूरदृष्टी, राष्ट्रभक्ती, संस्कृती, लेखन संपदा कोणत्या कोणत्या रूपाने त्यांची आठवण काढावी तेवढी कमीच आहे.

129

Veer Savarkar :      २८ मे स्वातंत्र्यवीर सावरकरां(Veer Savarkar)ची जयंती. खरंतर त्यांचे विचार कालातीत आहेत. शंभर वर्षानंतरही त्यांच्या विचारांचा विचार केला जातो हे महत्त्वाचे. त्यांची दूरदृष्टी, राष्ट्रभक्ती, संस्कृती, लेखन संपदा कोणत्या कोणत्या रूपाने त्यांची आठवण काढावी तेवढी कमीच आहे. खरंतर, प्रत्येक दिवस हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा व्हायला पाहिजे. यानिमित्ताने, एक आठवण लिहिण्याचा प्रयत्न करतेय. पांडुरंग भक्तांना जशी पंढरीच्या वारीची आस असते तशीच आम्हा चौघी मैत्रिणींना अंदमान बघायची तीव्र इच्छा होती. सृष्टी सौंदर्याबरोबरच महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या “त्या” कारावासाची जागा बघण्याची आणि त्यांना मानवंदना द्यायची, या इच्छेमुळे आम्ही जाण्याच्या तयारीला लागलो. दिवस ठरला, तयारी झाली. चेन्नईहून पुढे जाण्यासाठी विमान प्रवास सुरू होताच डोक्यातील विचार चक्र पण फिरू लागले.(Veer Savarkar)

जेवढा अफाट समुद्र तेवढेच स्वातंत्र्यवीर सावरकरां(Veer Savarkar)चं अफाट तेज आणि अचाट धैर्य. त्या धैर्याची साक्ष म्हणून आठवली ती ‘न भूतो न भविष्यती’ अशी मार्सेलीस बंदरावर पोहोचण्यासाठी घेतलेली जीवघेणी उडी. लहानशा जागेतून बाहेर पडताना सगळं अंग खरचटलं होतं. रक्तबंबाळ झालेल्या शरीराला झोंबणार समुद्राचं खारं पाणी, वरून गोऱ्यांच्या गोळ्यांचा वर्षाव पण त्याही परिस्थितीत ध्येय एकच किनारा गाठायचा.!!!

सपासप पाणी कापत जवळ येणारा तो किनारा ..सगळं डोळ्यासमोर दृश्य दिसत होतं.

“अशी ही उडी बघताना कर्तव्य मृत्यू विसरला”
क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला”

 

आणि पुन्हा सिद्ध झालं,

विश्वात आहेत विख्यात बहादूर दोन
जे गेले आईसाठी सागरास ओलांडून
त्या हनुमंतानंतर आहे फक्त
या विनायकाचा मान

 

आणि मनात शब्द घुमू लागले.

अनादि मी अनंत मी अवध्य मी भला
मारील रिपु मजसी असा कवण जन्मला.

पोर्ट ब्लेअर जे अंदमान व निकोबार बेटांचे प्रमुख प्रवेशद्वार मानला जाते, तिथे उतरलो. त्याचं नामकरण वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं झालं आहे. त्या भूमीवर उतरताच क्षणी अथांग समुद्र आणि सावरकरांचा विजनवास याची नियतीने केलेली आखणी मनाला स्पर्शून गेली. ठरल्याप्रमाणे (सेल्युलर जेल)अंदमान कारागृह बघायला पोहोचलो .मोठी पाटी बघताच मनात कालवा कालव झाली. कारण, त्याचा क्रूर भव्यपणा आजही जाणवत होता. दरवाज्यातून आत जाताना मृत्यूच्या दाढेत जात असल्याचा जाणवलं. कारण, मनात आजचं रूप नव्हे तर सावरकरांच्या काळातील भीषणता पक्की रुजली होती. समोरची तेवती मशाल, महाकाय वटवृक्ष वातावरण अधिकच गुढ करत होतं. प्रत्येक गोष्ट बघताना सावरकर बंधूंना झालेल्या शारीरिक यातनांची कल्पना येत होती. अत्यंत बिकट हाल-अपेष्टांमध्ये तात्यारावांना इतकं सुंदर अजरामर काव्य सुचाव, हे आपल्या समजण्यापलीकडचं आहे. ६९८ कोठड्या असलेल्या सात मजली मोठ्या कारागृहात शिरताना सावरकरांच्या मनात विचार काय येतो. तर, एवढ्या भव्य इमारतीत मला राहायला मिळणार, ते ही स्वतंत्र खोलीत!!

आणि पुन्हा राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचे विचार मनात असतातच. स्वातंत्र्य मिळाल्यावर येथेच नौका आणि वायुदलाचा मुख्य तळ असावा. एवढी सुरक्षित जागा प्रमुख कार्यालयासाठी योग्यच असेल. तात्यारावांनी कारागृहात कसे दिवस काढले, हे पण आठवलं. मुस्लिम कैद्याप्रमाणेच हिंदू कैद्यांनाही प्रार्थना म्हणण्यासाठी विशेष वेळ देण्यात यावा, हे फक्त कारण होतं. कारण, त्यानिमित्ताने हिंदूंनी एकत्र यावं आपले विचारांचे आदान प्रदान करावं, हा त्यामागील उद्देश होता. शिवाय, कैद्यांमध्ये हिंदू-मुसलमान भेद कशाला? काही स्थानिक कैदी पण त्या कारागृहात होते त्यांच्यामध्ये पण देशभक्ती रुजावी आणि स्वातंत्र्य काय असतं याचं महत्त्व कळावं म्हणून एकत्रीकरण हा उत्तम उपाय सावरकरांनी योजला होता.

त्यांना राहायला मिळाली होती ती छोटीशी दहा बाय दहाची बॅराक …माणूस दृष्टीस पडणार नाही. पण, फक्त खाडखाड वाजणारे बुटांचे, फटक्यांचे, शिव्यांचे आणि आर्त किंकाळ्यांचे आवाज मात्र त्यांना ऐकू यावेत ही व्यवस्था केली होती. त्याहून कहर म्हणजे नजरेसमोर दिसेल ते फक्त फाशीघर. फाशी देण्यात येणाऱ्यांची धडपड, अगतिकता आणि नंतर निशब्द शांतता…. अत्यंत भयाण वातावरणात पहाट उगवायची आणि कष्ट करत करत रात्र कधी व्हायची ते कधी कळायचंच नाही. शारीरिक यातनांसोबत मानसिक खच्चीकरण करण्याचं पूर्ण क्लेशदायक वातावरण इंग्रज सरकारने सावरकरांसाठी राखून ठेवलं होतं. प्रत्येक पावलागणिक इतिहास मनात डोकावत होता.

आता तिथे कोलू फिरवणारे, काथ्या कुटणारे, छीलका सोलणारे असे पुतळे करून लोकांना दिसावे म्हणून ठेवलेले आहेत. जेथे आपण कोलूचा एकही गोल पूर्ण करू शकत नाही, तेथे त्यांना दिवसभरात कितीतरी पाउंड तेल काढावे लागत असे. वजन कमी भरलं तर खडाबेडी, दंडा बेडीची शिक्षा ही ठरलेलीच. अत्यंत निकृष्ट जेवण त्यामुळे शरीर थकलेलं, कष्टामुळे जीर्ण झालेलं, पण मनाची उभारी मात्र नेहमीच कायम असायची. त्याही परिस्थितीत मातेचा विरह जास्त क्लेशदायक वाटणार होता. आपल्या बांधवांसाठी जीव तुटत होता. अशाही परिस्थितीत अथांग शब्द संपत्तीचा वापर करून महान ग्रंथ, महाकाव्य सुचणारे फक्त सावरकरच असू शकतात. भाषा शुद्धीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. अनेक कैद्यांना लिहिते वाचते केले. दिवाळीमध्ये आपापल्या घरून मिठाई नव्हे तर पुस्तक मागवा असं ते सर्वांना म्हणत. यामागे उद्देश एकच, बाहेरच्या जगात काय चालू आहे हे तुम्हाला समजणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यासाठी तुमच्या मनातल्या निखाऱ्यावर राख जमता कामा नये यासाठी सावरकरांचे प्रयत्न सुरूच होते. सगळं सगळं आठवत होतं. पावलागणिक आठवणारा इतिहास, आठवणींनी वारंवार डोळ्यात येणारं पाणी, हुंदके आवरत नव्हते. पण, ज्या क्रांतीसूर्याने एवढे महान कार्य केलं, प्रत्येक विपरीत परिस्थितीवरही मात केली, त्या प्रत्येक क्षणाबद्दल आपल्या मनात आणि डोळ्यात फक्त आणि फक्त कृतज्ञता असायला हवी. अश्रु वाटे ती वाहून जाऊ नये याची काळजी घेत प्रत्यक्ष सावरकरांना ठेवलेल्या कोठडी जवळ पोहोचलो.

प्रवेश करताना पहिले साष्टांग दंडवत घातले. फुलांनी तिथला उंबरठा पुजला आणि मगच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करावा अशा भावनेने नतमस्तक होऊन आत गेलो. ज्या भिंतीवर अजरामर काव्ये कोरली गेली, त्या भिंतीवरून बोटं फिरवताना देखील एक अनामिक, अद्भुत अनुभूती येत होती. आम्ही सर्वांनी बसून तात्यारावांच्या अनेक कविता म्हटल्या, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या आर्तता आणि आर्जवपूर्ण शब्दांनी प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. स्वातंत्र्य देवीने भारतात यावं आणि तिच्या आगमनाने भारत भूमी पवित्र व्हावी, या उदात्त भावनेने हे शब्द मनावर कोरले गेलेले होते.

‘जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे’ या शब्दांचे बोल ऐकू जाताच अनेक बाकीची मंडळी पण आमच्या सोबत एकत्र आली. गीत संपल्यावर “भारत माता की जय ” स्वातंत्र लक्ष्मी की जय” चा जयघोष एकदम तडाख्यात झाला आणि सेल्युलर जेलच्या भिंती त्याच्या जयजयकाराने थरथरून गेल्या. त्या भिंतींनाही वाटलं असेल बाबा तू कितीही अत्याचार करून सूड उगवून घेतला तरी तात्यारावांच्या नखाची पण सर नाही रे तुला… बघ आजही त्यांचा प्रत्येक शब्द खऱ्या हिंदुत्ववादी हिंदुस्थान्याच्या मनात मशाल बनून कसा धगधगतोय. विद्वत्तेचा महामेरू, धीरोदात्त, त्यागाची परिसीमा पार केलेल्या एका मराठी भाषिक माणसाची स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात समर्पण केलेली सुवर्ण समिधा. संस्कृतचे, मराठी भाषेचे चिंतन, जतन व संवर्धन यांनी सातासमुद्रा पलीकडे राहून केलं. सर्व कष्ट सहन केले फक्त आपल्या भारत मातेला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी..

स्वातंत्र्योत्तर काळातही या महान त्याग मूर्तीला कोणताही विशेष पुरस्कार जाहीर झाला नाही. पण, खरंतर आम्हाला याची खंत नव्हे तर अभिमान आहे. त्यांना समर्पित करावा असा पुरस्कारच निर्माण झालेला नाही. देवाधिदेवांनी पण आद्य पूजेचा मान हा विनायकालाच दिलेला आहे. आणि आजही प्रत्येक घराघरात गणराया असतोच तसेच, या विनायकांचे विचारदेखील पक्के रुजावेत हीच मनोमन इच्छा प्रदर्शित करून, मनाने तृप्त होऊन राष्ट्र प्रेमाची एक वेगळीच नवीन ऊर्जा व अनुभूती घेऊन मी कृतार्थ झाले होते…(Veer Savarkar)

भाग्यश्री करजगावकर
9850754433.
(लेखिका सावरकर अभ्यासक आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.