Veer Savarkar : अखंड हिंदुस्थान की अखंड हिंदूराष्ट्र; प्राथमिकता कशाला?

सावरकरांच्या (Veer Savarkar) दृष्टीकोनातून प्राथमिकता ही हिंदूराष्ट्राला आहे. राष्ट्रीय भावना ही भौगोलिक अखंडतेपेक्षा अधिक टिकाऊ आणि प्रेरक असते. भौगोलिक अखंडता हवी, पण त्यासोबतच राष्ट्रीय अखंडता हवी. म्हणून हिंदूराष्ट्र!

66
Veer Savarkar : अखंड हिंदुस्थान की अखंड हिंदूराष्ट्र; प्राथमिकता कशाला?
  • जयेश मेस्त्री

दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिन पाळला जातो. १९४७ साली आपण अशा लोकांच्या हातात भारताचा एक भाग दिला, ज्यांना राष्ट्र, मानवता या संकल्पना मान्य नव्हत्या आणि आजही मान्य नाहीत. स्वतःच्या राष्ट्राची उन्नती हा त्यांचा मूळ हेतू नसून हिंदुस्थानची व हिंदुंची अधोगती हे त्यांचे ध्येय आहे. गवत खाऊन राहू, पण अणुबॉम्ब तयार करु असं विधान पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी उच्चारलं होतं. त्यावरुन त्यांची मानसिकता आपल्याला लक्षात येते. पाकच्या निर्मितीपासून पाकने भारतावर अनेक अतिरेकी कारवाया केल्या आहेत. या गोष्टीचा भारतीय जनतेला राग आहे. पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि आता अखंड भारत झाला पाहिजे अशी भावना भारतीयांच्या मनात निर्माण झाली. सतत सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या संजय राऊत यांनाही सावरकरांच्या अखंड हिंदुस्थानची आठवण यानिमित्ताने झाली. इथे आपण एक गोष्टी लक्षात घेतली पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकर फाळणीच्या विरोधात होते. त्यांना अखंड हिंदुस्थान हवं होतं. हा महाराष्ट्र सिंधू नदीला मुक्त केल्यावाचून राहणार नाही असंही ते म्हणाले होते. मात्र आजच्या संदर्भात याचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ गीताला अमित शाह यांच्या हस्ते राज्य प्रेरणागीत पुरस्कार प्रदान)

‘राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो!

सावरकर (Veer Savarkar) म्हणतात, ‘राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे अवश्यक आहे.’ आज आपण आपले ध्येय विसरलो आहोत. कॉंग्रेसने हिंदी राष्ट्रवाद स्वीकारल्यामुळे आपण राजकीयदृष्ट्या हिंदी झालो. आपण हिंदू आहोत ते अगदी वैयक्तिक कारणांसाठी. गणपतीत डीजे लावून नाचण्यासाठी आपण हिंदू आहोत किंवा हळद समारंभ गाजवण्यासाठी आपण हिंदू आहोत. पण मुसलमान हे राजकीयदृष्ट्या सुद्धा मुसलमानच राहिले. त्याकाळी सुद्धा आपण हिंदू हे राष्ट्र म्हणून स्वीकारले नाही. हिंदुंच्या या स्वभावामुळे सावरकर उपहासाने म्हणतात, ‘प्रामाणिक आणि भोळसट अशा हिंदुंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुद्धा हिंदुंचे एक राष्ट्र उरते.’ ही गोष्ट आजही हिंदुंना कळलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक लोकांसाठी प्रेमाच्या उकळ्या फुटणाऱ्या अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या होत्या. पाकिस्तान हा आपला शत्रू आहे हे लोकांना ठाऊक आहे. पण तो शत्रू का आहे, हे लोकांना ठाऊक नाही. आपल्यातलं राष्ट्र अजूनही जागृत झालेलं नाही आणि जो पर्यंत आपल्यातलं राष्ट्र जागृत होत नाही, तोपर्यंत आपण अखंड भारत म्हणजेच अखंड हिंदुस्थान निर्माण करु शकत नाही. आपल्याला भूभाग आणि राष्ट्र यातला फरक समजून घ्यावा लागणार आहे.

(हेही वाचा – दापोली नगरपंचायतीत सत्तांतराचा स्फोट! Yogesh Kadam यांची रणनीती यशस्वी; कृपा घाग नगराध्यक्षपदी जवळपास निश्चित)

एक राष्ट्र म्हणून भावना जोपासली पाहिजे!

ज्यू लोकांनी २००० वर्षे भौगोलिक भूमीविना त्यांची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख जपली. त्यांच्या यहुदीत्वाच्या राष्ट्रीय भावनेने त्यांना एकत्र ठेवले आणि १९४८ मध्ये इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली. दुसरे एक उदाहरण म्हणजे आर्मेनियन लोकांनी शतकानुशतके परकीय आक्रमणे (उदा. ऑटोमन साम्राज्य, रशियन साम्राज्य) आणि १९१५ च्या आर्मेनियन नरसंहाराचा सामना केला. त्यांच्या भौगोलिक भूमीचा मोठा भाग त्यांना गमवावा लागला. मात्र आर्मेनियन लोकांनी त्यांची सांस्कृतिक ओळख, ख्रिश्चन धर्म आणि भाषा जपली. १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रिपब्लिक ऑफ आर्मेनियाचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुन्हा जन्म झाला. आपली गमावलेली भूमी परत मिळवायची असेल तर एक राष्ट्र म्हणून भावना जोपासली पाहिजे. आपण हिंदुंनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही भारतभूमी हिंदुराष्ट्र आहे. एक सेक्युलर भूभाग होणं आपण नाकारलं पाहिजे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं बोलताना आपल्याला अभिमान वाटतो. अर्थात पुरोगामी हा शब्द सकारात्मकदृष्ट्या वापरला जातो. मात्र स्वयंघोषित पुरोगामी हा शब्द हिंदू-विरोध म्हणून वापरतात. आपण जेव्हा स्वतःला, राज्याला किंवा राष्ट्राला पुरोगामी म्हणतो तेव्हा आपण हिंदू होणं (राजकीयदृष्ट्या) नाकारतो. म्हणूनच सर्वात आधी आपल्याला राजकीयदृष्ट्या हिंदू व्हावं लागणार आहे.

हिंदू असणं म्हणजे केवळं पूजा, व्रत, सण साजरे करणे नव्हे. अर्थात ते केलेच पाहिजेत. हिंदू असणे म्हणजे अनादी काळापासून या भूमीत जन्मलेल्या त्या सर्व संस्कृतीचे आपण वारसदार आहोत आणि ही भूमी आपल्या हिंदुंच्या मालकीची आहे आणि आपण एक राष्ट्र म्हणून त्या उज्वल संस्कृतीचे पाईक आहोत. आपण ज्या नद्यांचे, तीर्थक्षेत्रांचे, पर्वतांचे स्मरण करतो ते एका प्रांतातले नसून अखंड हिंदुस्थानातले आहेत. सावरकर म्हणतात, ‘हिंदूराष्ट्र हे काही पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडवलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत.’ आज आपल्याला ही मुळे आहेत, त्यांचा विसर पडलेला आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जींनी जिहाद्यांच्या चरणाशी नेऊन ठेवला आहे. तिकडे तामीळनाडूचे स्टॅलिन भाषिक अस्मितेच्या नावाखाली हिंदुंचं विभाजन करत आहेत. दुसरीकडे केरळची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अशा अनेक समस्या गेल्या ७० वर्षांत निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या आधी आपल्याला सोडवायच्या आहेत.

(हेही वाचा – वाढवण बंदर प्रकल्पामुळे मिळणार रोजगारांच्या संधी; Nitesh Rane यांचा मोठा निर्णय)

आपल्याला अखंड हिंदुस्थान हवाच आहे. पण सावरकरांना (Veer Savarkar) अभिप्रेत असलेला अखंड हिंदुस्थान हवा आहे. ती केवळ एक भूमी नसून ते एक राष्ट्र आहे. अखंड हिंदूराष्ट्र आहे. हिंदूराष्ट्राची भावना ही कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवायची आहे, जागृत करायची आहे, मग भौगोलिक अखंडता तात्पुरती गमावली गेली असली तरी एक राष्ट्र म्हणून सर्व हिंदुंनी एका सुरात विजय घोष करायचा आहे. आपण हिंदी नसून आपण हिंदू आहोत हे जगाला ओरडून सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि इतर परकीय सत्तांविरुद्ध स्वराज्य स्थापन केले. त्यांचा लढा हा केवळ भौगोलिक स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर हिंदू संस्कृती आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी होता. त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली, जी सावरकरांच्या हिंदूराष्ट्राशी मिळतीजुळती आहे. सावरकरांनी शिवरायांच्या या कार्याला हिंदूत्वाच्या राष्ट्रीय भावनेचे प्रतीक मानले. सावरकर म्हणतात, ‘आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदू साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदुंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे.’ सावरकरांच्या दृष्टीकोनातून प्राथमिकता ही हिंदुराष्ट्राला आहे. राष्ट्रीय भावना ही भौगोलिक अखंडतेपेक्षा अधिक टिकाऊ आणि प्रेरक आहे. भौगोलिक अखंडता हवी, पण त्यासोबतच राष्ट्रीय अखंडता हवी. म्हणून हिंदूराष्ट्र!

(लेखक स्तंभलेखक आणि वक्ता आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.