कोकणात पुन्हा होतेय या वन्य प्राण्याची तस्करी

119

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आतापर्यंत सहा वेळा खवले मांजराच्या तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरीतील देवरुख येथे २५ वर्षांच्या तरुणाला खवले मांजराच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली. लॉकडाऊन नंतर कोकणात खवले मांजराच्या तस्करीत वाढ होत असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी दिली.

आरोपी अटकेत 

या तस्करीबाबत पोलिसांना टीप मिळाली होती. मुळात हा सर्राईत गुन्हेगार नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. ललित सावंत असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी खवले मांजर स्वतःच्या ताब्यात घेऊन नंतर वनविभागाकडे सुपूर्द केले. खवले मांजर हे वाळूतील मुंग्या खातो, त्यामुळे बचावातून किंवा तस्करीतून सुटलेल्या खवले मांजराला कित्येक दिवस उपाशी ठेवले जाते. या खवले मांजराची तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता तो शारिरीकदृष्ट्या योग्य स्थितीत आढळून आला. त्यामुळे त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती दिली गेली.

नवख्या तस्करीचोरांमुळे चिंता वाढली

खवले मांजराच्या तस्करीच्या गुन्ह्यात कित्येकदा मोठी साखळी आढळून येते. चोरी ते तस्करीच्या घटनाक्रमांत वेगवेगळे आरोपी सामील असतात. मात्र आता नवे आरोपी दिसून येत असल्याने वनविभागाची चिंता वाढली आहे. खवले मांजराचे मांस चिनी औषधांमध्ये वापरले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तस्करीखोरांची मोठी साखळी खवले मांजराच्या तस्करीमागे असते.

खवले मांजराची तस्करी हा गुन्हा

कोकणात खवले मांजराची गेली कित्येक वर्ष तस्करी होत आहे. याबाबत चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र या पर्यावरणप्रेमी संस्थेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतर खवले मांजराच्या तस्करीच्या घटना कमी होऊ लागल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांत खवले मांजराच्या तस्करीच्या घटना पुन्हा वाढू लागल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे सांगतात. खवले मांजर हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार पहिल्या वर्गवारीत मोडतो. त्यानुसार खवले मांजर बाळगण्यास, शिकार तसेच तस्करी हा वनगुन्हा ठरतो. याप्रकऱणी सात वर्षे शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडही ठोठावला जाऊ शकतो. खवले मांजर हे कायद्यानुसार संरक्षित आहे. त्याबाबतचे दंड आणि नियम याबाबत वनविभागाने कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी केली.

( हेही वाचा: अखेर एलाॅन मस्क बनले ट्वीटरचे मालक; 44 अब्ज डाॅलरचा झाला करार )

—–
खवले मांजराची तस्करी किंवा शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यास वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकाला फोन करा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.