स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’अभियानांतर्गत घरोघरी ध्वज फडकवण्यात येणार आहेत. तसेच मालाडपासून बोरीवलीपर्यंत तिरंगा राष्ट्रध्वजासह पदयात्रा काढण्यात येणार आहे. तब्बल १.२५ कि.मी. लांबीचा तिरंगा ध्वज असून या ध्वजासह मालाड नटराज मार्केट ते बोरीवली स्वामी विवेकानंद पुतळा या ठिकाणापर्यंत ही राष्ट्रध्वज पदयात्रा येत्या रविवारी १४ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. या राष्ट्रध्वज पदयात्रेत १.२५. कि.मी. लांबीचा तिरंगा ध्वज असेल आणि महाराष्ट्रात एवढ्या लांबीच्या ध्वजासह काढली जाणारी ही पदयात्रा प्रथमच होत असल्याचा दावा आयोजक असलेले भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे.
तिरंगा पदयात्रेचे आयोजन
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे. या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध राजकीय पक्षांकडूनही कार्यक्रम केले जात आहे. या अनुषंगाने चारकोपमधील भाजपचे आमदार योगेश सागर यांनी येत्या रविवारी १४ ऑगस्ट रोजी तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे. या तिरंगा पदयात्रेला रविवारी सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ होणा आहे. एकूण १.२५ कि.मी. लांबीचा राष्ट्रध्वज असून पाच हजार महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच दहा हजार नागरिक यात सहभागी होणार आहे.
( हेही वाचा : ‘मिशन झीरो ड्राॅप आऊट’ मध्ये भीषण वास्तव; 2700 मुलांचे शिक्षण बंद )
या तिरंगा पदयात्रेला मालाड एस.व्ही. रोड नटराज मार्केटपासून सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ होईल आणि बोरीवली स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ या तिरंगा पदयात्रेचा समारोप होत होईल,असे आयोजक आमदार योगेश सागर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या पदयात्रेत सर्व देशभक्त नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन योगेश सागर यांनी केले आहे.