राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव…

92

भायखळा येथील राणीबागेत अनेक वर्षानंतर वाघाने जन्म घेतला. उद्यानात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या करिश्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीला गेल्या वर्षी बालदिनाच्या दिवशीच बछडा झाला. उद्यानात पेंग्विनपाठोपाठ आता वाघांच्या जोडीनेही नव्या पिल्लाला जन्म दिला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात आनंदाचे वातावरण आहे. मंगळवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मादी बछड्याला ‘वीरा’ असे नाव दिले आहे.

२००६ साली राणीबागेने उद्यानातील शेवटचा वाघ गमावला. त्यानंतर राणीबागेला उतरती कळा लागली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नव्या नियमावलीनुसार, राणीबागेने कात टाकली आणि नव्या रचनेत राणीबाग पुन्हा तयार झाली. दोन वर्षांपूर्वी जवळपास संपूर्ण पिंज-याचे काम संपल्यानंतर औरंगाबादहून शक्ती आणि करिश्मा ही वाघाची जोडी राणीबाग प्रशासनाने आणली. या दोघांनाही सुरुवातीला मिसळण्यासाठी लॉकडाऊन काळातही मदत झाली. आजूबाजूला माणसांचा वावर कमी असल्याने त्यांना नव्या जागेतही चांगलेच मिसळता आले. त्यांच्यातील मिलनाच्या हालचालींवर उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून होते. तब्बल ९० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर करिश्माने एका बछड्याला जन्म दिला. त्यामुळे नवे वाघ आणून उद्यानात प्राण्यांची संख्या वाढवण्याचा राणीबाग प्रशासनाचा उद्देश सफल झाला.

राणीबागेतील शेवटचा वाघ २००६ साली तर शेवटचा सिंह २०१४ साली मृत्यू पावला. त्यामुळे उद्यानात वाघ, सिंहाची डरकाळी बंद झाली होती. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर मुंबईकर झालेल्या करिश्मा आणि शक्ती या वाघाच्या जोडीला पाहण्यासाठी मुंबईकरांनी पसंती दिली होती. १ नोव्हेंबर रोजी राणीबाग सर्वांसाठी खुली झाली. मात्र त्यावेळी करिश्मा गरोदर असल्याची बातमी फुटू नये, याची पूर्णपणे राणीबाग प्रशासनाने खबरदारी घेतली. तसेच बछड्याच्या जन्मानंतरही करिश्मा आणि बछडा बराच काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली बंदिस्त होते.

नवी वाघीण सुखरुप…

वाघीण करिश्मा आणि ‘वीरा’ सुखरुप असून, बछडा आता दोन महिन्यांचा झाला आहे. वाघीण करिश्मा तिच्या बछड्याची व्यवस्थित काळजी घेत असून, बछड्याची वाढ उत्तम आहे. ‘वीरा’सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाईल. सध्या तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या उपस्थितीत केवळ प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी आहे.

जाणून घ्या ‘वीरा’च्या पालकांबाबत…

१२ फेब्रुवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डनर प्राणिसंग्रहालयातून करिश्मा आणि शक्ती या बंगाल वाघांची जोडी राणीबागेत आणली गेली. या जोडीच्या मिलनाने उद्यानाला नवी मुंबईकर वाघीण मिळाल्याने प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.