राज्यात मानवनिर्मित वणवे

117

राज्यात उन्हाळ्याच्या ऋतुमानात वणव्याचे प्रमाण वाढते. मात्र हिमालच प्रदेशासारख्या पर्वतरागांमध्ये नैसर्गिक वणवे लागतात. राज्यातील संपूर्ण भागांत वणवे माणसाकडूनच लावले जात असल्याची माहिती अमरावती येथील व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांनी दिली. पुणे वनविभागाकडून आयोजित वन वणवा परिषदेत त्या बोलत होत्या. अमरावतीतील मेळघाटात वणव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरली जाणारी मनुष्यबळ समायोजनाची कार्यपद्धती पुणे वनविभागाकडूनही राबवली जाईल, अशी माहिती पुणे वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक एन प्रवीण यांनी दिली.

ड्रोन तसेच सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून जंगल भूभागावर नजर

मध्य प्रदेशाला लागून असलेल्या ३ हजार ६०० चौरस किलोमीटर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वणवे लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत ब-याच प्रमाणात कमी झाले आहे. ड्रोन तसेच सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून जंगल भूभागावर नजर ठेवली जात आहे. शिवाय वॉकीटॉकी आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जंगल परिक्षेत्रात काम करणारे वन्यजीव विभागातील वनाधिकारी तसेच प्रादेशिक विभागातील वनाधिकारी माहिती मिळताच घटना समजल्यानंतर पाच ते वीस मिनिटांच्या अवधीत घटनास्थळी आग विझवायला दाखल होतात. दोन्ही शाखांमधील समन्वयकातून आग विझवण्याचे काम सुरु असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. हा मुद्दा पुढे नेत पुण्यातील प्रादेशिक आणि वन्यजीव विभागात कार्यरत वनाधिका-यांनाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आणले जाईल, अशी माहिती एन प्रवीण यांनी दिली.

खासगी भूखंडातील आग विझवणे आव्हानात्मक

मात्र मेळघाट आणि पुण्यातील भूभागात फरक असल्याने पुणे महानगरपालिका तसेच खासगी मालमत्तेतील भूखंडधारक यांच्या समन्वयाचे मोठे आव्हान पुणे वनविभागासमोर उभे आहे. खासगी मालमत्तेतील वणव्यांच्या सत्रांवर नियंत्रण आणणे आव्हानात्मकच असल्याची कबुलीही पुणे वनविभागाकडून दिली गेली. सिंहगड येथे नुकतीच लागलेली आग आठवडाभर विझली नव्हती अशी गड किल्ले संवर्धनाचे सदस्य प्रसाद डांगर पाटील यांनी तक्रार दिली. ही जागा खासगी भूखंडातील होती, असे स्पष्टीकरण पुणे वनविभागाकडून दिले गेले. मात्र वणवे विझण्यासाठी स्थानिक संस्था, निसर्गप्रेमी या सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे वनविभागाने केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.