‘शिवछत्रपती’ स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीरांचे आदर्श

124

ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात  समर्थ आणि सक्षमपणे लढा देत असतांना समस्त क्रांतिकारकांच्या समोर आदर्श होता तो सतराव्या शतकात एक सामर्थ्यसंपन्न हिंदू राजसत्ता पाच इस्लामी राजसत्तांना टक्कर देऊन निर्माण केली त्या शिवछत्रपतींचा. १६३० ते ८० या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात कनाहीन, प्रचंड भेदरलेल्या व आत्मविश्वास गमावलेल्या स्वकियात स्वाभिमान निर्माण करून संघर्ष करण्यासाठी त्यांना सिद्ध करणे व या कनाहीन पराभूत मनोवृत्तीच्या समाजात प्राण भरून त्यांच्यात असे आत्मतेज निर्माण केले की त्या अठरापगड जातीच्या मावळ्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्या रोमारोमात जे स्वराज्यप्रेम निर्माण केले. त्या अथक प्रयत्नातून  हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्याची इतिहासकारांना जागतिक पातळीवर नोंद घ्यावी लागली. जगावर राज्य करणाऱ्या बलाढ्य शक्तीसाठी छत्रपती शिवाजी एक कोडे होते.

हे विराट कार्य करीत असताना आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण अत्यंत कौशल्याने वापरून तत्कालीन सामान्य माणूस त्यांनी संस्कारित केलाच पण भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक नियोजनाचे भांडारच उपलब्ध केले. महाराजांचा इहलोकाचा प्रवास संपून ३४३ वर्ष झाली. पण आजही फक्त त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात वीरश्री निर्माण होते. यानंतरही हजारो वर्षे ही अनुभूती प्रत्येक मराठी माणसाला येत राहणार. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्यलढा देतांना शिवचरित्राचे पारायन करून त्यांच्या यशाचे रहस्य जाणून घेणे क्रांतीकारकांना गरजेचे वाटत होते. अन्यायी व अत्याचारी ब्रिटिश साम्राज्यशाहीविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती. शिवछत्रपतींच्या न्याय नीती व धर्मावर आधारित असलेल्या स्वराज्याविषयी त्यांच्या मनात आकर्षण व आपुलकी व नितांत आदर होता. ब्रिटिश राजवट अहिंसेने संपविता येणारच नाही. त्यासाठी साम, दाम, दंड व भेद या एकत्रित मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे याची खात्री त्यांना पटली होती. सत्य आणि धर्म दोन्ही संकल्पना अमूर्त आहेत. त्याचे रक्षण शस्त्रबलाने व बाहुबलाने केले तरच शत्रूला धाक निर्माण होतो. पराक्रमाचा इतिहास जर भावी पिढ्यांच्या समोर असला तरच पराक्रमी  पिढ्या निर्माण होतील. नुसता भेकडांचा जमाव संकट येताच शेपूट घालून लपून राहण्यासाठी सुरक्षित बिळ शोधत असतो व शत्रूच्या हाती लागल्यावर शेळ्यांमेंढ्यासारखा कापला जातो किंवा चामडी वाचविण्यासाठी स्वराज्य विघातक कृत्य करतो. हा इतिहास आमच्या विस्मरणात जाता कामा नये. आदर्श समाज केवळ प्रार्थना करून किंवा नामस्मरणातून निर्माण होत नाही. त्याला पराक्रमाची जोड असणे अत्यंत आवश्यक असते.

( हेही वाचा: हिंदूंना जाज्वल्य प्रेरणाशक्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज! )

महाराजांनी अत्यल्प काळात मानवी गुणवत्तेतील बुद्धिमत्ता, श्रम, कौशल्य यांचा विकास करून उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य उपयोग केला. बलाढ्य साम्राज्यशाहीच्या दृष्टीने ज्या वस्तू टाकाऊ आहेत त्या वस्तू त्यांच्या दृष्टीने युद्धसामग्री होती. त्यामुळेच त्यांच्या नियोजनाचा सूक्ष्म अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी त्यांना ‘व्यवस्थापन गुरू’ असे संबोधले आहे. त्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता आपल्याला चकित करते. मनुष्याची उत्तम परीक्षा असणारे शिवराय, मनुष्याचे सद्गुण, दुर्गुण, दुर्बलता, बलस्थाने, निष्ठा, कौशल्य, गुणवत्ता याची निश्चित पारख करून त्या व्यक्तीचा स्वराज्यासाठी काय उपयोग करून घेता येईल? याचा अचूक निष्कर्ष काढून त्याची निष्ठा तपासून त्या व्यक्तीत समर्पणभाव निर्माण करणे. त्यादृष्टीने त्याला प्रवृत्त करण्यासाठी या शिवप्रभूकडे असणारे अचूक शब्दभांडार. जबाबदारी पेलण्याची व्यक्तितील क्षमता, इच्छाशक्ती ओळखण्याची दिव्यदृष्टी, आपल्याला हवा असलेला माणूस शत्रूपक्षात असला तरी त्याला आपले करण्याचे कसब, शारीरिक सामर्थ्यावर न्याय नीतीचा अंकुश नसेल तर माणसातील राक्षसी प्रवृत्ती प्रबळ होतील. तो उन्नत होण्याऐवजी उन्मत्त होईल. सदाचार, सत्कर्म विसरेल. तसे झाले तर स्वराज्य व यवनसाम्राज्यात भेद तो कोणता? शिवछत्रपतींना स्वराज्यातून मानवतेचा विकास करावयाचा होता. बुद्धिमान, पराक्रमी, सामान्य व कसबी मनुष्यबळ स्वराज्यासाठी कसे उपयोगात आणावे? त्यावर अंकुश ठेवून त्यांच्या निष्ठा अबाधित ठेवण्याचे मार्ग शिवचरित्र दाखविते.

मोजक्या सामुग्रीने बलाढ्य मोघल साम्राज्यशाहीशी संघर्षाचा विचार करणे म्हणजे त्या कालावधीत सर्वात अगोदर आपल्याच माणसासमोर आपले हसे करून घेणे. हा अनुभव त्यांना सुरवातीला स्वकीयाकडूनच येवू लागला. प्रचंड इच्छाशक्ती व पराक्रम गाजविण्यासाठी अनेक पर्याय निर्माण करणे. दूरदृष्टीकोण, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सम्यक विचार करून निर्णय घेणे, शिवचरित्रातील हे विलोभनीय दर्शन आहे. अतिशय कार्यमग्न आणि जोखमीचे जीवन जगत असतांना आपली संस्कृती, भाषा, परंपरा जोपासत जेष्ठ, ज्ञानी, तपस्वी यांच्याविषयी आदर, सर्वसामान्याबद्दल जिव्हाळा, आपले इप्सित निश्चित करून ते गाठण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन, त्यासाठी अचूक मार्ग निवडून, योग्य साधनांचा वापर करून कार्यसिद्धी गाठण्यासाठी योग्य माणसाची निवड, पशुप्रेम, साधुसंतांबद्दल वंदनीय भाव, पण ढोंगबाजीला थारा नाही. किल्ले बांधणीतील विशेष कौशल्य, जरूर तिथे आक्रमकता पण पराभवाची शक्यता दिसत असेल तर तात्कालिक माघार व परत संधी मिळताच पुन्हा चढाई, सवांद कौशल्य, स्वरातील हुकूमत. शत्रू आणि मित्र यामधील विवेक, शत्रू प्रदेशातील अचूक भौगोलिक आकलन. घोडदळ, पायदळ व नौसेना याचे ज्ञान, राजकीय असाधारण खेळी खेळतांना शत्रूला त्याचा थांगपत्ताही लागू नये असा बेमालूम धुर्तपणा. स्वराज्यातील शत्रूवर व शत्रूराज्यावर नियंत्रण ठेवून शांतचित्ताने केलेला प्रचंड खटाटोप, अपयश पचवताना दाखविलेला संयम, अचूक निर्णय घेण्याचे प्रसंगावधान, शत्रूच्या दरबारात चढ्या आवाजात प्रगट केलेला मराठी  स्वाभिमान, निर्भयता, तेजस्विता, शत्रूची पुरती दिशाभूल करण्यासाठी पवित्र उद्देशाने प्रसंगपरत्वे केलेले असत्याचरण. सत्य आणि असत्याचा मर्यादा व सामर्थ्याचे उत्तम आकलन. संकटातही अविचलता. अनेक दिग्विजयानंतरही जाणीवपूर्वक जोपासलेली तटस्थता, ‘राजा हा उपभोग शुन्य स्वामी आहे’ हे तत्व लक्षात घेऊन नेहमीच प्रजाहितदक्ष निर्णय घेण्याची तत्परता. जे जे उत्तम व उदात्त असेल ते ते स्वीकारण्यासाठी विचारांची लवचिकता. स्वभावातील संवेदनशीलता व प्रसंगी काळाचाही थरकाप उडेल अशी आक्रमकता. धर्म रक्षणासाठी गाजवलेला अपूर्व पराक्रम, प्रत्येक प्रसंगी आत्यंतिक सावधानता. दृष्टी, स्वर व देहबोलीवर असलेले विशेष नियंत्रण, तल्लख स्मरणशक्ती, अफाट आकलन शक्ती, तेजस्वी बुद्धी व प्रचंड क्षात्रतेज. ‘हे हिंदवी राज्य व्हावे हे तो श्रीची ईच्छा.’या स्पष्ट शब्दात उच्चारलेली शुद्ध, निरहंकारी, सात्विक, ईश्वरपरायणताल. असे सहस्रावधी सद्गुण प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करून त्या प्रमाणे शून्यातून विश्व निर्माण केल्याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे शिवचरित्र. शिवरायांच्या बालमनावर जिजाऊकडून होणारे संस्कार अत्यंत मोलाचे होते. एका माऊलीने आपल्या पोटच्या गोळ्याला कसा आकार द्यावा आणि स्वराज्यनिर्मिती करून हिंदवी स्वराज्यची स्थापना कशी करावी? याचे उत्तम उदाहरण म्हणजे या माय लेकराचे नाते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपले ध्येय शिवराय विसरू शकले नाही. ध्येयाचा सदोदित पाठलाग, प्रतिकुलतेतून साधनांची उपलब्धतता. ध्येयाच्या आड येणारा हा स्वकीय की परकीय याची तमा न बाळगता अशा नराधमांना आपल्या मार्गातून त्यांनी बाजूला केले. स्वराज्य, न्याय, नीती व धर्मावर आधारलेली राज्यनिर्मिती. त्याचे रक्षण व संवर्धनासाठी प्रचंड लोकसंग्रह, लोकांच्या सद्गुणांचा व पराक्रमाचा स्वराज्यासाठी निरंतर उपयोग व्हावा यासाठी प्रेमाच्या सूत्रात प्रत्येक स्वराज्यप्रेमी बांधून ठेवणे त्यांची योग्य ती दखल घेऊन त्यांचा गौरव करणे. त्यांच्याशी ऋणानुबंध घट्ट करणे. स्वराज्य रक्षणासाठी जे धारातीर्थी पडले त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या वारसदारांना सैन्यात सहभागी करून घेणे. प्रजेचा आपल्या लेकरासारखा सांभाळ करणे. तो संस्कार त्यांच्यानंतरही त्या निष्ठावान मावळ्यांना प्रेरणा देत राहिला.

रक्तात हरामी असणारे स्वकीय असले तरी त्यांना संपविणे त्यांना आवश्यक वाटले. स्वराज्य शत्रूला माफी मुळीच दिली नाही. त्यामुळे गनिमांचा नायनाट हा मंत्र मावळ्यांना मिळाला. शत्रूचे मतपरिवर्तन करण्याचे आत्मघातकी प्रयोग त्यांनी कधीच केले नाही. स्वराज्यात सत्याची वृद्धी, स्वत्वाची जाणीव, निष्ठेचा संस्कार, रयतेत सुरक्षा हमी, सामाजिक शांतता व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावयाची असेल तर स्वराज्यातील शत्रूबीज अगोदर संपविलेच पाहिजे. अत्यंत सुस्पष्ट आणि निर्णायक विचारांची अंमलबजावणी त्यांनी आपल्या  जीवनात केली. त्यामुळे शत्रू मित्रभेद निश्चित झाले. शक्ती, युक्ती, कुटनीती सारे पणाला लावूनही यशाची शक्यता नसेल तर शत्रूचा शत्रू तो आपला काही कालावधीचा मित्र मानून त्याची मदत घेऊन शत्रूस धडा शिकवावा. राजनीती करीत असताना शत्रूशी धादांत खोटे बोलावे व शक्य होईल त्या मार्गाने त्याला पुरते हैराण करावे. ही कुटनीती त्यांना खूप महत्त्वाची वाटली. स्वराज्य लढा देतांना सशस्त्र क्रांतिकारकांनी शिवचरित्र हा गुरुग्रंथ मानाला. त्यामुळेच सशस्त्र लढा देणारे क्रांतीकारक संख्येने कमी असले तरी बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यशाहीला पुरते हैराण करण्यात ते यशस्वी ठरले. आपल्या मातृभूमीचे शोषण करणाऱ्या नराधमासाठी शांतीची भाषा कामाची नसते. हे विषारी साप दिसता क्षणी ठेचायचे असतात. हा गुरुमंत्र क्रांतीकारकांना शिवचरित्रातून मिळाला. शत्रूच्या सुमधुर मधाळ भाषेवर कधीच विश्वास ठेवायचा नसतो. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना साथ देऊनही त्या बदल्यात आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड आणि देशवासीयांच्या पदरी अमानुष अत्याचारच मिळत असतील तर आम्ही आमची नीती बदलली पाहिजे हा संदेश देणारे सुभाषचंद्र आणि अन्य समस्त क्रांतीकारक शिव चरित्राला गुरुग्रंथ समजत होते.

स्वतंत्र भारतातही राष्ट्रविरोधी कार्य करणारा व्यक्ती, समूह कितीही बलाढ्य असले तरीही त्यापेक्षा राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम महत्वाचे हा संदेश समस्त भारतीयांना शिवचरित्र देते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.