Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन
२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा जयंती दिवस. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण, विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सावरकर विचारांच्या प्रचार-प्रसारात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुंबईचे भूतपूर्व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
लेफ्ट. कर्नल अनिल अर्स (वीरचक्र), आय.आय.टी. मुंबईचे संचालक डॉ. मिलिंद अत्रे, डॉ. विजय सखाराम जोग, वैद्य चिंतामण नारायण साठे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम जागृत केले तसेच स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांच्या विरोधात लढताना सैनिकी शिक्षणाचा आग्रह धरत त्याचे महत्त्व पटवून दिले. सैनिकीकरणाविषयी वीर सावरकर यांनी मांडलेले विचार कालातीत आहेत. आजही वारंवार त्याची प्रचिती येत असते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार दिला जातो.
वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विज्ञानवादाचा पुरस्कार केला. देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची आवश्यकता असल्याचे विचार वीर सावरकर यांनी मांडले. याच विचाराच्या अनुषंगाने विज्ञान क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार दिला जातो.
यंदाच्या वर्षी शौर्य पुरस्कार ४थी बटालियन, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे लेफ्ट. कर्नल अनिल अर्स (वीरचक्र) यांना प्रदान करण्यात येणार आहे. विज्ञान पुरस्कार आय.आय.टी. मुंबईचे संचालक डॉ. मिलिंद अत्रे यांना देण्यात येणार आहे. तसेच सावरकर विचार प्रसारक डॉ. विजय सखाराम जोग आणि वैद्य चिंतामण नारायण साठे यांना स्मृतिचिन्ह पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रविवार, २५ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार – २०२५ चे वितरण करण्यात येणार आहे.
‘मृत्युंजय सावरकर’ नाटकाचे सादरीकरण
शनिवार, २४ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता वीर सावरकर यांच्या तेजस्वी जीवन आणि कार्यावर आधारित एकपात्री नाटक ‘मृत्युंजय सावरकर’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. ‘मृत्युंजय सावरकर’ या नाटकाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अनिल शेंडे आहेत, तर सिने नाट्य कलाकार अनिल पालकर हे या नाटकातील कलाकार आहेत. वीर सावरकरांवरील (Veer Savarkar) कवितांचे वाचनही अनिल शेंडे करणार आहेत.
२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचा जयंती दिवस. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २४ आणि २५ मे हे दोन दिवस वरील दोन्ही कार्यक्रम स्मारकातील सावरकर सभागृहात होणार आहेत. यावेळी भूतपूर्व पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्नील सावरकर हेही सोहळ्याला उपस्थित असतील.