BJP : भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन

121

भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते, आमदार तथा माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाच्या आजाराने शुक्रवारी, ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अकोल्यात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. अकोल्यातून सलग २९ वर्षे त्यांनी भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला होता. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ते कार्यरत होते. गोवर्धन शर्मांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते. जवळपास १५ दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथून अकोला येथील त्यांच्या घरी आणले होते. आज रात्री प्रकृती चिंताजनक होऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरी हितचिंतकांची एकच गर्दी झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, कृष्णा व अनुप ही दोन मुले, सून, नातवंडासह मोठे आप्त परिवार आहे.

(हेही वाचा Maratha Reservation : आता कुणबी नोंदी शोधण्याचे काम राज्यभर होणार; मुख्यमंत्र्यांचा काय आहे ऍक्शन प्लॅन?)

भाजप (BJP) वाढविण्यात आमदार गोवर्धन शर्मा यांचा मोठा वाटा होता. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे ते निकटवर्तीय होते. अकोलेकरांच्या सुख-दुःखात धाऊन जाणारे व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. ब्राह्मण समाजातील ते ज्येष्ठ नेते होते, भगवान परशुराम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ते निस्सीम भक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी म्हणून त्यांची विशेष ओळख होती. डाबकी मार्गावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.