उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यात झालेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी संबोधित केले.

239
उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाने भू-राजकीय सीमा ओलांडल्या पाहिजेत. जगातील सर्व मुले आणि तरुणांना सर्वांगीण शिक्षणाचा फायदा होईल, तसेच तरुण पिढी 21 व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज असेल हे आपण सर्वांनी एकत्रित येऊन सुनिश्चित केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पुण्यात झालेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी संबोधित केले.

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली, जी-20 सदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला, जी-20 सदस्य देशांच्या मंत्र्यांसह 80 प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि युनिसेफ, यूनेस्को तसेच ओईसीडी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा पायाच उभा नाही, तर शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.” भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘अर्थ समजून वाचन तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ‘निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनी देखील, ‘पायाभूत साक्षरता आणि आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या विषयावर कालबद्धरित्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

(हेही वाचा – Monsoon : प्रतीक्षा संपली! पावसाच्या स्वागतासाठी देश तयार; ‘या’ राज्यांना मिळणार दिलासा)

ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, “स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस” किंवा ‘स्वयं’ ह्या ऑनलाईन शिक्षण मंचाचा त्यांनी उल्लेख केला. ह्या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.34 दशलक्षाहून अधिक जणांची नोंदणी आणि 9000 हून अधिक अभ्यासक्रमांसह, हे एक अतिशय प्रभावी शिक्षण साधन बनले आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. त्यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे शालेय शिक्षण देण्याचा उद्देश असणाऱ्या ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग’ किंवा ‘दीक्षा पोर्टल’चाही उल्लेख केला. दिक्षा पोर्टलद्वारे 29 भारतीय आणि 7 परदेशी भाषांमध्ये शिक्षण घेता येते आणि या पोर्टलद्वारे आतापर्यंत 137 दशलक्षाहून अधिक जणांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आहेत. भारताला आपला हा अनुभव आणि संसाधने विशेषत्वाने ग्लोबल साऊथमधील देशांबरोबर सामायिक करण्यात आनंद वाटेल हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

उद्घाटन सत्रात शिक्षण मंत्री, जी-20 देशांचे प्रतिनिधी आणि युनेस्को, युनीसेफ तसेच आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेच्या (OECD) अधिकार्यांचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले. जी-20 च्या भारतीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिक्षण कार्य गटाने शिक्षणाची सर्वांना उपलब्धता, गुणवत्ता आणि परिणाम सुधारण्यासाठी संयुक्त कृती करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी याप्रसंगी केला.

शिक्षण आणि कौशल्य विकासात केलेली गुंतवणूक ही मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक असल्याचे ते म्हणाले. ज्ञान, कौशल्ये तसेच सामाजिक-आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि आयुष्यभर शिकण्याच्या संधींद्वारे अधिक न्याय्य आणि समृद्ध जगाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-20 सदस्य आणि आमंत्रित देश एकत्र आले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

2023 मधील जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीतील फलनिष्पत्ती , धोरणात्मक दिशानिर्देश आणि वचनबद्धतेचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ब्राझीलच्या आगामी जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी भारत पाठिंबा देईल असे आश्वासनही त्यांनी दिले. शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्राझीलसोबत काम करण्यास तयार असून जी-20 शिक्षण कार्य गट व्यासपीठाला सकारात्मक बदलाचे आश्रयस्थान बनवू, असेही ते म्हणाले.

जी-20 भारतीय अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील सहयोगी कृती मंत्रिस्तरीय प्रतिबद्धतेच्या पलीकडे गेली असून शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेमध्ये पसरलेल्या 5.2 कोटी भागधारकांचा सहभाग दिसून आल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. यातून‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेत भर दिल्याप्रमाणे ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेला मूर्त रूप मिळत असल्याचे ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.