Veer Savarkar यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित ‘मृत्युंजय सावरकर’ एकपात्री नाटकाचा प्रयोग

या नाटकाचे लेखक अनिल शेंडे यांनी १ तास १० मिनिटांच्या या नाटकाच्या माध्यमातून वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे संपूर्ण जीवन कार्य प्रभावीपणे मांडण्याचा त्यांनी उत्तम प्रयत्न केला.

86

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित एकपात्री ‘मृत्युंजय सावरकर’ नाटकाचा प्रयोग करण्यात आला. वीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात हा नाट्यप्रयोग झाला. लेखक, कवी, निर्माता आणि दिग्दर्शक अनिल शेंडे लिखित व सिने कलाकार अनिल पालकर अभिनयित ‘मृत्युंजय सावरकर’ या वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या एकपात्री नाटकाला प्रेक्षकांनी यावेळी भरभरून प्रतिसाद दिला.

या नाटकाचे लेखक अनिल शेंडे यांनी १ तास १० मिनिटांच्या अवधीत वीर सावरकर यांचे संपूर्ण जीवनकार्य अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. साधे सूट सुटीत नैपथ्य, प्रभावी प्रकाश योजना आणि संगीत यामुळे हा प्रयोग अतिशय उठावदार झाला. या नाटकाची प्रकाश व्यवस्था किशोर बत्तासे यांनी केली, नेपथ्य अभिषेक बेल्लारवार, रामजीलाल यांनी रुपसज्जा केली. नाटकाला श्याम देशपांडे यांनी संगीत दिले. तर अनिल पालकर यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांची भूमिका प्रभावीपणे साकारली.

(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखात झाला संपन्न )

यावेळी लेखक अनिल शेंडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला प्रतिक्रिया देतांना नाटकाचा संपूर्ण प्रवास सांगितला. आपण लहानपणापासून विविध लेखकांनी वीर सावरकरांवर (Veer Savarkar) लिहिलेली चरित्रे वाचली आहेत. त्यांच्यापासून जी प्रेरणा मला मिळाली त्यातून मी वीर सावरकरांचा भक्तच झालो. मी वीर सावरकरांवर अनेक कविता लिहिल्या आहेत. वीर सावरकरांच्या (Veer Savarkar)  कार्यापासून लोकांना देशभक्तीची प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे त्यांचे चरित्र सर्व वयोगटापर्यंत पोहचायला हवे. या उद्देशाने मी या नाटकाचे लेखन केले. या नाटकाचा शनिवारी, २४ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २५वा प्रयोग झाला. पहिला प्रयोग नागपूरमध्ये ‘संस्कार भारती’च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नागपुरात ८ ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले, विदर्भातही अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग झाले. पुण्यातही झाले. या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. प्रख्यात प्रवचनकार सुनील चिंचोलकर यांनी तर ‘आपण आजवर वीर सावकरांवरील पाहिलेल्या नाट्यकृतींपैकी ही नाट्यकृती सर्वश्रेष्ठ आहे’, असे म्हटले होते. ही आपल्यासाठी महत्त्वाची प्रतिक्रिया आहे, असे अनिल शेंडे म्हणाले.

तर या नाटकात वीर सावरकर यांची भूमिका केलेले अनिल पालकर म्हणाले, या नाटकावर आम्ही जवळजवळ १ वर्ष अभ्यास केला. आधी हा प्रयोग आम्ही लाईव्ह करायचो, नंतर तो आम्ही ध्वनिमुद्रित केला. कारण छोट्या गावांमध्ये वीर सावरकरांचे (Veer Savarkar)  विचार पोहोचवायचे होते. या नाटकाचे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही याचे प्रयोग व्हावेत अशी आमची इच्छा आहे. कारण वीर सावरकर प्रत्येकापर्यंत पोहोचावेत, असा उद्देश आहे. कारण वीर सावरकर शाळेतही शिकवले जात नाहीत आणि समाजात कुणी सांगत नाही. म्हणूनच वीर सावरकर आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून आमचा हा प्रयत्न आहे, असे पालकर म्हणाले.

वीर सावरकरांवरील कविता केल्या सादर

या प्रसंगी नाटकाचे लेखक अनिल शेंडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Veer Savarkar) लिहिलेल्या अत्यंत तेजस्वी आणि रोमांचित करणाऱ्या कविता सादर केल्या. त्यातील एक पुढीलप्रमाणे…

सावरकर ! तुम्ही चुकलात !

कधी कधी मला मनापासून वाटते कि,
सावरकर ! तुम्ही चुकलात ! खरंच चुकलात !

काय गरज होती तुम्हाला त्या क्रांतिकार्याच्या फंदात पडण्याची !
घरादारावर तुळशीपत्र ठेऊन ,
सर्वशक्तिमान ब्रिटिशांच्या देशात जाऊन त्यांनाच आव्हान देण्याची !

अंदमानच्या त्या नरकयातना भोगायची ,
घाण्याच्या बैलासारखा कोलू फिरवण्याची !
दोन कटोरे खाऱ्या पाण्यात अंघोळ नि गोमा, किडे, सापसळ्यांचे तुकडेयुक्त निसत्व अन्नावर जगायची !

बरं, तुम्ही ही एकच चूक केली नाही !
तर, अक्षरशः चुकांवर चुका केल्यात !

तुमची सर्वात मोठी चूक म्हणजे भारतात जन्म घेण्याची !
दुसरी ब्राम्हण ज्ञातीत जन्म घेण्याची !
तिसरी क्रांतिकार्यात पडण्याची !
चवथी हिंदुत्वाचं तत्वज्ञान मांडण्याची !
अशाच अजून कितीतरी, कितीतरी !

हे सर्व करण्याऐवजी जर तुम्ही रविंद्रनाथांप्रमाणे केवळ कविताच करत बसते, तर त्यांच्याइतकेच मोठे कवी म्हणून जगविख्यात झाला असता !

किंवा,

आंबेडकरांप्रमाणे केवळ अस्पृश्यता निवारण आणि जात्युच्छेदनाचे कार्य करत बसता ,तर कदाचित ,
शा फु आ च्या मांदियाळीत तुम्हीही बसला असता ! ,

किंवा,
लोकमान्यांसोबत काँग्रेसच्या राजकारणात गेला असता, तर कदाचित, भारताच्या राजकीय क्षितिजावर गांधीजींचा जन्मही झाला नसता !

कदाचित तुम्ही भारताचे पहिले राष्ट्रपती आणि भारतभाग्यविधाते ठरला असता ! आणि,
कोणीही तुमच्यावर माफीवीर, रिक्रुटवीर , असले हलकट आरोप कदापिही केले नसते !
तुमच्या देशभक्तीवर कधीही , कोणीही

प्रश्नचिन्ह लावले नसते !
आज तुम्हाला शिव्याशाप देणारे हेच वराह तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते !

आणखी एक सावरकर,
भारताऐवजी तुम्ही जर
एखाद्या युरोपीय देशात
किंवा अमेरिकेत वगैरे जन्मता,
तर, तो देश तुम्हाला अक्षरशः
डोक्यावर घेउन नाचला असता!
त्याने तुमचा प्रचंड गर्व बाळगला असता,
त्या देशाचे तुम्ही सर्वोच्च महानायक
ठरला असता!

कारण,

शेक्सपीयरची प्रतिभा, चर्चीलची मुत्सद्देगिरी, माझिनीचे संघटनकौशल्य, गॅरिबॉल्डीचे शौर्य, ऍ रिस्टॉटलची विद्वत्ता, लिंकनची करुणा या साऱ्या साऱ्यांचा एकत्रित आविष्कार होतात तुम्ही !

पण आम्ही मात्र तुमच्या
या सर्व दैवी गुणांची
अक्षरशः माती केली हो !
अक्षरशः माती केली !

आणि म्हणूनच मी म्हणतोय ,
सावरकर ! तुम्ही चुकलात !
खरंच चुकलात ! खरंच चुकलात !

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.