- प्रमोद वसंत बापट
हे सिंधुसरिते ! आज तुझ्या प्रवाहावर ह्या चैतन्याच्या लाटा उचंबळताना दिसताहेत. जणू आकाशात आपले सहस्र कर उंचावून तू आनंदघोष करते आहेस. वेगवती तर तू होतीसच पण आज तुझ्या आवेगात उल्हासाचं नर्तन आहे, जयगीताचं गुंजन आहे.
कशाचा हा उत्फुल्ल उल्हास.. आनंद ?
आम्हांला ठाऊक आहे ऐन वसंतात जसा तरुराजीवर नवपर्णांच्या रोमांचांनी डहाळी डहाळी तरारून जाते. फुलांच्या पालख्या मोहरून येतात. त्या बहराची प्रतिबिंबे तुझ्या पात्रात दिसावीत तसाच उफाळ, उन्माद तुझ्या धारेत दिसून येतो. तीर्थरूप हिमालयाकडून वरुणकृपेचं जलधन मिळविणाऱ्या तुला वसंतकाळात वितळणाऱ्या हिमातून पित्याच्या पुन्हा पुन्हा द्रवणाऱ्या काळजातून जलसंचयाचा उपहार प्रतिवर्षीच मिळतो.
पण आजचा तुझा आवेग वेगळा आहे. तुझ्या तुषारातून जयनादाची आवर्तने दुमदुमताहेत. हरवलेलं श्रेयस पुन्हा गवसावं असा उत्कट आनंद तुझ्या प्रवाहातून नाचतो आहे.
तुझं असं राजस रूप आम्ही किती किती दशकात पाहिलेलं नाही. तुझ्या रूपलावण्याला ग्रासून टाकणारं ग्रहणच आम्ही कितीतरी वर्षे निरूपायाने पाहतो आहोत. खरं तर तुला पाहण्याचं आम्ही वर्षानुवर्षे विसरून जाण्याचं पातकच करीत होतो. तुझी पुण्यधारा आजही आमच्या मातृभूमीला तोषविते आहे ह्याचंच आम्हांला अक्षम्य विस्मरण झालं होतं. आणि हे सारं अघटित कुण्या परेच्छेने घडलं नव्हतं. दुर्दैवाने ते आम्हीच आमच्या ह्या अभद्र हातांनी केलं होतं. सत्ताप्राप्तीच्या उन्मादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही युगानुयुगे कुणीही न केलेला अमंगल व्यवहार आम्ही केला होता. होय.. व्यवहारच. बाजारभाषेत धंदा केला होता. आम्हांला सत्तेचं सिंहासन मिळतं आहे तर त्याची किंमत आम्ही तुलाच परकं करून चुकविण्यासाठी धजावलो. किती मोठा अपराध केला आम्ही..
पण तू आम्हीच आखलेल्या सीमेबाहेरून तू वाहत राहिलीस. दोन्ही काठ भिजवित राहिलीस. ते काठ तुझ्या नेत्रांची प्रतिरूपे तर नव्हती ?
तुझ्या जीवनधारेवर तुझ्या संततीचे.. म्हणजे आमचे.. आम्हां भारतीयांचे, हिंदूंचे शत्रू पोसले जात होते. आपल्या मुलांच्या पातकी वैऱ्यांची सेवा प्रत्यक्ष मातेलाच करावी लागावी ह्याहून नरकयातना काही वेगळ्या असतात? जणू तेही पुरेसे नव्हते म्हणून आम्ही आमचं निर्लज्जपण आणखी वाढवित नेत त्या शत्रूशी हातमिळवणी करून आजही आमच्या मातृभूमीतून वाहणाऱ्या तुझ्या जलसंपदेच्या मोठ्यातल्या मोठ्या वाट्याचं अर्घ्य आम्ही अरिहस्तावर हसत हसत सोडलं. तू अधिकच कष्टी झालीस. पण आम्हांला आमच्या सत्ताद्युताची अनावर धुंदी चढली होती. आमच्या मायविक्या मर्दुमकीने फुशारून जात आम्ही आमच्या अमंगल औदर्याचा डंका विश्वभर पिटत होतो.
विश्व आम्हांला हसलं असेल. कदाचित त्यांना ह्याचं सार्थकही वाटलं असेल की सिंधुतीरावर तेजोपासना करणाऱ्या ह्या कालजयी परंपरेच्या पाईक म्हणविणाऱ्या भारतीय.. हिंदू समाजाला आपण यशस्वीपणे तेजोहीन केलं. दुष्कृत्य करण्यासाठी बाध्य तर केलंच पण ते दुष्कृत्य आहे ह्याचे भानही शिल्लक ठेवलं नाही.
पण तू ह्या भूमीत मुरविलेलं सत्त्व… त्याचं काय झालं?
तुझ्या तीरावरून ऋषिमुनींनी केलेल्या सामगायनांचे गुंजणारे स्वर इथे मंद झाले. हिंदुकुशाच्या गिरीकंदरातून वीरवरांच्या रथचक्रांनी, युद्धमान अश्व-गज दलांनी उडविलेली विजयतिलकासारखी शोभणारी धूळ झाडांच्या माथ्यांवरून ओघळून गेली. राजा दाहिराने केलेली पराक्रमाची शर्थ विफल झाली. खैबरखिंडीतून उसळत येणाऱ्या गर्वोन्नत सिकंदरराला परतवून लावणाऱ्या वीरांच्या पलटणी नव्याने येणाऱ्या झुंडींशी झुंजत राहिल्या, राघोभरारीच्या समशेरींनी शत्रूला अटकेपार पिटाळून जरीपटका फडकवला पण पुढे विजयाने गुंगारा दिला. गांधार तर दुरावलाच. पाषाणातील बुद्धप्रतिमा सारा विनाश पहात होत्या. त्यांचा मानवी जीवनाला उन्नत करणारा संदेश कुणाच्या कानीही पडू नये असा इतका मूर्तिभंजकांनी असा कल्लोळ माजविला होता.
पण तू दिलेलं सत्त्व नि:शेष झालेलं नव्हतं. ते दृष्टीआड झालं होतं, केलं गेलं होतं.
आमच्या नेतृत्वाने नुकताच तुला दूर केलं होतं, तुझा लिलाव करून बदल्यात सत्तापद मिळवलं होतं. तेव्हाही तुझ्या तीरावर शतकानुशतके रुजलेल्या, वसलेल्या तुझ्या मायबहिणी, पोरंलेकरं, कर्ते सवरते गृहस्थ साऱ्या साऱ्यांनी त्याच भूमीत उध्वस्त होत असताना तुझ्याधारेकडे अशक्त आशेने पाहिलं होतं. कुणी कुणी आपला जीव, शील वाचविण्यासाठी तुझ्या कुशीत स्वतःला झोकून दिलं होतं. कुणाकुणाच्या संसाराच्या राखुंडीने तुझा पदर काळवंडून टाकला होता. राख वाहून नेता नेता त्यानेच झाकून गेल्याने स्वतःच्या कुपुत्रांनी केलेल्या अश्लाघ्य अवहेलनेने अवमानित झालेला तुझा चेहरा कुणालाच दिसला नसेल का ?
पण नाही. हे सिंधुसरिते, तिथे आणि तिथून कितीतरी दूर कावेरी-कृष्णेच्या, गंगे-गोदेच्या आणि तुझ्या सर्वच सरिताभगिनींच्या तीरी वसलेल्या हजारो हिंदू हृदयात तुझ्या नावाचं, तुझ्या प्रभावाचं स्पंदन सुरू होतं.
त्याचेच एका वीराने आपल्या ओजस्वी स्वरात उच्चारण केलं. उच्चरवाने केलं. दिवस होता ११ मे १९५२. स्थळ होतं पुण्यातील पर्वती तळ्याजवळच उभारलेलं क्रांतिस्मृती नगर. निमित्त होतं स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीचा केतू उभारणाऱ्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेच्या सांगता सोहोळ्याचं. आणि तुझं जयगान करणारा तो वक्ता होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !
अध्यक्षस्थानी होते सेनापती बापट. त्यांच्या भाषणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक प.पू. गोळवळकरगुरुजींनी आपल्या भाषणातून “क्रांतिकारकांना माथेफिरू म्हणत शहाणपणाचा आव आणणाऱ्यांना राष्ट्रभक्तीची उग्रता सहन होत नाही” अशा शब्दांत तत्कालीन सत्ताधीश कुपुत्रांचं पितळ उघडं केलं.
त्यानंतर स्वतः स्वातंत्र्यवीरांनी (Veer Savarkar) क्रांतीच्या वणव्यात आपल्या जीवनाची, यौवनाची होळी केलेल्या एकेका वीराचा परिचय करून, त्यांना सन्मानित केलं. आणि ते भाषणाला उभे राहिले. अभिनव भारताचे लक्ष्य आणि पराकाष्ठेने मिळविलेल्या बहुतांश भूमीच्या स्वातंत्र्याविषयी बोलता बोलता सावरकरांच्या वाणीतून हे सिंधुमाते, तुझंच गौरवगान निनादू लागलं.
ब्रिटिशांना पराभूत करून आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानाच्या स्थापन महाराज्यातील मुक्त पुण्यक्षेत्रांचं स्मरण करता करता स्वातंत्र्यवीर (Veer Savarkar) तीर्थधारांचं स्मरण करू लागले. ‘गंगेच यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती l’ हा श्लोकार्ध म्हणून पुढे ‘नर्मदे सिंधु…’ उच्चारल्यावर चटका लागल्यासारखे थबकले. थरारत प्रश्न करू लागले, ” ह्या पुण्यसरितांत सिंधु आज कोठे आहे ? कोठे आहे सिंधु ?”
“आपल्या ह्या महाराज्यात आज सामावलेली नसलेली सिंधु अंतरलेली मात्र नाही. कुणी सोमेगोमे आमच्यावर रागावतील म्हणून आम्ही सिंधुस विसरू ? ते अशक्य आहे. साऱ्या जगाने आमचा द्वेष केला तरी आम्ही सिंधु सोडणार नाही, तिला विसरणार नाही. कारण सिंधुवाचून हिंदू ! म्हणजे अर्थावाचून शब्द ! प्राणांवाचून कुडी ! अशक्य.. अशक्य..!! जोवर एकतरी हिंदू जिवंत आहे तोवर तो सिंधुस विसरणे शक्य नाही…”
त्यानंतर विनायकवाणीतून जणू अंत:सलीला सरस्वती वाग्देवी बनून तुझं सूक्त गाऊ लागली. “हे अंबितमे, नदीतमे, देवितमे सिंधु ! हे सुरसरिते सिंधु आम्ही तुला कधीही विसरणार नाही ”
पुढे महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या आणि अटकेपार जयध्वजा मिरविणाऱ्या हिंदूंच्या, महाराष्ट्राच्या विजिगिषु पराक्रमाची गाथा सांगत पुन्हा एकवार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) हे सिंधुसरिते तुला अभिवचन दिलं, जणू प्रतिज्ञाच केली, संकल्पच सोडला.. “हा आमचा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा मुक्त केल्यावचून राहणार नाही..!”
हे देवी सिंधु! तरीही तुझ्या कुपुत्रांची कुकर्मे थांबली नाहीत. विभाजन आणि नंतर निरूपायाने प्राण वाचवून भारतात आलेल्या हिंदूंच्या संपत्तीग्रहणासंबंधी करार करण्यासाठी ८ एप्रिल १९५० ला पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली भारतात येणार असल्यामुळे त्या काळात सुरक्षेचे कारण सांगून ४ एप्रिललाच सावरकरांना अटक करून बेळगावच्या हिंडलगा कारागृहात ९९ दिवस कोंडले होते. कारण त्यांच्या मुखातून पुढे स्फुरलेल्या सिंधुसुक्ताचं भय ह्या राष्ट्रद्रोही कुपुत्रांना आधीपासूनच छळत असावं.
हे सिंधुमाते ! तोडून दिलेल्या भूमीतील तू अंतरली होतीसच, पण आता अजूनही मायभूमीतून वाहणाऱ्या तुझ्या प्रवाहाचं सौख्य भारतपुत्र अनुभवत होते. विश्वशांतीचे बिरुद मिरविण्यासाठी ते सौख्यही हिरावून घेणाऱ्या नेहरुंनी १९ सप्टेंबर १९६० ला कराचीला तुझ्याच तटावर बसून पाकिस्तानी अध्यक्ष आयुबखान ह्यांच्याबरोबर तुझ्या पाण्याच्या सौद्यावर निर्लज्ज स्वाक्षरी केली.
पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) सिंधुसूक्त स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय साहित्यातील एक अजरामर चैतन्यपान झालं आहे. त्याच चैतन्याच्या बळावर उण्यापुऱ्या चव्वेचाळीस वर्षांतच १९९६ मध्ये लालकृष्ण अडवाणीजींनी तुझ्या उत्सवाची… सिंधुदर्शन महोत्सवाची योजना आखली. एकच वर्षाने तिची कार्यवाही होऊन आता प्रतिवर्षी हे सिंधुसरिते, तुझा उत्सव होतो. तुझी लाडकी बाळं तुझ्या तीरावर एकत्र येतात, तुझी आरती करतात, तुझं तीर्थ प्राशन करतात, तुझ्या कुशीत बागडतात, सुस्नात होतात.
हे देवी, तुझं पात्र, तुझी धारा, तुझं अवघा जलप्रपात आमच्याकडुन हिरावून घेऊनही शत्रुचा विखार शमला नाही. तुझ्या अमृतजलाचा त्या म्लेंच्छांवर काहीही परिणाम झाला नाही. ते बंदुका परजून भारताच्या सीमेत घुसतच राहिले. त्यांना आश्रय देणारे घरभेदी त्यांनी शोधले होते. त्यांच्याच आश्रयाने जिहादी आतंक सुरू असलेला तूही अगतिकतेने पाहिलास. पण गेल्याच महिन्यात २२ एप्रिलला पहलगामच्या प्रशस्त पठारावर अमानुष जिहाद्यांनी जणू अखेरचा.. जिव्हारी लागावा असा घाव घातला. त्या अधम हातांनी तुझ्या लेकीसुनांच्या कपाळीचं कुंकू पुसलं.
त्या अधमांनी “कोण आहेस?” असं दरडावून विचारत ज्याच्या मुखातून हिंदू.. म्हणजेच तुझं, तुझ्यामुळे मिळालेलं नाव उच्चारताच उरात गोळी घातली.
हे मायसिंधु, प्राण सोडणाऱ्या त्या प्रत्येकाच्या मुखात अंतिम शब्द तुझ्याच स्मरणाचा होता. ते तुझंच नाम घेत अंतिम यात्रेला निघून गेले. म्हणूनच त्यांचे तर्पण करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांनी तुझ्या पुण्यजलाला निंद्य नेहरू करारातून विमुक्त केलं. ते पापबंधन धुडकावून लावलं. होय आई ! आता तू सर्वस्वी आमची झालीस. खरं तर तू होतीसच पण आम्हीच भ्रांतीचे गुलाम होतो. भ्रांतीचं पातकी पारोसपण आम्ही पांघरून बसलो होतो.
दि. ११ मे १९५२ च्या अभिनव भारत सांगता समारोहातील भाषणात सिंधुसुक्ताचं उच्चारण करण्याआधी त्याच भाषणात स्वातंत्र्यवीरांनी (Veer Savarkar) जणू ह्या पुण्यकार्याचं पुण्याहवाचन करून ठेवलं होतं. सावरकर म्हणाले होते, “हे ध्यानात ठेवले पाहिजे की मिळविलेल्या महान विजयाचे उत्सव वा सांगता समारंभ हे पुढे मिळवावयाच्या राष्ट्रीय विजयांचे, राष्ट्रकार्याच्या पूर्ततेचे संकल्प समारंभही असतात.”
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यवीरांच्या वचनाची जणू पूर्तता केली. एका राष्ट्रकार्याची संकल्पपूर्ती केली.
म्हणूनच हे सिंधुसरिते, माते ! आता अत्यंत अभिमानाने मान उंचावून आम्ही तुझा जयजयकार करू शकतो. आणि तुझ्याबरोबरच तुझ्या मुक्तीचा संकल्प आमच्या प्राणामनात रुजविणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही जयजयकार करू.
कारण आता आम्ही पापमुक्त झालो आहोत. आम्ही आमची सिंधुमाता मुक्त केली आहे.
सिंधुमातेचा विजय असो !
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो!!
(लेखक सावरकर विचार अभ्यासक आहेत.)
Join Our WhatsApp Community