New Year 2024 : या वर्षी आपले अर्थविषयक जग कसे बदलेल?

लोकांचा कल २०५० पर्यंत जगातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याकडे आहे. त्यामुळे आर्थिक विकासही असाच असला पहिजे जो शाश्वत असेल आणि पर्यावरणपूरक असेल. गुंतवणूक करतानाही याचाच विचार केला जाईल.

210
New Year 2024 : या वर्षी आपले अर्थविषयक जग कसे बदलेल?
New Year 2024 : या वर्षी आपले अर्थविषयक जग कसे बदलेल?
  • ऋजुता लुकतुके
आपल्या पैशाच्या व्यवहारांमध्येही येत्या दिवसांत आधुनिक तंत्रज्ञान येणार असेल आणि इथंही कृत्रिम बुद्धिमत्ता घुसणार असेल तर त्याचे काय परिणाम आपल्यावर होणार आहेत? मूळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि फिनटेकचे नवीन प्रयोग कुठल्या स्वरुपात होणार? हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया…
बँकांची स्पर्धा फिनटेक कंपन्यांशी
आतापर्यंत पैसे ठेवण्याचा, बचत करून ते साठवण्याचा आणि गुंतवणूक करुन ते वाढवण्याचा सुरक्षित पर्याय म्हणून आपण बँकेकडे बघत होतो. गरज पडली तर कर्जाऊ पैसे उभे करण्यासाठी बँकेची मदत घेत होतो. पण, येणाऱ्या दिवसांमध्ये तरुण, जेनझी ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी बँकांची स्पर्धा इतर बँकांशी किंवा बँकेतर वित्तीय संस्थांशी नसेल तर ती असेल फिनटेक कंपन्यांशी.
कारण, पैसे चलनाच्या स्वरुपात बँकेत साठवण्याची तुम्हाला कदाचित गरजच पडणार नाही. डिजिटल रुपी, डिजिटल वॉलेट या माध्यमातून पैसे तुम्ही डिजिटल रुपात कुठेही साठवून ठेवू शकाल आणि ते फिनटेक कंपनीच्या माध्यमातूनच वापरू शकाल आणि ही वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. २०२४ मध्ये ई-वॉलेट्सचं महत्त्व वाढलेलं तुम्हाला दिसेल, रुपया अधिक जास्त प्रमाणात डिजिटल होईल आणि पैशाच्या देवाण घेवाणीसाठी बँका नाही तर डिजिटल ॲप तुम्हाला जास्त सोयीची वाटतील.
बँकाही होतील व्हर्च्युअल
आता थ्री-डी बँकिंग ॲप आणि तुमच्या गरजा समजून घेऊन तुम्हाला सेवा देणारी पर्सनलाईज्ड ॲप निघाल्यामुळे बँकांचं बहुतेक काम व्हर्च्यु्अल जगात परिवर्तित होईल. अशी थ्री-डी बँकिंग ॲप निघायला सुरुवातही झाली आहे. तिथे तुमच्यासमोर बँकेचं थ्री-डी रुप उभं राहतं. तुम्ही कळ दाबून किंवा योग्य तो पर्याय निवडून आभासी जगात पाहिजे त्या काऊंटरवर जाता. पण, तुमचं काम मात्र प्रत्यक्षपणे होत असतं. वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बँका आधीच अस्तित्वात असलेल्या अशा थ्री-डी सुविधांचा आसरा मोठ्या प्रमाणावर घेतील. या ॲपमध्ये रोबो सदृश एक व्यक्ती तुमच्याशी संपर्कात असते आणि तुमचे व्यवहार पार पाडायला ती मदतही करते. त्यामुळे पर्सनलाईज्ड सेवेचा आनंद तुम्हाला यात मिळतो.

(हेही वाचा – Mumbai ATS Raid : बोरिवलीतील गेस्ट हाऊसमधून ६ जणांना शस्त्रांसह अटक)

कृत्रिम बुद्धिमत्तेचा बँक व विमा क्षेत्रातही समावेश

फिनटेक हे असं तंत्रज्जान आहे जिथे तुमचा पैसा हाताळणं, वापरणं, बचत करणं आणि गुंतवणं या कामात तंत्रज्ञान तुम्हाला मदत करतं. फिनटेक कंपन्यांनी आता अशा मदतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर सुरू केला आहे. अमेरिकेत तर वेल्स फार्गो, ब्लॅकरॉक, सिटी ग्रुप अशा बँकांनीही एआय आधारित मॉडेल आणली आहेत. इथं ग्राहकांची सवय, गरज आणि स्वभाव ओळखून एआय प्रणाली तुम्हाला गुंतवणुकीचे पर्याय सुचवते. ग्राहकांना फार विचार न करायला लावता, थेट उत्तर मिळत असल्यामुळे लोकांचा यावर विश्वासही बसताना दिसतो आहे. अगदी नवीन विमा योजना तयार करतानाही कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन लोकांच्या गरजा समजून घेतील. आणि त्याप्रमाणे योजनेतील अटी, शर्तींमध्ये बदल करतील.

क्रिप्टोचलन व डिजिटल रुपया

२०२४ मध्ये तरुणांचं लक्ष क्रिप्टोवर असणारच आहे. भारतातही क्रिप्टोवर कर असला तरी रिझर्व्ह बँकेनं बंदी आणलेली नाही. आधुनिक तंत्रज्ञान, जगाच्या एका कोपऱ्यात बसून कुठल्याही एक्सचेंजमध्ये व्यवहार करण्याची मुभा व लवचिकता यामुळे तरुणांचा क्रिप्टोकडे ओढा वाढणार आहे. अर्थात, क्रिप्टो गुंतवणुकीतील धोके व जोखीम ओळखूनच त्यात गुंतवणूक करावी असा सल्ला ‘हिंदुस्थान पोस्ट’ देत आहे.

पर्यावरणपूरक विकास
लोकांचा कल २०५० पर्यंत जगातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याकडे आहे. त्यामुळे आर्थिक विकासही असाच असला पहिजे जो शाश्वत असेल आणि पर्यावरणपूरक असेल. गुंतवणूक करतानाही याचाच विचार केला जाईल. पर्यावरणपूरक उपक्रमांकडे लोकांचा ओढा असेल. येणारे बदल हे सेवेचा अनुभव, उपलब्धता, घराच्या कोपऱ्यात बसून काम करण्याची सुलभता यावर अवलंबून असतील. यातल्या काही बदलांची सुरुवात २०२४ पासूनच होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.