रेल्वे प्रवासाच्या धडपडीसंगे युद्ध आमुचे सुरू… जिंकू किंवा मरू…

109

भारतातील पहिली प्रवासी रेल्वेसेवा १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर आणि ठाणे या दरम्यान सुरु झाली याला आता १६९ इतकी वर्षे झालेली आहेत. ही रेल्वे सेवा इंग्रजांना त्याचा व्यापार विस्तार करण्यासाठी आवश्यक होती म्हणून त्यांनी सुरु केली. यात मुंबईचे शिल्पकार असलेले जगन्नाथ शंकरशेठ मिरकुटे उर्फ ‘मुंबई चे नाना शंकरशेठ’ म्हणून ज्यांना ओळखले जाते त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे. मूळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याचे निवासी असलेल्या नाना शंकरशेठ यांनी भारतीय रेल्वेच्या विस्तारासाठी आपली अमाप संपत्ती आणि सोन्यासारखी अमूल्य जमीन त्यावेळेस दान म्हणून दिलेली आहे. हा संदर्भ सुरवातीला एवढ्यासाठीच कारण आज १६९ इतक्या वर्षानंतरही मुरबाड गावात रेल्वे सेवा पोहोचलेली नाही आहे हे अतिशय दुर्दैवाचे आहे.

रेल्वे विषयी समस्या लिहिण्या अगोदर काही तथ्य माहित करून घेणे आवश्यक आहे…

भारतीय रेल्वे जाळे (नेटवर्क) हे आशियातील सर्वात मोठे तर जगात दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे आहे. भारतीय रेल्वेचे एकंदर १९ प्रादेशिक क्षेत्र ( झोन्स ) आणि ७० विभाग ( डिव्हिजन्स ) आहेत. परंतु आपल्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा जी सध्या मुंबई विभागात समाविष्ट आहे ती सर्वाधिक प्रवासी उत्पन्न देणारी सेवा आहे. कोविडच्या पूर्वी सुमारे ४५ लाखांहून अधिक प्रवासी रोज या सेवेवर अवलंबून होते आणि सद्य स्थितीत कोव्हीडोत्तर काळातही तेवढेच लोक पुन्हा या सेवेचा लाभ घेत आहेत.

समस्यांची मांडणी व त्याचं विश्लेषण समजून घेऊन त्यावर उपाय सुचवण्यासाठी सुरवातीला आपण मध्य रेल्वे (हार्बर विस्तार अंतर्भूत करून) चा विचार करू व नंतर पश्चिम रेल्वेचा. मध्य रेल्वे वर कसारा ते सीएसटी, खोपोली ते सीएसटी, पनवेल ते सीएसटी (हार्बर लाईन ) व ठाणे ते वाशी-पनवेल (ट्रान्स-हार्बर लाईन) असा विस्तार आहे. या सगळ्या मार्गावर मिळून एकंदर ८७ उपनगरीय रेल्वे स्थानके आहेत. यात सीएसटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, पनवेल, सीबीडी बेलापूर, वाशी, वांद्रे अंधेरी, गोरेगाव आदी जास्त गर्दीची स्थानके आहेत. येथे सकाळ-संध्याकाळी विशिष्ट कालावधीत प्रवासी गर्दी खूप प्रमाणात जास्त असते. येथे उतरून पुन्हा दुसरी गाडी पकडण्यासाठी धावपळ कसरत करणाऱ्या प्रवाशांची संख्याही खूप आहे. त्यामुळे विशिष्ट वेळी स्थानकावरील गर्दी आणि त्यावेळी उपलब्ध गाड्यांची संख्या याचे तर्कशुद्ध प्रमाण गणित जमून येत नाही. त्यामुळं प्रवासी अक्षरशः खचाखच भरलेल्या गाडीत लोंबकळत, लटकत प्रवास करत असतात.

कल्याण जंक्शन

कल्याण हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्या व उपनगरीय गाड्यांसाठी कल्याण रेल्वे स्थानक हा महत्त्वाचा थांबा. संपूर्ण भारतातून मेल-एक्स्प्रेस गाड्या येथे येतात. सुमारे ४ लाखांहून अधिक प्रवासी येथून रोज प्रवास करतात. कल्याण व नजीकच्या उपनगरांतील लोकसंख्येच्या प्रचंड विस्तारामुळे आणि मुंबईला जोडणारी पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे उपनगरीय रेल्वेवर प्रचंड ताण आहे. रेल्वेची स्वतःची जागा आणि साधन-संपत्ती असूनही केवळ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच प्रवाशांच्या अनास्थेमुळे रेल्वे साधन-संपत्तीचा आणि जंक्शनचा परिपूर्ण वापर होत नाही.

New Project 29

भलेमोठे रेल्वे यार्ड, तेथे टाकलेले लोहमार्ग, सरळ दक्षिणेकडे (पुण्याच्या दिशेने) आणि उत्तरेकडे (नाशिकच्या दिशेने) जाऊ शकणारे लोहमार्ग असूनही उपलब्ध ८ उपनगरीय फलाटांवरच मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी थांबा दिलेला आहे. त्यातच मेल-एक्स्प्रेस गाड्या आणि सुट्टी विशेष गाड्या कायमच उशिराने धावत असल्याने त्याचा उपनगरीय गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होतो. त्याच वेळी अस्वच्छता आणि गर्दीचा त्रास, वाढती गुन्हेगारी यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कल्याण पुढील म्हणजे उत्तरेकडे कसारा आणि दक्षिणेकडे कर्जत/खोपोली उपनगरीय गाड्या व मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग नसून केवळ दोन पदरीच मार्ग असल्याने गाड्यांच्या क्रॉसिंगचा नेहमीच खोळंबा होत असतो. त्यासाठी कोणतेही नियोजन केले जात नाही. रेल्वेच्या एकंदरीतच अनागोंदी कारभारचे दर्शन येथे घडते.

मध्य रेल्वेच्या कल्याण पुढच्या म्हणजे खोपोली, कर्जत, बदलापूर गाड्या डोंबिलवलीपर्यंत अगदी बरोबर वेळेत येतात. त्यानंतर मात्र त्या कल्याणला पोहोचेपर्यंत रखडतात. कारण एक तर त्यांना कल्याणला फलाट उपलब्ध नसतो. त्यानंतर दोनच ट्रॅक्स उपलब्ध असल्यामुळे क्रॉसिंगसाठी थांबावे लागते. या सगळ्या पार्श्वभूमीवर इथल्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांचा रेल्वे प्रवासातील अडचणी आणि उपाय योजना यात सहभाग वाढायला हवा. त्याच वेळी रेल्वे प्रशासनानेही येथे लक्ष देणे गरजेचे आहे.

मेल यार्डात मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र दोन मोठे फलाट केले तर एकाच वेळी ४ मेल-एक्स्प्रेस गाड्या तेथे उभ्या राहू शकतील; ज्या थेट विठ्ठलवाडी दिशेने पुण्याकडे, दक्षिणेकडे आणि शहाड दिशेने नाशिककडे, उत्तरेकडे जाणाऱ्या उन्नत लोहामार्गांचा वापर करून त्या त्या दिशेला नेता येतील. त्यामुळे पुन्हा एकदा क्रॉसिंगचा प्रश्न उपस्थित होणार नाही. रेल्वेच्या यार्डाचा / जागेचा पूर्णतः वापर केल्यास उपनगरीय दैनंदिन आणि मेल-एक्स्प्रेसचे प्रवासी यांच्या गर्दीचे विभाजन व नियोजन होण्यासाठी यंत्रणा तयार होऊन गर्दीचे नियोजन होईल.

ठाकुर्ली टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच इच्छा आहे. त्यामुळे कल्याण उपनगरी मार्ग व स्थानकावरील ताण कमी होण्यास मदतच होईल.

या बाबतीत आणखीन काही होऊ शकणारे उपाय

ठाकुर्ली टर्मिनसमधून निघणारी मेल-एक्स्प्रेस गाडी ही थेट कल्याण लोकलच्या फलाटावर न आणता ती पत्रीपुलाच्या आधी किंवा नंतर कल्याण यार्डामध्ये आणावी. तेथून कर्जत व कसाराच्या दिशेने डायरेक्ट जाणाऱ्या रेल्वेमार्गांचा वापर करण्यात यावा. मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी यार्डातच फलाट बांधून तेथून वाहतूक सुरू केल्यास कल्याण येथील क्रॉसिंगचा त्रास कमी होईल.

गर्दीच्या वेळी कल्याण पुढच्या (अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, कसारा, आसनगाव, टिटवाळा इत्यादी) गाड्या वाढवाव्यात आणि गाड्यांना कमीत कमी थांबे असावेत. गर्दीच्या वेळी कल्याण येथून वाशी व पनवेलकरता दिवा स्थानकानंतर (पारसिक बोगाद्यानंतर) ऐरोळीकडे निघणारा रेल्वेमार्ग उपनगरीय गाड्यांसाठी वापरात आणावा व कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल अशा गाड्या सोडाव्यात म्हणजे ठाणे स्थानकावरचा त्रास व ताण कमी होईल व कल्याण डोंबिवलीकडील वाशी, पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल गाड्यांची गरज, PPP तत्त्वावर खासगीकरणातून अधिक चांगल्या प्रकारे सेवा देणे, कल्याणच्या पुढे चारपदरी रेल्वेमार्गाची व्यवस्था, कल्याणच्या पुढेही जलद गती गाड्या सोडणे याचा विचार व्हायला हवा. तसेच कल्याण-वसई गाडीही सुरू करावी. गर्दीच्या वेळी मुंबईहून सुटणाऱ्या काही गाड्या या फक्त दादर, ठाणे व कल्याण येथेच थांबणाऱ्या असाव्यात. कल्याण व दिवा तसेच ठाणे व कुर्ला यांमधील ५ व्या व ६ व्या रेल्वेमार्गांचा वापर वाढवा.

डोंबिवली स्थानक

डोंबिवली हे मराठी मध्यमवर्गीयांचे म्हणून प्रसिद्ध असलेले शहर. नुकत्याच एका दैनिकाने कोरोनापश्चात केलेल्या सर्वेक्षणात या डोंबिवलीवरून रेल्वेने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे दोन लाख एवढी मोठी आहे. यातील निम्म्याहून अधिक प्रवासी डोंबिवली ते ठाणे प्रवास करून मग ठाण्याला उतरून प्लॅटफॉर्म बदलून वाशी पनवेलच्या गाड्या पकडण्यासाठी धावपळ करतात. डोंबिवली स्थानकातून मुंबईच्या दिशेने सुटणारी जलद लोकल नाही. काही अर्धजलद व धीम्या गतीच्याच लोकल्स गाड्या आहेत. सकाळी ऑफिसची वेळ गाठण्यासाठी मग जलद मार्गावरून धावणाऱ्या उपनगरीय गर्दीने खचाखच भरलेल्या गाड्यांमध्ये मग मिळेल तसे घुसून दरवाज्यावर लटकतंच हा प्रवास केला जातो. कित्येक अपघात या मुळे होत असतात पण उपाययोजना होत नाही.

New Project 1 16

कल्याण डोंबिवली हून थेट वाशी पनवेल लोकल सुरू केल्या तर गर्दी, धावपळ कमी होईल. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कसारा, आसनगाव, टिटवाळा, येथूनही वाशी पनवेल साठी जाणारे प्रवासी खूप मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही ठाण्याला प्लॅटफॉर्म बदल करत धावपळ करत वाशी पनवेल च्या गाड्या पकडाव्या लागतात. गर्दीच्या वेळी कल्याण येथून वाशी व पनवेलकरता दिवा स्थानकानंतर (पारसिक बोगाद्यानंतर) ऐरोलीकडे निघणारा रेल्वेमार्ग उपनगरीय गाड्यांसाठी वापरात आणावा व कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल अशा गाड्या सोडाव्यात म्हणजे ठाणे स्थानकावरचा त्रास व ताण कमी होईल व कल्याण डोंबिवलीकडील वाशी, पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. ठाणे व दिवा स्टेशन दरम्यान नवीन मार्गिका सुरू करूनही उपनगरीय लोकल गाड्यांची विलंबानेच धावत आहेत.

जून्या पारसिक बोगद्यातून सर्व जलद मेल एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक होणे अपेक्षित आहे ज्या योगे उपनगरीय गाड्यांसाठी मार्गिका सदैव उपलब्ध राहील, crossing चा प्रोब्लेम issue solved होईल व दोन्ही उपनगरीय व मेल एक्सप्रेस गाड्यांची सुविधा वेळेवर राहील. परंतू असे न होता मेल एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक पुन्हा उपनगरीय ट्रॅक वरूनच होत असल्याने उपनगरीय रेल्वे सेवा विलंबानेच धावत आहेत.

ठाणे स्थानक

ठाणे, खरंतर जुने श्रीस्थानक. बोरीबंदरवरून साहिब, सुलतान आणि सिंध अशी तीन वाफेची इंजिने १३ डब्बे आणि अंदाजे ४०० प्रवाशी घेऊन निघालेली पहिली प्रवासी रेल्वे गाडी सुमारे ३४ किलोमीटर / २१ मैलाचा प्रवेश करून ठाण्यापर्यंत धावली होती. ( https://artsandculture.google.com/story/a-history-of-indian-railways-national-rail-museum/cAVh7RwiKiTtKg?hl=en )

New Project 2 15

गेल्या १६९ वर्षात ठाणे स्थानकाचे रूप बदलून गेले आहे. इतके कि आता एक अतिरिक्त ठाणे स्थानक बनवण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे तसेच मुंबई व नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या महानगरांना ट्रान्स हार्बर मार्गाने जोडणारे उपनगरीय रेल्वे सेवेतील महत्त्वाचे शहर. लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा येथे थांबत असल्यामुळे निरंतर गर्दीचे. लवकरच मेट्रो रेल्वे मार्ग सुद्धा येथे जोडले जातील. इतके असून सुद्धा गर्दीच्या नियोजनाच्या सृष्टीने रेल्वेचे प्रयत्न अपुरेच. मागे एकदा रेल्वेनेच स्थापन केलेल्या काकोडकर समितीचा अहवाल, निष्कर्ष व सूचनांना जर गांभीरतेने घेतले तर सुरक्षितता, स्वच्छता, अतिक्रमणे, आपत्कालीन उपाययोजना, प्रवाश्यांसाठी सुविधा या सगळ्या बाबतीत ठाणे स्थानकात अत्यंत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

घाटकोपर

घाटकोपर स्थानकाला पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवेला जोडणारा घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्ग अपेक्षेहून अधिक लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या, विशेषतः मुंबई राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी, घाटकोपर हे महत्त्वाचे स्थानक झाले आहे. मेट्रो मार्गापूर्वी दादर स्थानकाला जे महत्त्व व गर्दी होती ती आता घाटकोपर स्थानकावर होताना दिसते.

New Project 3 15

एक महत्त्वाचे निरीक्षण येथे दिसते, ते म्हणजे, मध्य रेल्वेच्या गर्दीत कसाही धावपळ, धक्काबुक्की, त्रासलेला व अनियंत्रित असणारा तोच प्रवासी जेव्हा मेट्रो सेवेसाठी जातो तेव्हा अतिशय नियंत्रित, शिस्तीत व शांत पणे सेवेचा लाभ घेताना दिसतो. व्यक्ती, माणूस तोच आहे मग हा बदल कसा तर याचे उत्तर उपनगरीय रेल्वे आणि त्याची यंत्रणा ज्याचे नियंत्रण दिल्ली येथील रेल्वे मंडळाकडून होते यावर आपल्याला विचार करायला भाग पडते. त्यामुळेच मुंबई उपनगरीय रेल्वे (MSR) सेवा हा स्वतंत्रपणे काम करणारा विभाग म्हणून अस्तित्त्वात येणे गरजेचे आहे.

कुर्ला स्थानक 

कुर्ला हे परत लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनस आणि सीएसटी हार्बर मार्गाला जोडणारे स्थानक. या दोन्ही कारणांमुळे येथेही प्रवाश्यांची सतत वर्दळ असते. वांद्रे, वडाळा, वाशी, पनवेल आणि बाहेरगावी जाणारे असे अनेक प्रवासी येथे फलाट बदलत प्रवास करत असतात. येथेही प्रवाश्यांच्या सुविधांची वानवाच आहे.

New Project 4 13

दादर स्थानक 

दादर अतिशय महत्त्वाचे स्थानक कारण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणाचे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांना जोडणारे, बाहेरगावच्या गाड्या सुटणारे, सतत अत्यंत वर्दळीचे, गर्दीचे स्थानक. येथेही सुधारणांना खूप संधी आहे पण दिल्ली येथे बसलेल्या रेल्वे मंडळाच्या बाबू लोकांना येथील समस्यांशी काही घेणे-देणे नसल्याने दुर्लक्ष आणि अनास्थाच येथील गोंधळाला कारणीभूत.

New Project 5 9

सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मुंबईची शान सतत जागे असणारे स्थानक, अतिरेकी हल्याचा अनुभव घेतलेले स्थानक, मुंबईच्या घनघोर पावसात अनेक प्रवाश्यांचे ‘घर’ होणारे स्थानक, अशी अनेकविधी ओळख या स्थानकाची सांगता येईल व एक स्वतंत्र लेख यावर लिहिता यईल. परंतु येथे फक्त एव्हढेच नमूद करतो की, आंतरराष्ट्रीय युनेस्को संस्थेने ‘पुरातन वारसा’ दर्जा दिलेल्या या स्थानकाची म्हणावी तशी दखल रेल्वे मंडळ घेत नाही हेच खरे. या वैभवशाली वास्तूला तीचे अस्तित्व राखण्यासाठी आता खाजगीकरणाच्या नावाखाली विकले जात आहे हे दुर्दैव

New Project 6 9

आजच्या रेल्वे च्या १६९ व्या वाढदिवसाला रेल्वे यंत्रणा, कर्मचारी व सर्व टीम ला शुभेच्छा देताना आजच्या पुरते येथेच थांबतो. आत्ताशी आपण फक्त काही परिस्थितीची जुजबी ओळख करून घेतली आहे पुढील भागात समस्या व उपाय योजनांबद्दल विचार करू.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.