प्रसूतिगृह बालमृत्यू प्रकरण, ‘त्या’ वैद्यकीय कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करा!

127

भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील चार नवजात बालकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मे. इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेचे कंत्राट त्वरित रद्द करा आणि संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत सभा तहकुबी मांडली. मात्र, संवेदनाशून्य शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी सभा तहकुबीला विरोध केला. त्याचा तीव्र निषेध करत भाजपा सदस्यांनी सभात्याग केला. महापालिकेकडून रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) वैद्यकीय सेवा देण्यासाठी सदर खाजगी कंपनीला ३ वर्षांसाठी ८ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

भाजपा सदस्यांनी केला सभात्याग

प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे / बिघाडामुळे आणि अथवा अन्य कारणामुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा जंतूसंसर्गाने (Septic Shock- Infection) मृत्यू झाला असून  एक बालक अत्यवस्थ आहे. ही बाब अत्यंत दुख:द, वेदनादायी व क्लेशकारक असून मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला भूषणावह नाही. बालकांचा सेफ्टीक शॉकनेच मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनीही केला आहे.

( हेही वाचा : देशभरात डिसेंबरमध्ये हुडहुडी, पण राज्य होणार ओलचिंब )

रुग्णालयातील एनआयसीयु (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खाजगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी, जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या निष्काळजीपणामुळेच नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेपर्वा प्रशासनाच्या उदासीन कृतीचा मी निषेध करतो अशी टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी समितीत केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.