Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाचे नेतृत्व करतोय महाराष्ट्र; जाणून घ्या कसे?

300

सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे तो अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठपणा सोहळ्याची. २२ जानेवारी रोजी हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. अद्याप या मंदिराच्या पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यावरील मजल्यांचे बांधकाम व्हायचे आहे. अशा या भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीचे नेतृत्व महाराष्ट्र करत आहे. मंदिर बांधकामासंबंधी विविध विभागांचे नेतृत्व महाराष्ट्रातील तज्ज्ञ करत आहेत. श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी प्रमुख १० अभियंत्यांपैकी ८ अभियंते महाराष्ट्रातील आहेत.

पुण्यातील आफळे कुटुंब श्रीरामाच्या सेवेत लीन 

Ayodhya Shri Ram Mandir उभारणीच्या कामासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टतर्फे पुण्याचे जगदीश आफळे यांच्यासह त्यांची पत्नी माधुरी आफळे आणि मुलगी तेजस्विनी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगदीश आफळे हे निष्णात बांधकाम अभियंता आहेत. ते बांधकामात असलेल्या कंपन्या, अधिकारी यांच्याशी समन्वयाचे काम करत आहेत. त्यांच्या पत्नी माधुरी आफळे यांचा मूर्तिकला, शिल्पकलेचा चांगला अभ्यास आहे. मंदिर उभारणीसाठी त्यांच्या ज्ञानाचा फायदा होत आहे. तसेच माधुरी आफळे या येथील देणगी काऊंटर सांभाळतात. त्यांच्या कन्या तेजस्विनी जोशी या पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत. अयोध्येतील भूमी ही राम जन्मभूमीच असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी जे उत्खनन झाले त्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

बोरिवलीतील बोरे सांभाळतात सुरक्षा 

सध्या श्रीराम मंदिराच्या उभारणीचे (Ayodhya Shri Ram Mandir) काम कडेकोट बंदोबस्तात होत आहे. या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी बोरिवलीतील सुरक्षा व्यवस्थापक संतोष बोरे यांच्यावर आहे. या भव्य दिव्य मंदिराच्या आजवरच्या बांधकामादरम्यान एकही दुर्घटना झालेली नाही. बोरे यांनी मंदिराच्या बांधकामासाठी राबणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वातावरण दिले.

(हेही वाचा AIMIM ने काँग्रेसला खिजवत ‘इंडी’ आघाडीत घेण्याचा मांडला प्रस्ताव)

छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचेही योगदान 

या भव्य दिव्य मंदिर परिसरात बांधकामासाठी मोठमोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर होत आहे. त्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरचे यांत्रिकी अभियंता जगन्नाथ गुळवे यांच्याकडे आहे. तर या भागात वापर होत असलेल्या विद्युत यंत्रणेची जबाबदारी जळगावातील विद्युत अभियंता सुभाष चौधरी पाहत आहेत.

नागपूरचे संगमनेरकर सांभाळतात स्थापत्य विभाग 

Ayodhya Shri Ram Mandir मंदिराची उभारणी करताना मंदिराचे नियोजित रचनेनुसार बांधकाम व्हावे ही बाब फार महत्वाची असते. त्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची असते. या विभागात नागपूरचे स्थापत्य अभियंता अविनाश संगमनेरकर कार्यरत आहेत.

सतीश चव्हाण, राधेय जोशी मंदिर उभारणीच्या कार्याचे अविभाज्य अंग 

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ayodhya Shri Ram Mandir) उभारणीसाठी लार्सन अँड टुब्रो ही कंपनी प्रारंभीपासून जोडली गेली आहे. या कंपनीचे बांधकाम व्यवस्थापक सतीश चव्हाण हे सध्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. तर टाटा कन्सल्टन्सीचे प्रकल्प व्यवस्थापक राधेय जोशी हे मंदिर उभारणीच्या कार्याचे अविभाज्य अंग बनले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.