लसीकरणात महाराष्ट्र झाला ‘कोट्याधीश’! कशी आहे लसीकरणाची आकडेवारी?

या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

109

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून, आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देऊन, लसीकरणात महाराष्ट्राने आपला झेंडा रोवला आहे. रविवारी दुपारपर्यंत १ कोटी ९६ हजार ८७२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.

अशी आहे आकडेवारी

भारत सरकारच्या को-विन या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाचा आढावा देण्यात आला आहे. त्यानुसार, रविवारी दुपारपर्यंत १ कोटी ९६ हजार ८७२ नागरिकांना लस देण्यात आल्याचे समजते. यामध्ये लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ९१ लाख ३० हजार ८७५ इतकी आहे. तर लसींचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या ९ लाख ६५ हजार ९९७ इतकी आहे. रविवार ११ एप्रिल रोजी दुपारपर्यंत महाराष्ट्रात १ लाख ३१ हजार ४४० जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून, दिवस अखेरीस हा आकडा वाढेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

(हेही वाचाः लसीकरण : महाराष्ट्राची हेळसांड! )

मुंबई टॉपवर

को-विन पोर्टलवरुन महाराष्ट्रातील लसीकरणाची जिल्हानिहाय आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, सगळ्यात जास्त लसीकरण मुंबईत झाल्याचे समजत आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण १६ लाख ३२ हजार ९३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर त्यानंतर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ लाख ८५ हजार १५६ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत लसीकरणासाठी सर्वाधिक केंद्रे उपलब्ध असल्याने हा आकडा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यासोबतच छोटी शहरे आणि ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे.

लसींचा होत आहे तुटवडा

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राला होणा-या लसींच्या पुरवठ्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी, महाराष्ट्राला लसींचा कमी पुरवठा केला जात असल्याचे सांगत केंद्र सरकारकडे बोट दाखवले. राज्यात दर दिवशी साडेचार लाख लोकांचे लसीकरण केले जाते. हा टप्पा पुढील काही दिवसांत सहा लाखांपर्यंत न्यायचा आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता कोरोना लसींचा राज्यात तुटवडा भासत आहे. त्यामुळे, १० एप्रिल या दिवशी लसीच्या तुटवड्यामुळे दिवसभरात २ लाख ८२ हजार ९४४ एवढेच लसीकरण केले गेले. जर जास्तीत जास्त लसीकरणाचा टप्पा गाठायचा असेल तर, राज्याला दर आठवड्याला किमान ४० लाख डोसची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः का होत आहे लसींचा ‘तुटवडा’? सिरमच्या पुनावाला यांनी केला मोठा खुलासा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.