Ram Navami 2023: जाणून घ्या रामनवमीचे महत्त्व

241

विष्णूचा सातवा अवतार रामाच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा १ हजार पटीने कार्यरत असलेल्या रामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप जास्तीत जास्त करावा. राम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत, धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘राम’. आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण रामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत, राम उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती यांची माहिती आणि रामनामाचे महत्व याविषयी जाणून घेणार आहोत.

1. तिथी : रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात.

2. इतिहास : विष्णूचा सातवा अवतार रामाच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला.

3. रामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व : देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. रामनवमी या दिवशी रामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप, तसेच रामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने रामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

4. श्रीराम जय राम जय जय राम या नामजपाचा अर्थ : ‘रामसे बडा रामका नाम‘, असे म्हटलेलेच आहे. ‘रामाचे एक नाम विष्णुसहस्रनामाच्या बरोबरीचे आहे’, अशी रामनामाची महती साक्षात् शिवाने गायिली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. ‘श्रीराम‘ हे रामाचे आवाहन आहे. ‘जय राम’ हे स्तुतीवाचक आहे, तर ‘जय जय राम’ हे ‘नमः’ प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे.

5. रामाची पूजा : रामाची पूजा करतांना त्याला गंध करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने लावावे. तसेच रामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. आदल्या दिवशीचे निर्माल्य काढतांनासुद्धा अंगठा आणि अनामिका याच दोन बोटांचा वापर करावा. अंगठा आणि अनामिका जोडून होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

6. रामनवमीच्या दिवशी पूजाविधी करण्याची पद्धत : रामाचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी १२ वाजता साजरा करतात. रामजन्मोत्सव साजरा करतांना प्रभु रामाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. रामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार घालावा. दुपारी १२ वाजता शंखनाद करून ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय’ असा जयघोष करावा आणि त्यानंतर रामाचा पाळणा लावावा. त्यानंतर आरती करावी. नैवेद्याला सुंठवडा (सुंठेचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवावा. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.

7. उत्सव साजरा करण्याची पद्धत : कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात.) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्रीराम’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.