Kapil Dev Viral Video : कपिल देव यांचा हातात बेड्या पडलेला व्हायरल व्हीडिओ आणि गौतम गंभीरचं स्पष्टीकरण 

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचं तोंड बांधलेलं आहे. आणि हातात बेड्या आहेत अशा प्रकारचा एक व्हीडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता. आधी काळजीयुक्त स्वरात हा व्हीडिओ शेअर करणाऱ्या गौतम गंभीरनेच त्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे

133
Kapil Dev Viral Video : कपिल देव यांचा हातात बेड्या पडलेला व्हायरल व्हीडिओ आणि गौतम गंभीरचं स्पष्टीकरण 
Kapil Dev Viral Video : कपिल देव यांचा हातात बेड्या पडलेला व्हायरल व्हीडिओ आणि गौतम गंभीरचं स्पष्टीकरण 

ऋजुता लुकतुके

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर (Kapil Dev Viral Video) अचानक व्हायरल झाला. यात कपिल यांच्या तोंडावर पट्टी आहे. त्यांचे हात मागून बांधलेले आहेत आणि दोन माणसं त्यांना बळजबरीने कुठेतरी नेत आहेत, असं दृश्य होतं.

या व्हीडिओवर दिल्लीकर क्रिकेटपटू गौतम गंभीरने काळजी व्यक्त करत हा व्हीडिओ शेअर केला होता. ‘आणखी कुणी हा व्हीडिओ पाहिला का? हे कपिल पाजी नसूदेत. आणि ते ठिक असूदेत अशीच मी देवाकडे प्रार्थना करतो,’ असं व्हीडिओबरोबरच्या संदेशात गंभीरने म्हटलं होतं.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांत गौतम गंभीरनेच आता या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे. हा व्हिडिओ म्हणजे डिस्ने हॉटस्टारच्या एकदिवसीय विश्वचषक प्रसारणाचा प्रोमो असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव या प्रोमोत सहभागी झाला आहे.

गौतम गंभीर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘खूप छान अभिनय, कपिल पाजी! अभिनयाचा विश्वचषकही तुम्हालाच मिळाला असता. तुमच्यामुळे आता कायम लक्षात राहील की, आयसीसी क्रिकेट विश्वचषक डिस्नेवर मोफत पाहता येणार आहे.’

सोमवारी म्हणजे २६ सप्टेंबरला डिस्ने हॉटस्टारने कपिल देव यांचा हा प्रोमो प्रसारित केल्यावर कपिल यांच्या त्या व्हीडिओचं गूढ उकललं आहे. पाठोपाठ डिस्ने हॉटस्टारनेही हा व्हीडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

एकदिवसीय विश्वचषक पाहण्यासाठी कपिल देव यांचं अपहरण करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही फोनवर मोफत क्रिकेट प्रसारण पाहू शकता, असं या संदेशात हॉटस्टारने म्हटलं आहे.

कपिल देव हा भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार आहेत. त्यामुळे त्यांचा हा प्रोमो विशेष आहे. कपिल यांनी १९७८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३८ बळी मिळवण्याबरोबरच ५,४३४ धावाही केल्या.

तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२५ सामन्यांमध्ये त्यांनी २५३ बळी घेतले आणि ३,७८३ धावा केल्या. १९८३ च्या विश्वचषकात देशाचं नेतृत्व करतानाच त्यांनी झिंबाब्वे विरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा हा विक्रम पुढची अनेक वर्षं टिकला. क्रिकेटमध्ये कपिल यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री तसंच पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.