मंगल कार्यालय म्हटले की डोळ्यासमोर धार्मिक विधी, लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज असे कार्यक्रम, सात्विक आहार, सभ्य आचार, नीट नेटकेपणा असे सर्व चित्र येते. पण कल्पना करा तुम्ही अशाच एखाद्या मंगल कार्यालयात तुमच्या घराचा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि चक्क त्याच मंगल कार्यालयात देशी दारूचा कारखाना चालवला जात असल्याचे तुम्हाला दिसले तर! हो…हे घडले आहे नाशिकमध्ये!
नाशकात शुभकार्याच्या ठिकाणी चक्क देशी बनावट दारुचा अवैध कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने या देशी बनावट दारुच्या अवैध कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे.
(हेही वाचा : समीर वानखेडे आणखी ६ महिने गाजवणार कारकीर्द!)
1 कोटीची बनावट दारू जप्त
पोलिसांनी या कारवाईत निफाड तालुक्यातील चांदोरी येथील उदयनराजे लॉन्स येथून सुमारे 1 कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली असून या प्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. टॅंगो रॉकेट संत्रा या प्रकारच्या दारु बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 1 कोटींची बनावट दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.