गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून सिंहाची जोडी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली आहे. या सिंहांना उद्यानातील सिंह सफारीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांसाठी उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सिंहाच्या आगमनाने उद्यानातील पिंजऱ्यातील सिंहाची संख्या आता 3 वर आली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून उद्यानात आशियाई प्रजातींच्या सिंहाची संख्या वाढावी म्हणून गुजरातकडून सिंहाची जोडी मिळावी म्हणून उद्यान प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. अखेरीस महिन्याभरापूर्वी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी 29 नोव्हेंबर रोजी गुजरातहून सिंह आणण्याचे ठरवले. त्यासाठी मंगळवारी उद्यानातून वनाधिकाऱ्यांची टीम गुजरातसाठी रवाना झाली होती.
कंत्राटीपद्धतीने घाईघाईने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड
उद्यानात पिंजऱ्यातील वन्यप्राण्यांची ढासळती तब्येत आणि मृत्यूसत्रानंतर वनाधिकाऱ्यांनी अखेर कंत्राटी पद्धतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या शुक्रवारी पदासाठी आलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोमवारी मुलाखतीत पशुवैद्यकीय अधिकारी निवडल्यानंतर मंगळवारी सकाळीच वनाधिकाऱ्यांनी मुंबई सोडली. गुजरातहून सिंह आणण्यासाठी उद्यानातून सहाय्यक वनसंरक्षक संजय कांबळे, सिंह आणि व्याघ्र सफारीचे वनपरिक्षेत्रपाल विजय बारबद्धे, वन्यप्राणी बचाव पथकाचे सदस्य वैभव पाटील, संदीप गायकवाड आणि नवनियुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बनकर ही टीम पाठवण्यात आली.
सिंहाऐवजी आता उद्यानातील वाघ गुजरातेत
उद्यानातील पिंजऱ्यात विदर्भातून आणलेल्या बजरंग आणि दुर्गा ही सिंहाची जोडी आता सक्करबाग प्रणिसंग्रहालयाला दिली जाईल. शुक्रवारी सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील वनाधिकारीही उद्यानात दाखल झाले आहेत. वाघांच्या जोडीला सोबत घेऊनच ते मुंबईला अलविदा करतील.
