यंदाच्या वर्षात मुंबईतील फ्लेमिंगोच्या संख्येचा नवा विक्रम!

117

शिवडी न्हावाशेवा येथील ट्रान्स हार्बर लिंकच्या प्रकल्पातील पाणथळ जमिनीला दरवर्षाला भेट देणा-या फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांच्या नुकत्याच झालेल्या गणनेत विक्रमी नोंद झाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेने केलेल्या गणनेत मुंबई परिसरात तब्बल १ लाख ७० हजार २२७ फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या दिसून आली. ही संख्या आतापर्यंत केलेल्या चारही गणनेच्या तुलनेत जास्त दिसून आली.

(हेही वाचा – महागाईचा फटका वधूपित्याला! हुंड्याऐवजी या वस्तूंची मागणी)

तब्बल दोन वर्षानंतर फ्लेमिंगो पक्ष्याची गणना

कोरोना काळात या गणनेला मर्यादा आल्या होत्या. २०२० साली पहिल्या लॉकडाऊननंतर गणना झालीच नाही. त्यानंतरही २०२१ साली दुस-या लाटेच्या प्रभावामुळे मार्च महिन्यानंतर पुन्हा फ्लेमिंगो पक्ष्याची गणना थांबली. यंदा तब्बल दोन वर्षानंतर गणना मे महिन्यापर्यंत सुरु राहिली आहे. तरीही मार्चपर्यंतची आकडेवारी लक्षात घेत दोन्ही फ्लेमिंगोच्या प्रजाती मोठ्या संख्येने आढळल्या. यंदा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, शिवडी आणि न्हावाशेवा या तिन्ही ठिकाणी मिळून ७१ हजार ग्रेटर फ्लेमिंगो पक्ष्याची संख्या नोंदवली गेली. त्यापैकी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात ५४ हजार, शिवडीत १७ हजार आणि न्हावाशेवात २७७ संख्या आढळली. लेसर फ्लेमिंगोची संख्या तिन्ही ठिकाणी मिळून ९९ हजारापर्यंत पोहोचली. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात ६५ हजार, शिवडीत २५ हजार आणि न्हावाशेवामध्ये ९ हजारांच्या संख्येने लेसर फ्लेमिंगो आढळले.

फ्लेमिंगो पक्ष्यांच्या गणनेबाबत तसेच दोन्ही फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रजातीपैकी कोणती प्रजाती मोठ्या संख्येने आढळून येते याबाबत आता काहीच निष्कर्ष काढता येणार नाही. आपल्याकडे हिवाळ्यापूर्वी फ्लेमिंगो पक्षी येतात. पावसाच्या आगमनासह ते परत निघून जातात. २०२७ पर्यंत फ्लेमिंगो पक्ष्याची प्रत्येक वर्षी गणना पूर्ण केल्यानंतर एका ठराविक निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल – डॉ राहुल खोत, उपसंचालक, बीएनएचएस

फ्लेमिंगो पक्ष्याच्या गणनेबाबत 

२०१७ सालापासून बीएनएचएसकडून ठाणे खाडी तसेच शिवडी आणि न्हावा शेवा परिसराला भेट देणा-या फ्लेमिंगो पक्ष्यांची गणना केली जाते. पावसाळा संपताच मुंबई व नजीकच्या परिसराला ग्रेटर आणि लेटर या दोन फ्लेमिंगो पक्ष्याच्या प्रजाती भेट देतात. या दोन्ही प्रजातींची गणना बीएनएचएसचे शास्त्रज्ञ सप्टेंबर ते मार्च महिन्यापर्यंत करतात. फ्लेमिंगोच्या गणनेचा अभ्यास हा ट्रान्स हार्बर लिंकचे काम सुरु झाल्यानंतर बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी सुरु केला. ट्रान्स हार्बर लिंकचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत गणनेचा दहा वर्ष अभअयास केला जाईल. आतापर्यंत चारवेळा ही गणना पूर्ण झाली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.