इस्त्रायलला शस्त्रांची नाही, नैतिक पाठिंब्याची गरज – कोबी शोशानी

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कॉन्सुल जनरल कोबी शोशानी यांनी केले शस्त्रपूजन

182
इस्त्रायलला शस्त्रांची नाही, नैतिक पाठिंब्याची गरज - कोबी शोशानी
इस्त्रायलला शस्त्रांची नाही, नैतिक पाठिंब्याची गरज - कोबी शोशानी

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थात खंडेनवमीला दादर, शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात इस्रायलचे कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. सोमवारी, २३ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, सदस्य के. सरस्वती, कमलाकर गुरव, दीपक कानुलकर, श्वेता परुळकर, विवेक परुळकर आणि परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक अनय जोगळेकर हे उपस्थित होते.

कॉन्सुल जनरल कोबी शोशानी यांनी सध्या सुरू असलेल्या इस्त्रायल-हमास युद्धाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, इस्त्रायलमधील नागरिक सध्या अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. इस्त्रायलचे युद्ध थांबल्यानंतर तेथे टिकून राहणेही सोपे नाही.

WhatsApp Image 2023 10 23 at 19.19.26 1

इस्रायलचे कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी यांना कट्यार भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर. सोबत स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, सदस्य के. सरस्वती, कमलाकर गुरव, दीपक कानुलकर, श्वेता परुळकर, विवेक परुळकर आणि परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक अनय जोगळेकर. 

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांत अनेक गोष्टींमध्ये साम्य असून लोकांमधील नैतिक मूल्ये समान आहेत. दोन्ही देशांतील लोक कौटुंबिक आस्था, कुटुंबामधील वडीलधारी व्यक्ती तसेच आई-वडील यांच्याबद्दल आपुलकी व आदर बाळगणारे आहेत. या दोन्ही देशांमध्ये अतिरेक्यांनी जो विध्वंसक धुमाकूळ मांडला आहे, याविषयी बोलताना कॉन्सुल जनरल कोबी शोशानी म्हणाले की, ही माणसे नसून दोन पायांची पाशवी जनावरे आहेत. ही अतिरेकी जनावरे भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये जी पाशवी कृत्ये करीत आहेत ती कधीही विसरता येणार नाहीत.

WhatsApp Image 2023 10 23 at 19.19.27

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या तलवारीचे पूजन करताना इस्रायलचे कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, अतिरेक्यांना कठोर शिक्षा होईल आणि ती त्यांना व्हायलाच हवी, असे उद्गार कोबी शोशानी यांनी यावेळी काढले. इस्त्रायलला भारताकडून मिळणारा नैतिक पाठिंबा फार महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काही दिवसांत भारताकडून इस्त्रायलला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमचे मन भरून आले आहे. हे युद्ध लोकशाहीवादी देश आणि लोकशाही न मानणारा देश यांच्यामध्ये सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोबी शोशानी यांनी मनापासून आभार मानले. जर कोणी इस्त्रायलची खोड काढली तर त्यांना त्या कृत्याची किंमत मोजावीच लागेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

WhatsApp Image 2023 10 23 at 19.28.30

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना इस्रायलचे कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी. 

स्मारकाला दुसरी भेट …

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वर्षभरापूर्वी येऊन गेल्याच्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला दिलेली ही माझी दुसरी भेट आहे. माझ्या मते, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि एक इस्त्रायली यांची वैचारिक मानसिकता एकसारखीच आहे. त्या काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रगल्भ विचार, त्यांनी घेतलेले निर्णय हे मला इस्त्रायलमधील अनेक महान व्यक्तिंची आठवण करून देतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अत्यंत महान व्यक्ती आणि प्रगल्भ नेते होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये आल्यावर मला माझ्या घरी आल्यासारखे वाटते.

भारत-इस्रायल यांच्यामधील बंध महत्त्वाचे …
भारतात आज असंख्य ज्यू आहेत. त्यांना संदेश देताना कोबी शोशानी म्हणाले की, इस्रायल हे अत्यंत समर्थ राष्ट्र आहे आणि ते तसेच राहावे यासाठी भारत-इस्त्रायल संबंध मजबूत असणे आवश्यक आहे. भारत-इस्रायलमधील बंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन देशातील संबंध घनिष्ठ आहेत. दोन्ही देशांची संस्कृती आणि परंपरा अलौकिक आहे, असे कॉन्सुल जनरल कोबी शोशानी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.