मूठभर मूर्ख नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य कधीही मिटवू शकत नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल

यावेळी त्यांनी राज्यात काँग्रेस सोबत सत्ता उपभोगणा-या शिवसेनेवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

82

सोमवारी गिरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी कट्टा कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या विचारांचे महत्व पटवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शाश्वत विचार हे कधीच कोणीही पुसून टाकू शकत नाहीत. काही मूठभर लोक आणि त्यांचे मूठभर मूर्ख नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार कधीही मिटवू शकत नाहीत, असा थेट हल्ला फडणवीसांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यात काँग्रेस सोबत सत्ता उपभोगणा-या शिवसेनेवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सावरकर स्वातंत्र्यवीर होते, आहेत आणि राहतील

मूठभर मूर्ख लोक हे स्वातंत्र्यवीरांचं कार्य मिटवू शकत नाहीत. जे इंग्रज त्या काळात सर्वाधिक शक्तीशाली होते ते सावरकरांना मिटवता मिटवता स्वतः मिटून गेले, तर हे मूठभर लोक आणि त्यांचे मूठभर मूर्ख नेते सावरकरांचं कार्य कधीही मिटवू शकत नाहीत. सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते, आहेत आणि राहतील. त्याही काळात त्यांनी हजारो क्रांतिकारकांना स्फूर्ती दिली आणि आजही त्यांच्या विचारांनी असंख्य तरुणांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवण्याचं काम ते करत आहेत, असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, नेहरुच होते खरे माफीवीर! भातखळकरांचा हल्लाबोल)

देशात लोकशाही नसती तर…

इतकी वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने राजकारण करणारे देखील आज सत्तेसाठी इतके अंध झाले आहेत की, ज्यांच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या जातात त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन हे बसतात. देशात जर लोकशाही नसती ना तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पद्धतीनेच यांना दाखवून दिलं असतं, असा झणझणीत इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

हिंमत असेल तर एक दिवस अंदमानच्या कारागृहात राहून दाखवा

सावरकरांना स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ज्याप्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. ज्या लोकांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन देशात जन्म घेतला, ज्यांनी कोठडी सोडाच पण साधी जमीनसुद्धा बघितली नाही, असे लोक जेव्हा सावरकरांना पळपुटे म्हणतात त्यांना माझं आव्हान आहे. तुमच्यात हिंमत असेल ना तर अंदमानच्या कारागृहात एक दिवस राहून दाखवा… तुमच्यासमोर सर्व काही हरायला मी तयार आहे, असे थेट आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवर टीका करणा-यांना दिले आहे.

(हेही वाचाः वीर सावरकर आमच्यासाठी दैवत, त्यांचा अवमान सहन करणार नाही!)

सावरकर हिमालयाप्रमाणे उभे राहिले

अंदमानात काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगत असताना सुद्धा देशाच्या बद्दल जाज्वल्य विचार मांडण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले आहे. सेल्युलर जेलचा जेलर बॅरीविरोधात सर्व राजबंदीवानांना एकत्र करुन अंदमानच्या कराल कारागृहात सवलती मिळवून देण्याचं काम सावरकरांनी केलं आहे. अंदमानच्या कारागृहात अनेक क्रांतिकारकांनी यातना सहन न होऊन आत्महत्या केल्या. अंदमानात ज्यांना सर्वात जास्त त्रास देण्यात आला ते सावरकर मात्र तिथे हिमालयाप्रमाणे उभे राहिले आणि तिथे असलेल्या असंख्य क्रांतिकारकांना आपल्या तेजाने जिवंत ठेवण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.