स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची महती सांगणारे संग्रहालय मुंबईत उभारणार- विधानसभा अध्यक्ष

114

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्साय बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक उडीला 8 जुलै रोजी 112 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी राज्य विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर यांनी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची माहिती देणारं संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

येत्या अधिवेशनात आग्रह धरणार

विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो आहे आणि या गोष्टीचा मला आनंद आहे की ज्याची सुरुवात चांगली होते त्याची पुढची वाटचाल चांगलीच होते. त्यामुळे स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राचं अनावरण माझ्या हस्ते झालं याचा मला आनंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची देशातील नागरिकांना माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या राष्ट्रकार्याची माहिती देणारं एक संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारावं यासाठी विधानसभा अध्यक्ष म्हणून येणा-या अधिवेशनात आपण स्वतः आग्रह धरणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

सावरकरांचे आयुष्य हे राष्ट्रभक्तीचे अग्निकुंड

आता आपण देशाचे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्ष साजरे करत आहोत. देशाला स्वतंत्र करण्यात क्रांतिकारकांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे क्रांतिकारकांना वाट चुकलेले देशभक्त म्हणणे हा त्यांच्यावर इतिहासाने केलेला अन्याय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अवघे आयुष्य हे प्रखर राष्ट्रभक्तीचे धगधगते अग्निकुंड आहे. त्यांचा जीवनपट हा अतिशय रोमांचक आणि स्फूर्तीदायी आहे. त्यांच्यासारखा वीरपुरुष हा शतकातून एकदाच जन्माला येतो, अशा शब्दांत विधानसभा राहुल नार्वेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला आहे.

मार्साय बंदरात सावरकर स्मारक उभारावे- रणजित सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीच्या कार्याचा उल्लेख केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द दिले आहेत. अनेक इंग्रजी संसदीय शब्दांना पर्यायी मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती विधीमंडळातील सदस्यांना देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी रणजित सावरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली आहे. तसेच केंद्र सरकारने देखील मार्साय बंदरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणीही रणजित सावरकर यांनी केली आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी केले. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी स्मारकाच्या वतीने अध्यक्षांचे आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.