नागालँडमध्ये सुरक्षा दलाकडून गोळीबार, १३ ठार, लोकांमध्ये असंताेष!

88

नागालँडच्या मोन जिल्ह्यात ४ डिसेंबरच्या रात्री सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात १३ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या सुरक्षा मोहिमेत हे नागरिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने नागालँडमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री नाफियू रिओ यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि अनेक पोलिसांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रत्यक्षात काय घडले?

नागालँडमधील मोन जिल्ह्यातील तिरू गावात ४ डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटींग गावातील काही लोक मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप व्हॅनमधून घरी परतण्यासाठी निघाले होते, मात्र ते घरी पोहोचले नाहीत. सकाळपर्यंत न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. याच दरम्यान, तिरू गावाजवळ पिकअप व्हॅनमध्ये ११ मृतदेह आढळून आले. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र सुरक्षा दलाच्या या गोळीबारात १३ स्थानिक लोक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

( हेही वाचा : बस आदळली अन् तुटला मणका! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल )

ओटींग येथील घटना दुर्दैवी

नागालँडच्या ओटींग मोन येथे झालेली घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारद्वारे नियुक्त केलेली उच्चस्तरीय समिती संपूर्ण घटनेचा तपास करीत असून, ही समिती नक्कीच न्याय प्रदान करेल. असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. नागालँडच्या ओटींग मोन येथे झालेली नागरिकांची हत्या निंदनीय आणि दुर्दैवी असून, उच्च स्तरीय समिती घटनेचा तपास करीत कायद्यानुसार न्याय प्राप्त करून देईल अशी घोषणा नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी ट्वीटर द्वारे केली असून समाजातील सर्व वर्गांना शांती राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.