Veer Savarkar : ‘आज आपलं अस्तित्व जे टिकून आहे, ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच’, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. त्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने रविवार, २५ मे २०२५ या दिवशी आयोजित शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होत्या.
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना मंजिरी मराठे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही देशातली एक प्रतिथयश संस्था, एका छताखाली असंख्य उपक्रम चालवणारी बहुतेक पहिलीच सामाजिक संस्था आहे. वीर सावरकर यांच्यावर चित्रपट, मालिका करणाऱ्या निर्माता, लेखक यांच्यासाठी हे एक आश्वासक नाव. जेथे येऊन त्यांना अनेक संदर्भग्रंथ, छायाचित्र सहज उपलब्ध होऊ शकतात, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.
(हेही वाचा ‘लाल बाल पाल’मधील पंजाब, बंगाल हातून गेले आता महाराष्ट्र वाचवा; Ranjit Savarkar यांनी दिला धोक्याचा इशारा )
त्या पुढे म्हणाल्या, सावरकर म्हणायचे, योगाभ्यासामुळे माझ्या मनाची आणि शरीराची जी तयारी झाली त्यामुळे मला अंदमानच्या त्या मारक काळ्या पाण्यात नावेसारखी उपयोगी पडली. ते सूर्यनमस्कार घालत, जोर बैठका काढत. पाच-पाचशे, हजार जोर बैठका काढत असत. अगदी स्वतःच्या घामाची सावली जमिनीवर उठेपर्यंत ते सूर्यनमस्कार घालत असत. असे सांगतानाच वीर सावरकर अतिशय कृष होते. त्यांनी शरीर बलदंड व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले.
स्वसंरक्षणाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतला ध्यास
“वीर सावरकरांच्या दांडगा योगाभ्यास होता. त्यांच्या असं लक्षात आलं की, प्रत्येक शरीराची कुवत असते आणि प्रत्येकजण हजार बैठका काढेल असं नाही. ज्या शरीराला जे मानवेल ते त्यांनी केलं पाहिजे. लंडनमध्ये जर्मन बॉडीबिल्डर युजन सँडो यांच्याकडे ते डंबेल्स प्रॅक्टिस करत होते. त्याच्यानंतर ते एअरगनदेखील शिकले होते. लंडनमध्ये असताना स्वसंरक्षणाचा ध्यास घेणारे वीर सावरकर आजच्या पिढीसाठी हे अतिशय मार्गदर्शक आहेत. कारण, आपण बघतो व्यायामशाळेमध्ये अनेकजण जातात आणि त्यामुळे त्यांना पुष्कळ त्रासदेखील होत असतो. परंतु, स्वसंरक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मंजिरी मराठे यांनी सांगितले.
(हेही वाचा “…तर याहून वेदनादायी दुसरं काहीच असू शकत नाही”; Veer Savarkar पुरस्कार सोहळ्यात विवेक फणसळकरांनी मांडली परखड भूमिका )
त्या पुढे म्हणाल्या, वीर सावरकरांनी (Veer Savarkar) जेव्हा मित्रमेळाची सुरुवात केली होती त्याचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आले. तेव्हा ते सांगायचे की, प्रत्येकाने अभ्यास तर केला पाहिजेच त्यासोबतच स्वतःच शरीर तंदुरुस्त राखलं पाहिजे. त्याचबरोबर, दाणपट्टा, तलवारबाजी हे सगळं या क्रांतिकारकांना आलं पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेऊन स्वसंरक्षणासाठी राष्ट्रीय स्मारकात धनुर्विद्या, तायक्वांदो, मुष्टियुद्ध असे अनेक उपक्रम चालविले जातात, जी आत्ताच्या काळाची गरज आहे, असे स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
वीर सावरकरांनी केला होता सैनिकीकरणाचा पुरस्कार
सन १९३७ ला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर वीर सावरकरांनी त्यावेळेस सैनिकीकरणाचा पुरस्कार केला होता. याचे कारण त्यावेळेस ब्रिटिशांचं सैन्य होतं ज्यात मुस्लिम ६५ टक्के होते तर हिंदू केवळ ३५ टक्के होते. परंतु, वीर सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला ज्यामुळे हे चित्र पूर्णपणे पालटले. तसेच, भारत-पाकिस्तान फाळणीनंतर हिंदूंच्या सैन्यातील हिंदूंची संख्या ६५ टक्के तर मुस्लिम पलटणी पाकिस्तानात गेल्याचे त्या म्हणाल्या. परंतु, हेच चित्र जर उलट असतं तर आपल्या अस्तित्वाला त्याचवेळी धोका होता. त्यामुळे हिंदुस्थानचं अस्तित्व जे टिकून आहे, ते वीर सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच, असेही मंजिरी मराठे यांनी सांगितले.
(हेही वाचा “…तर याहून वेदनादायी दुसरं काहीच असू शकत नाही”; Veer Savarkar पुरस्कार सोहळ्यात विवेक फणसळकरांनी मांडली परखड भूमिका )
त्या पुढे म्हणाल्या, ‘मला रस्त्या-रस्त्यावर बुटांचे आवाज पाहिजे, त्यामुळे रायफल क्लब काढा.’ असे सावरकर म्हणत आता तोच प्रचार वीर सावरकरांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही करत आहोत, असे सांगतानाच वीर सावरकरांनी असं सांगितलं होतं की, ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये तुम्ही जा, ब्रिटिश तुम्हाला सैनिकी शिक्षण देणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. पण वेळ येईल त्यावेळेला ती बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची हे तुमच्या हाती असेल. आज देशात जी परिस्थिती आहे त्यावरून आत्ताही प्रत्येकाने रायफलचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. शाळा शाळांमध्ये आम्ही तसा प्रचार करतो आहोत, असेही मराठे यांनी यावेळी सांगितले.
स्वसंरक्षणाबाबत बोलताना मंजिरी मराठे म्हणाल्या, स्वसंरक्षणासाठी क्राव मागा हे एक इजरायली तंत्रज्ञान आहे, टेक्निक आहे. इथे आपल्याला जर काही त्याचा उपक्रम सुरू करता आला तर तसा प्रयत्न आहे. कारण आज तुम्ही बघता की अगदी छोट्या मुलींपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना धोका आहे, तर आपलं संरक्षण आपण कसं करायचं याच्यासाठी स्मारक प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर इथे यूपीएससी-एमपीएससीचे वर्ग चालविले जातात, असे त्यांनी सांगितले.
वीर सावरकरांनी बंदिवासात अनेकांना शिक्षणाचे धडे दिले
वीर सावरकरांनी बंदिवासात अनेकांना लिहायला, वाचायला शिकविले असे सांगतानाच स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे म्हणाल्या. त्याच धर्तीवर सावरकरांचे साहित्य कारागृहात पोहोचवून बंदिवान त्याचा अभ्यास करतात, वाचन आणि निबंध स्पर्धा आपण घेत असतो. याबाबत एक अनुभवदेखील उपस्थितांशी शेअर करताना त्या म्हणाल्या, अनेक बंदिवानांनी सांगितले होते की, आम्ही आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो. पण ज्यावेळेला वीर सावरकरांचे आत्मचरित्र ‘माझी जन्मठेप’ वाचले. त्यावेळेस मला असे लक्षात आले की, नाही मला जगले पाहिजेच. देशासाठी हा खूप मोठा धडा आहे की आपण जगायचं ते देशासाठी याच उद्देश्याने राष्ट्रीय स्मारकाचे अनेक उपक्रम आपण करतो, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.
‘भारत माता तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्या जेएनयूमध्ये मृत्युंजयचे ०२ प्रयोग
संगीत, नृत्य, नाट्य हेही एक प्रचाराचे उत्तम माध्यम आहे. हे मृत्युंजय आता आपण जे गाणं पाहिलत त्याच्यामध्ये काही देखावे आपण पाहिलेत हे मृत्युंजय हे नाटक अंदमानमधल्या कालखंडावर आधारित आहे. त्याचे जवळजवळ १४६ प्रयोग आपण केले. विशेष म्हणजे जेएनयूमध्ये आपण हे मृत्युंजयचे ०२ प्रयोग केले. जिथे ‘भारत माता तेरे तुकडे होंगे’ असं म्हटलं जात होतं तिथे ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय’, ‘भारत माता की जय’ हा घोष निनादला हे हिंदी नाटक आपण तिथे केलं तसेच दिल्ली विद्यापीठामध्ये आपण नाटक केले. ‘शतजन्म शोधिताना’ हा एक सावरकरांच्या गीतांवर आधारित आणि अर्थातच विचारांवर आधारित एक कार्यक्रम आहे, ज्याचे ७०च्या वर प्रयोग आपण केले आहेत. तसेच, सावरकरांनी बाजीप्रभू देशपांडे, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत अतिशय सुरेख लिहिले आहे. त्या म्हणाल्या, स्मारकाचे काम आमच्या परीने जेवढे आम्हाला जमते तेवढे करतो आहोत, हात कमी पडत आहेत तेव्हा आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे. त्यांनी आमच्याशी जोडलं जावं आणि आपण हे सावरकरांच्या विचारांचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेऊ शकू, असेही त्यांनी सांगितले.(Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community