-
प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) हे ज्वलंत राष्ट्रवादाचे मूर्त रूप होते. देश हाच त्यांच्याकरिता देव होता. सावरकर क्रांतिकारक तर होतेच परंतु ते कवी, विज्ञाननिष्ठ लेखक, इतिहास तज्ज्ञ व आघाडीचे समाज सुधारकही होते. जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या कुप्रथेचे ते कट्टर विरोधक होते, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी येथे केले. सावरकरांच्या जीवनातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या जीवनाशी निगडित ठिकाणांचे ‘सावरकर सर्किट’ तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाने निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) अभ्यास आणि संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा मंगळवारी विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी बोलताना राज्यपालांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साठाव्या स्मृती वर्षानिमित्त त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे विचार आणि तत्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
(हेही वाचा – शिवसेना उबाठावर असंतोषाचा विस्फोट, कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा BJP मध्ये जाहीर प्रवेश; रविंद्र चव्हाण अध्यक्षपदी)
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सावरकरांसह अनेक महान क्रांतिकारकांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. राष्ट्रकार्यासाठी जीवन वेचणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय आणि इतर विभूतींच्या अमूल्य योगदानाबाबत देखील इतिहासाने मौन बाळगल्याची खंत व्यक्त करत या त्रुटी दूर करून त्यांच्या जीवनकार्याबद्दल नवीन पिढीला अवगत करण्याची योग्य वेळ आली आहे, असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
सावरकर व्यक्ती नव्हे तर संस्था : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) हे व्यक्ती नव्हते तर ते संस्था होते. त्यांच्या जीवनाच्या एकेक पैलूवर संशोधन होऊ शकते असे सांगून मुंबई विद्यापीठाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राला निधी अपुरा पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. इंग्लड सरकारने सावरकर यांची रद्द केलेली बॅरिस्टर ही पदवी पुन्हा मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दोन वेळा जन्मठेप झालेले सावरकर (Veer Savarkar) हे एकमेव स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमान येथील एकांतवासाची शिक्षा भोगताना अनेक लोक मनोरुग्ण होत. मात्र सावरकर ११ वर्षात कधीही निराश झाले नाही. त्यांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी तेथील काळकोठडीत केवळ ११ तास घालवून दाखवावे, असे आव्हान फडणवीस यांनी यावेळी दिले. सावरकर यांच्या भाषाशुद्धी कार्याबद्दल बोलताना फडणवीस यांनी सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द दिल्याचे सांगितले. बोलपट, चित्रपट, शस्त्रसंधी, विधिमंडळ, निवृत्तीवेतन आदी शब्द सावरकर यांनी दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – BMC : हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टीचे पंप बंद; चार कंपन्यांना ४० लाखांचा दंड)
सावरकरांच्या गीताला पुरस्कार
दरम्यान, सांस्कृतिक कार्यविभागाच्या वतीने यंदा सुरु केलेला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) लिखित ‘अनादि मी अनंत मी’ या गीताला केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार तसेच सावरकर प्रतिष्ठानचे रणजित सावरकर, अशीलता राजे, स्वप्निल सावरकर, मंजिरी मराठे, अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community