-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बनावट नकाशाचा आधार घेऊन मढ परिसरात अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामांविरोधातील कारवाई मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिक तीव्र करण्यात आली आहे. पी (उत्तर) विभागातील मढ परिसरातील एरंगळ आणि वळणाई येथील १४ अनधिकृत बांधकामे मंगळवारी १३ मे २०२५ रोजी जमीनदोस्त करण्यात आली. मागील दोन आठवड्यात या कारवाई अंतर्गत एकूण २४ बांधकामे हटवण्यात आली आहेत. (Unauthorized Constructions)
बनावट नकाशाचा आधार घेऊन मागील वर्षभरात मढ भागात १०१ अनधिकृत बांधकामे उद्भवल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी यांच्या नेतृत्वात ही तोडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. (Unauthorized Constructions)
(हेही वाचा – जास्त वाहने आणि अधिक आकारले जात होते पैसे; फोर्ट परिसरातील वाहनतळावर BMC ने केली कडक कारवाई)
मागील आठवड्यात करण्यात आलेल्या दोन कारवाईत एक बंगला आणि अन्य ९ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी १३ मे २०२५ रोजी अधिक तीव्र करत १४ बांधकामे निष्कासित करण्यात आली. यापैकी ३ बांधकामे एरंगळ परिसरातील असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १९००, १७०० आणि ६५० चौरस फूट आहे. उर्वरित ११ बांधकामे वळनाई गावातील असून त्यांचे क्षेत्रफळ प्रत्येकी २०० ते ३०० चौरस फूट इतके आहे. (Unauthorized Constructions)
तीन जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने सदर अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे १० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. दरम्यान, बनावट नकाशा प्रकरणातील एकूण १०१ अनधिकृत बांधकामे मे अखेरपर्यंत निष्कासित करण्यात येतील. तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. (Unauthorized Constructions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community