BMC : शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीला सुरुवात: ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची महापालिकेकडून दखल

शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे दुर्लक्ष, फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका’ या आशयाचे वृत्त १३ जून रोजी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रकाशित केले होते.

102

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील झाडांच्या फांद्यांची पावसाळ्यापूर्वी छाटणीबाबत चिंता व्यक्त करणारे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने प्रसारीत केल्यानंतर बुधवारी, 14 जून रोजी या भागातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. बुधवारी १८ ते १९ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असून या परिसरातील सर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी पुढेही केली जाणार असल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे दुर्लक्ष, फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका’ या आशयाचे वृत्त १३ जून रोजी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रकाशित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमध्ये फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली होती. या वृत्तानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागातील उद्यान विभागाने शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच वाढलेल्या फांद्या छाटणीचे काम हाती घेतले. महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सहायक उद्यान अधिक्षक, उद्यान विद्या सहायक आणि कनिष्ठ वृक्ष अधिकारी आदींनी शिवाजी पार्क परिसरातील झाडांची पाहणी करून झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे काम हाती घेतले.

(हेही वाचा Biparjoy Cyclone : वादळाच्या आधी भूकंप; काय आहे गुजरातची स्थिती? )

वीर सावरकर मार्गावर पसरलेल्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनासमोरील तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासमोरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यानंतर गडकरी चौकांतील पेट्रोलपंप पासून शिवाजी पार्क येथील मिनाताई ठाकरे पुतळा परिसरात केळुस्कर मार्गापर्यंत पहिल्या दिवशी १८ ते १९ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. यामध्ये झाडांच्या मृत फांद्या तोडण्यात आल्या आहेत. शिवाय ज्या शिवाजी पार्कच्या संपूर्ण परिसराच्या सभोवताली असलेल्या मैदान आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची पाहणी करून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाईल,असे उद्यान विभागाने कळवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.