Tree Cutting : आपल्या भागातील झाडांच्या फांद्यांची छाटणी होते, हे आधीच कळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

491
Tree Cutting : आपल्या भागातील झाडांच्या फांद्यांची छाटणी होते, हे आधीच कळणार; महापालिकेने घेतला 'हा' निर्णय
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

पावसाळ्यात मुंबईतील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील छाटणीयोग्य वृक्षांच्या फांद्यांची सुयोग्य छाटणी सुरू केली आहे. आपल्या भागातील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी कधी आहे, हे मुंबईकरांना आधीच कळावे, यासाठी उद्यान विभागाने नियोजन केले आहे. २१ एप्रिल २०२५ पासून संबंधित प्रशासकीय विभागाच्या (वॉर्ड ऑफिस) समाज माध्यमांवर वृक्ष छाटणीचे वेळापत्रक प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच संबंधित प्रशासकीय विभागातील सूचना फलकांवरही हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबईतील वेगवेगळ्या खात्यांमार्फत पावसाळापूर्व कामे वेळीच हाती घेण्यात यावीत व मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त (उद्याने) अजीत आंबी यांच्या देखरेखीखाली उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे. (Tree Cutting)

(हेही वाचा – “पोपटपंची करत माध्यमांत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न”; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर Pravin Darekar यांचा हल्लाबोल)

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’ नुसार महानगरपालिका क्षेत्रातील झाडांची सुयोग्यपणे छाटणी केली जाते. पावसाळापूर्व कामांमध्ये प्रामुख्याने मृत आणि धोकादायक झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे/खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदी कामे केली जातात. ही कामे करीत असताना आवश्यक तेथे पोलिसांची देखील मदत घेण्यात येणार आहे. यंदाही पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने उद्यान विभागाकडून सुरू आहेत. ही झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. छाटणीची कामे सुरू असताना अनेकदा संबंधित झाडाखाली उभ्या असलेल्या वाहनांमुळे कामात व्यत्यय येतो. ज्यांचे वाहन झाडाखाली असते अशी व्यक्ती घटनास्थळी नसल्यास संपूर्ण कामाचा खोळंबा होतो. यासारख्या बाबींमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी उद्यान विभागाने आधीच खबरदारी घेतली आहे. (Tree Cutting)

(हेही वाचा – Muslim : अशरफने सुमित बनून हिंदू मुलीचे १३ वर्षे केले लैंगिक शोषण; गोमांस खाण्यासाठी केली जबरदस्ती)

या छाटणीबाबतच्या कामांचे वेळापत्रक संबंधित प्रशासकीय विभागाच्या (वॉर्ड ऑफिस) समाज माध्यमांवर (सोशल मीडिया हॅन्डल) प्रसारित करण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित प्रशासकीय विभागातील सूचना फलकावरही वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार छाटणीची कामे हाती घेण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी याबाबत आपल्या प्रशासकीय विभागांशी संपर्क करून माहिती करून घ्यावी. तसेच वेळापत्रकातील माहितीनुसार आपली वाहने योग्य ठिकाणी ‘पार्क’ करून उद्यान विभागाच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये या कामांसाठी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Tree Cutting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.