-
प्रतिनिधी
कायदा-सुव्यवस्था आणि विविध गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याला राज्य सरकारने नवे जिल्हाधिकारी दिले आहेत. बीडचे विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली (Transfer) करून त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाठक यांची नवीन नियुक्ती मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांची बदली (Transfer) संचालक, महापालिका प्रशासन, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. विदर्भ वैधानिक मंडळाचे सदस्य सचिव शुभम गुप्ता यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच, अंबड (जि. जालना) उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
(हेही वाचा – दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा देऊ; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM Modi यांची प्रतिक्रिया)
अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यात सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, बीड जिल्हा बँकेचे प्रशासक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासारख्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. २०२४ मध्ये त्यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांवरून आणि काही गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांच्या बदलीची (Transfer) मागणी जोर धरत होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पाठक यांच्या बदलीसाठी आवाज उठवला होता, ज्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
नवे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्या दृष्टिकोनाची अपेक्षा आहे. विशेषतः, जिल्ह्यातील गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील समस्यांवर त्यांचे लक्ष केंद्रित असेल. या बदल्यांमुळे बीडसह अन्य विभागांमध्ये प्रशासकीय कारभारात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. पाठक यांच्या मत्स्योद्योग महामंडळातील नव्या भूमिकेतूनही त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण योगदानाची अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community