
- मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात पडणारे खड्डे शोधून ते त्वरीत बुजवले जावेत यासाठी महापालिकेच्यावतीने पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा (Pothole Tracking System) वापर करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. ज्याद्वारे या सिस्टीमवर टाकण्यात येणारे खड्डे ४८ तासांवर बुजवण्यास भाग पाडले जातात. परंतु दरवर्षी या प्रणालीचा वापर केला जात असला तरी यंदा मात्र या प्रणालीचा वापर करण्यास प्रशासनाचा दुर्लक्ष दिसून येत आहे. यंदा बहुतांशी रस्ते प्रकल्प बाधित रस्ते असून ज्या रस्त्यांची कामे कंत्राटदारांना बहाल झाली आहेत, त्या रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित कंपनीची जबाबदारी राहणार आहे. परंतु या कंत्राटदारांना हे खड्डे बुजवण्यास भाग पडले जावू नये याच भीतीने या प्रणालीचा वापर केला जात नसल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईत सुमारे २,०५० कि.मीटर लांबीचे रस्ते असून त्यातील आतापर्यंत, सुमारे १.३३३ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यामध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ कि.मी.) जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आली आहेत. त्यापैकी, अद्यापपर्यंत १८७ रस्त्यांची कामे (सुमारे २६%) पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे सुरु आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ कि.मी.) काँक्रिटीकरण करण्याचे असून त्यापैकी ७२० रस्त्यांची कामे डिसेंबर २०२४ मध्ये सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे ही कामे सुरु आहे. त्यानुसार टप्पा-१ मधील ७५ टक्के कामे व टप्पा-२ मधील ५० टक्के कामे जून २०२५ पूर्वी पूर्ण करण्यात येत असल्याचा दावा रस्ते विभागामार्फत केला जात आहे.
(हेही वाचा – Foreign investment: ‘देशात महाराष्ट्रच नंबर वन’! परकीय गुंतवणुकीत 1.64 लाख कोटींचा उच्चांक)
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी पहिल्या टप्प्यातील २५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्के काम तसेच हाती घेतलेली कामे अर्धवट राहिल्यानंतर ती वाहतुकीसाठी सुरळीत करून दिल्यानंतरही पावसाळ्यात यावर खड्डे पडल्यास याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदाराची राहणार आहे. मुंबईत पावसाळ्यात (Monsoon in Mumbai) रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडता आणि यातील काही जुने रस्ते काही प्रकल्प रस्त्यांचा समावेश असल्याने हे खड्डे त्वरीत बुजवले जावे यासाठी मागील वर्षी पर्यंत पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा (Pothole Tracking System) वापर केला जात होता. परंतु यंदा मात्र या प्रणालीचा विसर महापालिका (BMC) प्रशासनाला पडलेला पहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये सन २०११ पासून पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा (Pothole Tracking System) वापर रस्ते विभागाच्या माध्यमातून केला जातो आणि नागरिकांना खड्डयांच्या तक्रारी करता यावा यासाठी ही प्रणाली बनवण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना खड्डयांचे फोटो या प्रणालीवर अपलोड करून तक्रार करता येते आणि यावर फोटोसह तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागीय रस्ते अभियंता यांच्याकडून दखल घेवून ४८ तासांमध्ये तो बुजवला जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे जो खड्ड् ४८ तसांमध्ये बुजवला जात नाही त्याप्रकरणी रस्ते अभियंता आणि कंत्राटदाराला दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, यंदा सर्व रस्त्यांचे काम सिमेंट काँक्रिटीकरण (Cement Concrete) करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ज्या रस्त्यांची कामे सुरु आहे किंवा अर्धवट आहेत त्यावर खड्डयांची समस्या निर्माण होवू शकते. त्यामुळे या सर्व रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी निदर्शनास येतील आणि त्यातून त्यांच्यावर खड्डे बुजवण्याचा भार पडेल तथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येईल याच भीतीने या प्रणालीचा वापर न करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत नाही का सवाल उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – Property Tax : मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ, पण घनकचरा व्यवस्थापन शुल्काला स्थगिती)
पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीवरील नोंद झालेल्या खड्डयांच्या तक्रारी
सन २०१९-२० : ६२७६
सन २०२०-२१ : १५५०
सन २०२१-२२ : १६४५
सन २०२२-२३ : १९८८
सन २०२३-२४ : १२४१
सन २०२४-२५ : १५४८
हेही पहा –
Join Our WhatsApp Community