गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना सगळीकडे उत्सहाचे वातावरण आहे. घरगुती गणेशोत्सवाकरता नागरिकांनी पूजेचे साहित्य, प्रसादासाठी लागणारे मोदक-फळं, आरतीची पुस्तकं यासारख्या वस्तूंची खरेदी सुरू देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची देखील जय्यत तयारी सुरू आहे. मात्र यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लाऊड स्पिकर लावण्यापूर्वी काळजी घ्यावी लागणार आहे. जर मंडळांनी लाऊड स्पिकरच्या कर्णकर्कश आवाजाची मर्यादा पाळला नाही तर संबंधितांवर कारवाई होऊ शकते.
(हेही वाचा – आता ‘म्हाडा’चे अर्ज ‘या’ मोबाईल ॲपवरून भरता येणार!)
कशी असणार ध्वनी मर्यादा
या लाऊड स्पिकरचा कर्णकर्कश आवाज लहानांसह ज्येष्ठ मंडळींना त्रासदायक ठरतो. त्यामुळे स्पीकर लावण्यास परवानगी आहे; पण त्यांचा आवाज मोठा नको अन्यथा मंडळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे सर्व गणेश मंडळांना नियमांचे पालन करणं अनिवार्य असणार आहे. तज्ज्ञ मंडळांच्या सूचनेनुसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लाऊड स्पिकरचा वापर करावा, मात्र वेळेचे पालनही करा, असा सल्ला पोलिसांकडून मंडळांना देण्यात आला आहे. पहाटे ६ ते संध्याकाळी १० तसेच रात्री १० ते पुन्हा सकाळी ६ वाजेपर्यंत आवाजाच्या विविध मर्यादा पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, ध्वनिप्रदूषण कायदा २००० अन्वये आवाजाची पातळी ठरविण्यात आल्याचे तज्ज्ञ मंडळींकडून सांगण्यात आले आहे.
अटींचा भंग केल्यास परवाना होणार रद्द
ध्वनिक्षेपकाच्या नमूद अटींचा भंग केल्यास मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच अर्जात नमूद केलेली जागा देखील पोलिसांच्या परवानगी शिवाय बदलू नये, तसे केल्यास दिलेला परवाना रद्द होऊ शकतो.
(हेही वाचा – “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात रवाना)
