फायर ऑडिट करुन नर्सिंग होम ताब्यात घ्या! नगरसेविकेचे आयुक्तांना निवेदन

भांडुपच्या सनराईजसारख्या रुग्णालयासारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून महापालिकेने सर्वप्रकारची काळजी घेऊनच, नर्सिंग होम ताब्यात घ्यावीत असे निवेदनात म्हटले आहे.

80

कोविड-१९च्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने काही खाजगी नर्सिंग होम तसेच रुग्णालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण भांडुपमधील ड्रिम मॉलमधील आगीमुळे सनराईज रुग्णालयात कोविड रुग्णांचा गुदमरुन झालेल्या मृत्यूची घटना पाहता, महापालिकेने ही खाजगी रुग्णालये व नर्सिंग होम ताब्यात घेण्यापूर्वी, त्यांचे अग्निसुरक्षेच्या माध्यमातून ऑडिट करावे. हे फायर ऑडिट पूर्ण झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या प्रमाणपत्रानंतरच ही खाजगी रुग्णालये व नर्सिंग होम कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ताब्यात घेतली जावीत, अशी सूचना नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

(हेही वाचाः मुंबईत ६२ नर्सिंग होम ताब्यात घेतली जाणार! काय होणार फायदा?)

असे आहे निवेदन

नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना बुधवारी निवेदन सादर केले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पूर्वतयारीसाठी महापालिकेतर्फे नर्सिंग होम ताब्यात घेण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त म्हणून आपण घेतलेला निर्णय मुंबईकरांच्या हिताच्या आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य आहे. पण काही दिवसांपूर्वी भांडुपमधील ड्रिम मॉलला आग लागल्याने याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या सनराईज नर्सिंग होमधील ११ कोरोनाबाधित रुग्णांचा आगीच्या धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. त्यामुळे नर्सिंग होम ताब्यात घेऊन सुरू करण्यापूर्वी ते नर्सिंग होम अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, अग्निशमन दलाकडून प्राप्त झाल्यानंतरच त्या नर्सिंग होममध्ये कोविड रुग्णांच्या उपचाराला सुरुवात करावी.

(हेही वाचाः ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ द्वारे होणार ६८ तज्ज्ञ डॉक्टरांची निवड!)

नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षेच्या तपासणीत त्रुटी आढळून आल्यास, संबंधित रुग्णालय तथा नर्सिंग होमच्या व्यवस्थापनाकडून त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. या त्रुटी दूर झाल्यानंतरच तेथे कोविड रुग्णांवर उपचार केला जावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

सनराईज सारख्या घटना घडू नयेत म्हणून…

मुंबईमध्ये सध्या कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्यक्षात एवढी मोठी संख्या वाढूनही मुंबईत अजूनही परिस्थिती नियंत्रणातच आहे, असे दिसून येते. मुंबई महापालिका प्रशासन आणि अधिकारी हे सचोटीने आणि मेहनतीने जीवाची बाजी लावत काम करत असतात. पण काही दुर्लक्षित बाबींमुळे सनराईज सारख्या घटना घडत असतात. त्यामुळे महापालिकेने सर्वप्रकारची काळजी घेऊनच, अशाप्रकारची उपचार यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.