
-
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पारंपरिक आणि प्रयोगशील कलांचा अभ्यास व संशोधनासाठी आता समर्पित केंद्र स्थापन होणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीत लवकरच ‘शाहीर साबळे संशोधन केंद्र’ सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रयोगात्मक कलांचा दस्तऐवज तयार करणे, त्यांचे वर्गीकरण आणि सखोल विश्लेषण, या उद्देशाने हे केंद्र सुरु होणार असून, याचा उपयोग पदवी, पदव्युत्तर आणि पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रयोगात्मक कलांना मिळणार अभ्यासाची नवी दिशा
या संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी गुरुवारी मंत्रालयात सांस्कृतिक विभागाची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. यामध्ये मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी केंद्राचा आराखडा त्वरीत तयार करण्याचे आदेश दिले. नाटक, लोककला, संगीत, नृत्य, कीर्तन, पोवाडा, तमाशा, वगनाट्य, दशावतार, भारूड या सर्व पारंपरिक व लोककला प्रकारांचा अभ्यास केंद्रात केला जाणार आहे.
(हेही वाचा – Crime News : पत्नीला बॉयफ्रेंडसह पाहिल्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीला केलं शूर्पणखा !)
शाहीर साबळेंच्या योगदानाची दखल
केंद्राला ‘शाहीर साबळे’ यांचे नाव देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना मंत्री शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते तमाशा, पोवाडा, लोकगीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांचे कार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारणे हा महाराष्ट्र संस्कृतीला अभिवादन आहे.”
कलाविश्वातील अभ्यासक, शासकीय अधिकारी उपस्थित
या बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते. राज्यात अकृषी विद्यापीठांच्या माध्यमातूनही काही प्रयोगात्मक कलांवर कार्य सुरू आहे, त्यांच्यासह संलग्नता ठेवत एकात्म अभ्यासाची मांडणीही करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – India Tour of England : हेडिंग्ले इथं भारताची इंग्लंडविरुद्ध कामगिरी कशी आहे?)
कलांचं संवर्धन, अभ्यास आणि जागतिक स्तरावर प्रस्तुतीचा मार्ग
मंत्री शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले की, “प्रयोगात्मक कला म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामागे लोकजीवन, इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन आहे. या कलांचं वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण, दस्तऐवजीकरण आणि जागतिक स्तरावर परिचय व्हावा, यासाठी हे संशोधन केंद्र क्रांतिकारी ठरणार आहे.” या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील कलावंत, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दार खुले झाले असून, पारंपरिक आणि लोककलांच्या अभ्यासाला शास्त्रीय बैठक मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community