पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, घाटकोपर विक्रोळी इत्यादी ठिकाणी असलेल्या शाळा (School), कॉलेजपासून १०० मीटर परिसर तंबाखू, सिगारेट मुक्त करण्यात आला आहे. परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून तंबाखू मुक्त शालेय परिसर विशेष मोहिम २०२५ सुरू करण्यात आली आहे. मागील काही आठवड्यापासून सुरू असणाऱ्या या मोहिमेला शाळा, कॉलेज प्रशासन तसेच स्थानिक नागरिक आणि दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुलुंड, भांडुप, घाटकोपर कांजूरमार्ग, विक्रोळी नवघर, पंतनगर, पार्कसाईड इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शाळा, कॉलेजच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेट विक्रीसाठी मनाई असताना मागील अनेक वर्षांपासून येथे खुलेआम तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरू असल्यामुळे शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होत असल्याकारणाने परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी शाळा कॉलेज पासून १०० मीटर परिसरात ‘तंबाखू मुक्त शालेय मोहीम’ ही संकल्पना सुरू केली.
परिमंडळ ७ मध्ये मागील आठवड्याभरात विविध पोलीस ठाण्यांनी शाळेच (School), कॉलेजच्या १०० मीटरच्या आवारात तंबाखू, सिगारेट, गुटखा, पान मसाला इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली, मागील आठवडा भरात परिमंडळ ७ मधील २९५ शाळा कॉलेज परिसर तंबाखूजन्य पदार्थ मुक्त केला आहे. पान टपऱ्या तसेच उघड्यावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ३०१ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ३० विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बदलून शाळा कॉलेज उपयोगी वस्तू विक्री सुरू केली आहे. दरम्यान तंबाखू मुक्त शालेय मोहीम’ अंतर्गत शाळा कॉलेजच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मुक्त क्षेत्र अशी फलक लावण्यात आली आहेत.
परिमंडळ ७च्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्याकडून तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहे, तंबाखूमुक्तीसाठी विविध कार्यक्रम आणि जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. पोलिसकडून नियमित पणे शाळा आणि कॉलेजच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे. परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे शाळा, कॉलेज आणि पालकांकडून स्वागत करण्यात येत असून या मोहिमेला स्थानिक नागरिक आणि शाळा कॉलेज प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Join Our WhatsApp Community