
-
मुंबई, (विशेष प्रतिनिधी)
पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. येत्या २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक अर्थात बॅरेकेट्स हटविले जातील आणि रस्ते वाहतुकीस खुले होतील, अशा प्रकारची कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका (BMC) आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी दिले.
मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प (Cement concreting project) अंतर्गत, पूर्व उपनगरात पूर्णत्वास येत असलेल्या रस्ते कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी २८ मे २०२५ रोजी रात्री ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. चेंबूर येथे संत कक्कया मार्ग, साकीविहार रस्ता, घाटकोपर (पश्चिम) येथील सिकोवा औद्योगिक मार्ग, भांडूप (पश्चिम) येथील सुभाष नगर मार्ग, विक्रोळी (पश्चिम) येथील सूर्या नगर मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथील मॅरेथॉन गॅलेक्सी मार्ग आणि बाबा पदमसिंह छेद मार्ग क्रमांक ५ आदींचा त्यात समावेश होता.
(हेही वाचा – Property Tax : मुंबईकरांच्या मालमत्ता करात वाढ, पण घनकचरा व्यवस्थापन शुल्काला स्थगिती)
रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, टप्पा एक आणि टप्पा दोन मिळून एकूण १३८५ रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट (पीक्यूसी अर्थात (काँक्रिट ओतणे) रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. पैकी, ३० रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर घेतली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी या रस्ते काँक्रिट (Road Concrete) कामांचा गुरुवारी २९ मे २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला.
या हंगामात हाती घेण्यात आलेली रस्ते काँक्रिटीकरणाची (Road Concrete) नियोजित कामे पूर्णत्वास येत आहेत. काँक्रिट ओतण्याची कामे २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने ही मुदत २३ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे (Finishing work) प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही कामे रात्रीच्यावेळी करावीत. रस्तारोधक हटवावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.
(हेही वाचा – यंदा खड्ड्यांची जबाबदारी रस्ते कंत्राटदारांवर, तक्रारींसाठी Pothole Tracking System ला ठेवले ‘झाकून’)
रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य हे रस्त्यांचा कडेला पडून राहू नये. ते विनाविलंब उचलावे, असे निर्देश देताना बांगर म्हणाले की, मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील राडारोडा, उर्वरित बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्तानिहाय नियोजन करावे, त्यासाठी समर्पित गट तयार करुन आवश्यकतेनुसार अधिकचे मनुष्यबळ नेमावे. येत्या दोन-तीन दिवसांत राडारोडा हटविण्याची कार्यवाही पूर्ण होईल, हे सुनिश्चित करावे, अशी सूचना अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी केली. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, यांच्यासह उप प्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि दुय्यम अभियंता या बैठकीस उपस्थित होते.
परिमंडळनिहाय पीक्यूसी पूर्ण झालेल्या रस्त्यांची माहिती
- परिमंडळ १ – ८४ रस्ते;
- परिमंडळ २ – ५८ रस्ते;
- परिमंडळ ३ – २४२ रस्ते;
- परिमंडळ ४ – ३७७ रस्ते;
- परिमंडळ ५ – १९२ रस्ते;
- परिमंडळ ६ – ९८ रस्ते;
- परिमंडळ ७ – ३३४ रस्ते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community