
-
प्रतिनिधी
राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. सर्वसामान्यांना योजनांचा लाभ सुलभतेने व्हावा, यासाठी राज्य सरकारने आपल्या ४८ विभागांना दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जाहीर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाला १०० दिवसात करावयाच्या कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाने आपापले सादरीकरण केले होते. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीत लक्ष घालत प्रशासनातील सर्व विभागांचा सातत्याने आढावा घेतला होता. आता १ मे या महाराष्ट्र दिनी १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल जाहीर होणार आहे. यात कोणता विभाग, कोणता अधिकारी अव्वल ठरतो याची उत्सुकता सगळयांना लागून राहिली आहे.
(हेही वाचा – ICSE 10th Exam Results : धारावीतील युवश्री सर्वाननने मिळवले ९३.०२ टक्के गुण)
सरकारी विभागांनी गेल्या १०० दिवसात केलेल्या सुधारणा कार्यक्रमांचे मूल्यांकन क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया या केंद्रिय संस्थेकडून करण्यात आले आहे. अशा प्रकारचे मुल्यांकन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या संस्थेने विभाग तसेच अधिकारी यांचेही मूल्यांकन केले आहे. या निकालात अव्वल ठरणाऱ्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विभागांची नकारात्मक दखल घेतली जाणार आहे.
प्रभावी कार्यवाहीसाठीचे मुद्दे
१०० दिवसाच्या आराखड्यानुसार प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विभागाचे संकेतस्थळ, नागरिकांचे सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी आणि सुविधा, गुंतवणूक प्रसार, कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ई ऑफिसचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदी मुद्दे ठरवून देण्यात आले होते.
राज्यातील उत्कृष्ट ५ मंत्रालयीन विभागांचे सचिव, ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त/संचालक, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलीस अधीक्षक, ५ मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ४ महापालिका आयुक्त, ३ पोलीस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि २ पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावे जाहीर होतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community