Pune Hoarding Collapse : राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यासह कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तर,गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. दरम्यान मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी सुद्धा पुण्याला जोरदार पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे एकाचवेळी ३ ठिकाणी होर्डिंग कोसळले आहेत. या होर्डिंगखाली अनेक वाहने अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यात प्रचंड वाहतुक कोंडी झाली. घटनास्थळी होर्डिंग हटवण्याचे काम सध्या सुरु आहे. (Pune Hoarding Collapse)
(हेही वाचा – BMC : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; मे महिन्याच्या पगारात मिळणार एवढी रक्कम)
अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर होर्डिंग कोसळले आहे. हे होर्डिंग भर चौकात कोसळले असून, होर्डिंगखाली अनेक दुचाकी अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात कोणीही जखमी नाही. तसेच पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोली जवळ सणसवाडी येथे होर्डिंग कोसळले आहे. यानंतर सणसवाडी आणि फुरसुंगी मंतरवाडी चौक अशा दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले आहे. फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळला (Fursungi Mantarwadi Hoarding Collapse) आहे.
(हेही वाचा – Operation Sindoor Delegation : केंद्राच्या शिष्टमंडळाला ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा; पक्षाचा संजय राऊतांना घरचा आहेर )
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पीकांचे नुकसान झाले आहे. तर मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMA) वर्तवला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम अवकाळी पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे. तर या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community