
-
प्रतिनिधी
Shambhuraj Desai सह्याद्रीचे उत्तुंग गडकिल्ले, कोकणची लाभलेली निळीशार किनारपट्टी आणि विदर्भातील घनदाट जंगले आता जागतिक पर्यटकांना साद घालणार आहेत. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवण्यासाठी सरकारने कंबर कसली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल २०९६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. “महाराष्ट्राच्या अफाट पर्यटनाचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ब्रँडिंग’ केले जाईल,” अशी ग्वाही पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधानसभेत दिली. (Shambhuraj Desai)
नियम २९३ अन्वये विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, केवळ निधी देऊन न थांबता त्याचा प्रत्यक्ष परिणाम जमिनीवर दिसण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला जात आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथील ‘महापर्यटन महोत्सवा’ला परदेशी पर्यटकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्याची संस्कृती, खाद्यपरंपरा आणि कला जागतिक नकाशावर पोहोचली आहे. याच धर्तीवर आता राज्यभर नवनवीन उपक्रम राबवले जाणार आहेत. (Shambhuraj Desai)
(हेही वाचा – South Mumbai : कामाठीपुरा, उमरखाडीचा होणार कायापालट! हजारो कुटुंबांना मिळणार हक्काची घरे)
कोकण आणि विदर्भासाठी विशेष ‘टुरिझम पॅकेज’
कोकणातील समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी सरकार स्वतंत्र आराखडा तयार करत असून, लोकप्रतिनिधींसोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. गोव्यातील ‘मोपा’ आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याला जोडणाऱ्या सुलभ रस्त्यांमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे. दुसरीकडे, विदर्भातील कल्याणेश्वर, हनुमानगडी आणि नवेगाव यांसारख्या निसर्गरम्य स्थळांच्या विकासाचे नवे प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत. (Shambhuraj Desai)
(हेही वाचा – Pune Police : ड्रग्ज तस्करांच्या ‘काळ्या’ धंद्याला आता डिजिटल लगाम; आता एका क्लिकवर उघड होणार तस्करांचे जाळे)
’नमो पर्यटन’ केंद्रांचे जाळे
केंद्र सरकारच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या ‘नमो पर्यटन’ योजनेअंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर अत्याधुनिक सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत. जरी तीर्थक्षेत्रे ग्रामविकास विभागाकडे असली, तरी ज्या धार्मिक स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते, तिथे पर्यटन विभागामार्फत विशेष सोयीसुविधा पुरवल्या जातील. आगामी पुरवणी मागण्यांमध्ये पर्यटन क्षेत्रासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचा मानसही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी झळाळी मिळणार आहे. (Shambhuraj Desai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
