प्रतिनिधी
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या या दौर्याला राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी करत राजशिष्टाचाराचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. (Permanent State Guest)
(हेह वाचा – पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुल्ला Asim Munir चे प्रमोशन)
या सूचनांनुसार, मुख्य न्यायमूर्तींना “कायमस्वरूपी राज्य अतिथी” (Permanent State Guest) म्हणून घोषित करण्यात आले असून, त्यांना निवास, वाहतूक, सुरक्षा यासह संपूर्ण दौऱ्यादरम्यान आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
काँग्रेसचा सरकारवर हल्ला, राष्ट्रपतींना पत्र
या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत आवाज उठवला होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतरच सरकारने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विमानतळावर स्वागत, जिल्ह्यांमध्ये संपर्क अधिकारी नेमणार
मुख्य न्यायमूर्तींच्या मुंबईतील आगमनप्रसंगी मुख्य सचिव व पोलीस महासंचालक किंवा त्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत व निरोप करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी याचे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे. या दौऱ्यात न्यायमूर्ती ज्या विभागाशी संबंधित विषयासाठी भेट देतील, त्या विभागाने गट अ-श्रेणीतील राजपत्रित दर्जाचा संपर्क अधिकारी नेमावा, असेही आदेश आहेत. विधि व न्याय विभाग मंत्रालय, तसेच संबंधित जिल्ह्यांतील न्यायालयांनी यासाठी जबाबदारी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
(हेह वाचा – Uttar Pradesh मधील विद्यापीठात बनावट पदव्यांचा गोरखधंदा, ‘४-४ लाखांत…’; एसटीएफच्या तपासात धक्कादायक माहिती समोर)
अंमलबजावणीवर भर
या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होईल यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. हा दौरा कोणत्याही शंका वा त्रुटीविना पार पडावा, यासाठी राज्य सरकार विशेष दक्ष आहे. मुख्य न्यायमूर्तींचा हा दौरा केवळ शिष्टाचारापुरता मर्यादित न राहता, राजकीयदृष्ट्या संवेदनशील व प्रतिष्ठेचा मुद्दा ठरत असल्याचे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या दौऱ्याच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष असणार हे निश्चित!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community