पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्यासह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांवर समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून काम पाहतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नुकताच पंढरपूर शहराचा आणि परिसरातील पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी कामात त्रुटी आढळल्याने मुख्यमंत्री शिंदेंनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावले. वारकरी पंढरपुरात दाखल होण्याआधी सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
आषाढी एकादशी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवण्यात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. तसेच पंढरपुरकडे येणाऱ्या रस्त्यांवर कुठेच खड्डे दिसले नाही पाहिजे सर्व रस्ते एक समांतर पातळीवर करा, रस्त्यात कुठेही कमी जास्त किंवा वर खाली स्तर नको. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
आषाढीनिमित्त पाहणी करणारे पहिले मुख्यमंत्री
- पंढरपुरात विकास कामांना कोणताही निधी लागला, तर मी विशेष निधीची तात्काळ व्यवस्था करतो. पण कामे तात्काळ वेगाने पूर्ण करा. वारकरी पंढरपुरात दाखल होण्याअगोदर सर्व कामे युद्ध पातळीवर, रात्र-दिवस काम करून पूर्ण करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
- दरम्यान, आषाढीनिमित्त पाहणी करण्यासाठी आलेले ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. यावेळी त्यांनी पंढपुरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दर्शन रांगेत जाऊन भक्तांशी संवाद साधला, मंदिर परिसर, भक्तांसाठी निवासासाठी योजना करण्यात आलेल्या ६५ एकर तळाची पाहणी करून ते माघारी फिरले.