-
प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर श्रीनगरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदत पथक तातडीने सक्रिय झाले आहे. हे पथक मंगळवारी रात्रीच मुंबईहून श्रीनगरला रवाना झाले असून, त्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ला; राज्यातील ६ जणांचा मृत्यू)
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आणि त्यांच्या नातेवाइकांना विमानाने मुंबईत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पथकाने अडकलेल्या इतर पर्यटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या ४० आणि ५५ जणांच्या ग्रुपशी संपर्क साधून त्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांशीही पथक संपर्कात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मदतकार्यावर लक्ष ठेवून असून, “कोणत्याही परिस्थितीत सर्व पर्यटकांना सुखरूप परत आणू,” असे आश्वासन त्यांनी दिले. (Pahalgam Terrorist Attack)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार घाला; उत्तरप्रदेशच्या आमदाराचे आवाहन)
सध्या श्रीनगरमधील परिस्थिती नाजूक असल्याने पर्यटकांना परत आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधावा लागत आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, एकूण २६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पथक केंद्राच्या मदतीने पर्यटकांना लवकरात लवकर राज्यात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community